मुंबई (जयविजय न्यूज) – द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) जाहीर केलेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत मुंबईच्या मीत शहाने देशात पहिला क्रमांक पटकावला. त्याला ८०.२५ टक्के गुण मिळाले.
सीएची अंतिम परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती. ग्रुप एकचा निकाल २१.९९ टक्के लागला. त्यात परीक्षा दिलेल्या ६६ हजार ५७५ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ६४३ उमेदवार उत्तीर्ण झाले. ग्रुप दोनचा निकाल २१.९४ टक्के निकाल लागला. परीक्षा दिलेल्या ६३ हजार २५३ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ८७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या २९ हजार ३४८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जयपूरच्या अक्षत गोयलने ७९.८८ टक्के गुणांसह देशात द्वितीय, तर सुरतच्या सृष्टी संघवीने ७६.३८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे हेच लक्ष्य
देशात पहिला आल्याने खूपच आनंद झाला. दररोज ठराविक तास अभ्यास करण्यापेक्षा एकाग्रतेने अभ्यास करण्यावर भर दिला होता. खासगी शिकवणीबरोबरच स्वयंअध्ययनावरही भर होता. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे हेच लक्ष्य ठेवले होते. त्यामुळेच पहिला आलो, असे मीत शहा याने म्हटले आहे.

