`राव` यांचं सगळंच वेगळं…पण कसं..?

270
`राव आमचं वेगळं आहे` या सोशल मिडिया ग्रुपच्या दहाव्या वर्धापनदिनाला उपस्थिती लावलेली चंदेरी दुनिया आणि रंगलेले गेट टू गेदर

दहाव्या वर्धापनदिनाला हजेरी `चंदेरी` दुनियेची

मुंबई, १० जून : मराठी चित्रपट, नाटक, मालिका आणि विविध कलाक्षेत्रांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या `रावा` (‘राव आमचं वेगळं आहे’) ग्रुपच्या दहाव्या वर्धापनदिनाला चंदेरी दुनियेने हजेरी लावल्याने त्याला लखलखते वैभव लाभले होते.

फेसबुकवर अनेक फॅन्स ग्रुप असतात. अशाच एका फेसबुक ग्रुपने हल्लीच सोशल मीडिया वर १० वर्षे पूर्ण केली. ‘राव आमचं वेगळं आहे’ असे या ग्रुपच नाव! सध्या या फेसबुक ग्रुपची सदस्य संख्या ९००० पेक्षा अधिक आहे.

`रावा`(‘राव आमचं वेगळ आहे`) ला १० वर्षे पूर्ण  झाल्याच्या निमित्ताने स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील प्रमुख कलाकार अभिजीत खांडकेकर, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमधील रीना मधुकर, हल्लीच प्रदर्शित झालेल्या ‘दिल दिमाग बत्ती’ मधील अभिनेता मयुरेश पेम आणि ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेतील अभिनेत्री सिद्धी पाटणे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

प्रसाद ओक, अभिजीत खांडकेकर, बिग बॉस विजेता शिव ठाकरे, रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, जानकी पाठक, हर्षद अतकरी, अमृता देशमुख, सोनाली खरे, शिवानी रंगोले कुलकर्णी, कृतिका तुळसकर, धनश्री भालेकर या सर्व मराठी क्षेत्रातील कलाकारांनी रावा (‘राव आमचं वेगळं आहे`) ग्रुपला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

मराठी चित्रपट, नाटक, मालिका आणि विविध कलाक्षेत्रांना यापुढेही असाच हातभार लावण्याचे काम आम्ही सुरू ठेवू, अशी प्रतिक्रिया रावा ग्रुपचे अडमिन नितीन गोमाणे आणि सचिन जाधव यांनी यांनी दिली.

झी मराठीवर तुफान गाजत असलेल्या स्वप्नील जोशी आणि मुक्त बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेच्या चाहत्यांचा समूह असे या ग्रुपचे सुरुवातीचे स्वरूप होते. बघता बघता लोक या ग्रुपला जॉइन होऊ लागले. एकमेकांना आयुष्यात यापूर्वी कधीही न भेटलेले एकमेकांचे जिवलग मित्र झाले. भेटीगाठी होऊ लागल्या. या छोट्यामोठ्या भेटीगाठी तर होतच होत्या, पण जसा ग्रुप वाढू लागला तशी `रावा`च्या सदस्यांनी मिळून ठरवले की, मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी मालिका आणि मराठी कलाकार यांना सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहचवायचे.
यासाठी, Instagram, Twitter आणि Facebook या सोशल मिडिया साईटवर RAVA_Official हे अकाऊंट मे २०१२ साली सुरू करून प्रत्येक नवीन मराठी कलाकृतींना प्रोत्साहन देऊ लागले. येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाचे, नाटकाचे, मालिकेचे प्रोमो, फोटो, व्हिडीओ आपल्या सर्व ग्रुपवर फ्री`मध्ये सादर करू लागले.  मराठी कलाकृतीला प्रसिद्धी मिळावी, हाच त्यामागील उद्देश आहे. त्यांचे हे कार्य पाहून अनेक मराठी कलाकार आणि निर्माते स्वतःहून त्यांना जोडले गेले. या कामाची पोचपावती म्हणजे “हाफ तिकीट” या मराठी चित्रपटासाठी ते Social Media Partner म्हणून झळकले. अजूनही बऱ्याचशा चित्रपट, व्हिडीओ सॉंग आणि नाटकांमध्ये ते सोशल मीडिया पार्टनर म्हणून दिसू लागले आहेत.

फेसबुक सदस्यांसाठी RAVA बॉक्स क्रिकेट लीग, RAVA पुरस्कार, निबंध स्पर्धा, RAVA ट्रेकस आणि त्याचबरोबर समाजकार्य अशा कितीतरी नवनव्या संकल्पना यशस्वीपणे आजही राबवल्या जातात. त्याचबरोबर येतो तो त्यांचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम म्हणजे RAVA Get Together! प्रत्येक वर्धापन दिनाच्यावेळी Get Together आयोजित करण्यात येते. ग्रुपमधील सदस्यांबरोबर कलाकारांचीही उपस्थिती कार्यक्रमाला असते.