Monday, December 4, 2023

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुंबईकर्तव्यपरायणतेला सलाम

कर्तव्यपरायणतेला सलाम

 युनियन बँकेतर्फे मुंबई पोलिसांना रेनकोटचे वाटप

मुंबई (जयविजय न्यूज) : “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” असे ब्रीद असलेले पोलीस शिपाई बांधव उन, पाऊस, थंडी या तिन्ही ऋतूत जीवाची पर्वा न करता लोकांच्या रक्षणासाठी सतत जागरूक असतात. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन असे त्यांचे ब्रीद आहे. त्या ब्रीदाशी ते प्रामाणिक असतात. अशा पोलिसांप्रती अनेकजण सद्भाव राखून असतात. युनियन बॅंक ऑफ इंडियानेही त्यांच्या कर्तव्यपरायणतेची जाणीव ठेवून त्यांना पावसापासून रक्षणासाठी रेनकोटचे वाटप केले.
 
 सदोदित तयांना युद्धाचा प्रसंग

युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी १३ जुलै २०२२ रोजी अतिरिक्त पोलीस आयुक्त, सशस्त्र दल आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस अधिकारी- केंद्रीय प्रदेश कार्यालय येथे मुंबई पोलिसांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
सध्या पावसाळाही लहरी झाला आहे. कधी कधी तो इतका बरसतो की, लोकांचे जीणे उद्धवस्त करतो. अशा वेळी हमखास धावून येतात ते पोलीस. सामान्य माणसे पावसाचे निमित्त सांगून घरात तरी राहतात, पण पोलिसांना असे प्रसंग हे युद्धाचे प्रसंग असतात. आपल्या ब्रीदाशी प्रामाणिक असणारा पोलीस जवान समोर संकट दिसत असतानाही लोकरक्षणासाठी त्यात उडी घेतोच. मुंबई पोलीस ज्या मेहनतीने काम करतात, त्या वृत्तीला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या  जिगरबाजपणाला मदत म्हणून युनियन बँक ऑफ इंडियाने यशलोक वेल्फेअर फाऊंडेशनच्या सहकार्याने पावसाळ्यात पोलिसांची गरज ओळखून रेनकोट वाटप केले.

द्वीपक्षीय सद्भावना

युनियन बॅंकेने वाटप केलेले रेनकोट  भारतातील शहरी आणि ग्रामीण भारतामधील वंचित आणि बेरोजगार महिला-पुरुषांनी तयार केले असून त्यांना रोजगाराचा शाश्वत स्रोत उपलब्ध झाला आहे. त्यांच्याकडूनच हे रेनकोट खरेदी करण्यात  आले आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाने या रेनकोटच्या माध्यमातून द्वीपक्षीय काम साध्य केले आहे. जे समाजासाठी धावून जातात त्यांच्या कर्तव्यपरायणतेची जाणीव ठेवून त्यांना साह्य केले आहे आणि हे रेनकोट ब्रँडेड कंपनीकडून खरेदी न करता ज्यांना खरोखरच आर्थिक साह्याची गरज आहे, अशा लोकांकडून खरेदी करून त्यांच्या वस्तूंना बाजारात ओळख निर्माण करून दिली. त्या वस्तूंना बाजार मिळवून दिला आणि त्यांच्या मेहनतीला आर्थिक मोबदलाही मिळवून दिला.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध