Wednesday, January 21, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमहाराष्ट्रभूषण गडाचे महाद्वार हेच `भूषण`

भूषण गडाचे महाद्वार हेच `भूषण`

ऐतिहासिक आणि अवर्णनीय महाद्वार लोकार्पण सोहळा

भूषण गडाच्या महाद्वार लोकार्पण सोहळ्याने अगदी डोळे दीपून गेले. तो ऐतिहासिक, अभूतपूर्व आणि अवर्णनीय सोहळा अगदी डोळ्यात साठवून ठेवावा असाच झाला होता. सुमारे ३००/४०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी राजांनी या किल्ल्यासाठी जीवाचे रान केले. छत्रपती संभाजीराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले. आज त्याच किल्ल्यांची दुर्दशा झाली आहे. काही गडकिल्ले  शेवटची घटका मोजत असल्यासारखे वाटते. अशा वेळी पुरातत्व खात्याने या किल्ल्यांकडे जातीने लक्ष घातले तर हे गडकिल्ले अबाधित राहू शकतील. नाहीतर हेच गडकिल्ले आपल्या पुढच्या पिढीला कागदावर चित्रांच्या रूपाने दाखवावे लागतील, असे वाटू लागले आहे. पण असे कदापिही होणार नाही, याचीही खात्री आहे. याचे कारण म्हणजे महाराजांवर प्रेम करणारी आजची पिढी! कुठल्या ना कुठल्या संस्थेच्या वतीने प्रामाणिकपणे व श्रद्धेने काम करणारी ही मंडळी गडकिल्ले अबाधित राहावेत म्हणून मेहनत घेऊन ते जपत आहेत. त्यातीलच एक संस्था म्हणजे “राजा शिवछत्रपती परिवार “

राजा शिवछत्रपती परिवारातर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती केंद्र, रोजगार हमी, मुलांसाठी शालेय वस्तू वाटप असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. कोरोनाच्या काळात तर या परिवाराने हजारो लोकांसाठी मदतीचा हात दिला. परिवारातील सगळ्या दादा व ताईंनी जेवढे जमेल तेवढे सहकार्य केले. याच काळात भूषण गडासारख्या वर्धा व मल्हार किल्ल्यांवर महाद्वार बसविले. भूषण गडाचा महाद्वार लोकार्पण सोहळा नुकताच झाला.
राजमाता जिजाऊ फाऊंडेशन व राजा शिवछत्रपती परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित केला होता. काही ताई व दादा दोन दिवस आधी जाऊन तयारी करीत होते. २५ जिल्ह्यांतील लोक या सोहोळ्याचे साक्षीदार होते. १००० ते १२०० लोकांची उपस्थिती होती.

ध्येयमंत्र, राष्ट्रगीत व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ढोलताशांच्या गजरात महाराजांच्या पालखीसोबत भव्यदिव्य अशा मिरवणुकीला सुरुवात झाली. भंडाऱ्याच्या उधळणीने सगळे न्हाऊन निघत होते. रस्त्यावर हळदीची जणू चादर अंथरली होती असेच वाटत होते. वाटेत चालत असतांना मध्येमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’; ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’ ; ‘रक्ता रक्तात भिनले काय जय जिजाऊ, जय शिवराय’; ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. नंतर काही अंतरावर गेल्यावर मध्यभागी उभे राहून काही मावळे व रणरागिणींनी दांडपट्टा, तलवारबाजी असे अनेक कसरतीचे प्रयोग केले. नंतर मिरवणूक गडाच्या दिशेने निघाली.
गडाच्या पायथ्याशी गेल्यावर गडाची माती कपाळाला लावून गड चढण्यास सुरुवात केली. महाराजांचे नुसते नाव घेतले तरीही अंगात सहस्त्र हत्तींचे बळ संचारते असे म्हणतात ते अगदी खरे आहे. पायाला त्रास असल्याने गड चढायला जमेल की नाही याची शाश्वतीही वाटत नव्हती. परंतु गडाच्या पायरीला हात लावून महाराजांचे नाव घेतले आणि थबकत थबकत का होईना गड सर केला.

गडावर प्रवेश करतांना मध्यावर महाद्वार बसविले. त्याची विधिवत पूजा करण्यात आली. गडावर हरणाई देवीचे मंदीर आहे, तिथे सगळ्यांनी देवीची यथासांग पूजा केली. प्रसादही घेण्यात आला आणि पुन्हा एकदा गडाला नतमस्तक होऊन  व महाराजांना वंदन करून गड उतरण्यास सुरुवात केली. गड उतरून खाली आल्यावर  सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला व नंतर बसमध्ये बसून परतीच्या प्रवासासाठी सज्ज झालो, पुन्हा एकदा अशाच गडाच्या तयारीसाठी.

-रेखा बोऱ्हाडे, मुंबई 9969261202
(लेखिका राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख आहेत)

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध