Saturday, June 13, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुंबईकल्याणच्या नूतन ज्ञानमंदिरातही विठुनामाचा गजर

कल्याणच्या नूतन ज्ञानमंदिरातही विठुनामाचा गजर

 

आषाढी एकादशीचा पालखी महोत्सव मोठ्या आनंदात साजरा

कल्याण (जयविजय न्यूज) : मागील १५ वर्षांप्रमाणे यंदाही कल्याणच्या नूतन ज्ञानमंदिर मराठी माध्यमाच्या शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आणि विठूरायाचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. मागील १५वर्षांची परंपरा कायम ठेवत या वर्षीही हा पालखी सोहळा शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला.
राज्यात सर्व ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र हिरवाईचा साज चढला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपुरात मोठ्या आनंदाने पार पडत होता. त्याचप्रमाणे ज्यांना पंढरपुरात जाणे शक्य होत नाही, ते त्यांच्या राहत्या ठिकाणीच पंढरपुराची वातावरण निर्मिती करतात आणि चराचरात त्यांना पांडुरंग दिसतो.

कल्याणच्या नूतन ज्ञानमंदिरनेही विठुरायाच्या पालखी सोहळ्यातून वातावरण निर्मिती केली. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच स्वैरस्वच्छंदी जिणे आवडत असते. पण यातील सर्वांना शालेय जीवन आवडावे, त्यांना शालेय शिक्षणाची गोडी लागावी म्हणून काही शाळा प्रयत्नशील असतात. त्यापैकीच एक शाळा म्हणजे कल्याणच्या पूर्व भागातील नूतन ज्ञानमंदिर शाळा.
शाळेने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या सुरुवातीला आषाढी एकादशीचा पालखीसोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात विद्यार्थी-शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत होते. सोबतच लेझीम ढोल-ताशांच्या गजरामध्ये विठुनामाचा गजर करत पालखीने शाळेतून प्रस्थान केले. यापूर्वी शाळेत विठ्ठलाच्या पालखीची मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे यांच्याकडून विधिवत पूजा करण्यात आली. उपमुख्याध्यापक बबन निकुम तसेच पर्यवेक्षक विजय भामरे हे या पूजेमध्येसहभागी झाले होते. शाळेसाठी आरोग्यदायी शिक्षण तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी साकडे घालण्यात आले.
शाळेच्या प्रागंणात एक रिंगण पूर्ण करून पालखीने विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान केले. ढोल-ताशांच्या तालावर लेझीम खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. हा सोहळा पंढरपुरातील वारीची आठवण करून देणारा आणि स्मरणात राहणारा असा होता.
विठूनामाचा गजर करत विद्यार्थी पालखीसोबत टाळ-मृदुंगाच्या तालामध्ये तल्लीन होऊन गेले होते. कोणी जनाई, कोणी तुका, कोणी नामा म्हणून या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. विठ्ठल रखुमाईचा वेश परिधान केलेले विद्यार्थी सगळ्यात उठून दिसत होते. मंदिराच्या प्रांगणात रिंगण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि मंदिरात अभंग किर्तनाने भक्तजनांना मंत्रमुग्ध केले. शाळेच्या सांस्कृतिक प्रमुख अस्मिता सावंत तसेच ममता वसावे तसेच विद्यार्थ्यांकडून लेझीम शिकवणारे व सराव करून घेणारे गोकुळ गवळे व हर्षा गावित यांचे
ही मार्गदर्शन खूप मोलाचे आहे.

शिक्षक-शिक्षकेतरांचा सहभाग

शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण तसेच अनोख्या संकल्पनेने नटलेले कार्यक्रम करण्यास नेहमी प्रोत्साहन देतात. म्हणूनच नूतन ज्ञानमंदिर ही शाळा गेली अनेक वर्षे साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य करत आहे. तसेच ज्ञानदानासोबतच समाजिक बांधिलकीचा दुर्वांकुर रुजवण्याचे कार्य करीत आहे. शाळेचे उपमुख्याध्यापक बबन निकुम, पर्यवेक्षक विजय भामरे, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचाही यात मोलाचा वाटा आहे.
—-

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध