Sunday, November 10, 2024

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमनोरंजन / क्रीडाआमची पन्नाशी!

आमची पन्नाशी!


गिरणगावातील के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या १९८६ च्या दहावीच्या बॅचचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस

शिक्षण घेताना गमतीजमती करणारे आपण सर्वजण पुढे नोकरी-धंद्यानिमित्त विखुरले जातो. कोणाची कोणाशी भेटही नसते. मात्र दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, तशी मुंबईतल्या या गर्दीच्या महासागरात दोन चेहऱ्यांची भेट होते. त्यातून पुढे अनेक चेहरे भेटत जातात आणि त्या जुन्या चेहऱ्यांचे एक संमेलनच भरते. असेच स्नेहसंमेलन भरले होते डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे…. त्यांच्या पन्नाशीच्या निमित्ताने…आमची पन्नाशी!

ही दोस्ती सुटायची नाय

करियर घडविताना आज आपण विविध हुद्द्यांवर काम करत असलो, तरी बालपणाचे जीवन आपल्याला साद घालत असते. आता बाल्यावस्थेप्रमाणे माती अंगावर उडवून घेता येत नसली, मातीत खेळता येते, मातीत हुंदडू शकतो. पण त्यासाठी आपल्याला शालेय सावंगडीच जास्त जवळचे असतात. म्हणून ते कधी भेटतील याची आस मनाला लागून राहिलेली असते. निवांत वेळी आपण त्यांच्याच आठवणीत रमून जातो. कधी कधी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. अशावेळी अचानक आपल्या आठवणीतला चेहरा समोर येतो. त्याच्याशी जवळीक साधत चर्चेतून चौकशी सुरू होते. त्यावेळी तो आपलाच शाळासोबती असल्याचे लक्षात येताच आपला आनंद गगनात मावेनासा होतो. कडाडून मिठी मारायची बाकी असते. पण ट्रेनमध्ये वा बसमध्ये; गर्दीच्या ठिकाणी असल्याने हस्तांदोलनावरच निभावले जाते आणि “ही दोस्ती सुटायची नाय,” असे मूकवचन घेत ही दोस्ती दिवसेंदिवस अधिक घट्ट होत जाते. त्यातून अनेक जुन्या मित्रांचा शोध घेत पुढे मोठा समूह तयार होतो. साहजिकच सामूहिक कार्यक्रम होत असताना एक कौटुंबिक नाते तयार होते. असेच नाते निर्माण झाले परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे.

रम्य ते दिवस

गिरणगावातील प्रसिद्ध असलेल्या के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूल शाळेतून शिक्षण घेऊन गेलेले अनेक जण विविध क्षेत्रात स्थिरावले आहेत. मात्र एकेकाची भेट होत या शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार झाला आणि “रम्य ते दिवस” म्हणत या शाळेच्या आठवणीत ते रमून गेले. पुढे अनेक आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहिले. त्यातूनच कल्पना सुचली त्यांच्या आयुष्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची.

जुन्या आठवणींना उजाळा

या शाळेतील १९८६ च्या विद्यार्थ्यांच्या बॅचने नुकताच ५० वा वाढदिवस साजरा केला. म्हणजे त्यावेळी साधारणपणे १६ वर्षांचे हे विद्यार्थी होते. त्यांनी एकत्र येत सामूहिक वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी शुभेच्छा पत्रांसह विविध भेटवस्तू देऊन धम्माल केली. परळच्या भोईवाडा येथील मामासाहेब फाळके सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

के. एम्. एस्. डॉ. शिरोडकर हायस्कूल ही गिरणगावातली आमची प्रसिद्ध शाळा. आमची बॅच १९८६ मधील दुपार अधिवेशनाची. समाजमाध्यमाचा प्रभावी वापर करुन आम्ही बरेच जण २०१२ पासून पुन्हा एकत्र आलो. २५ जून रोजी आमच्या शाळेतील मित्र आणि मैत्रिणीचा “आमची पन्नाशी” हा आमच्या सर्व बॅचमेटसच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणून भोईवाडा, परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मामासाहेब फाळके सभागृहात साजरा करण्यात आला. हॉलची व जेवणाची सेवा श्री. डांगे व श्री राय यांच्या स्टाफने उत्तम प्रकारे दिली.
आमच्या सर्व मित्रपरिवाराने एकत्र येणे व शाळेत असताना आम्ही जी धम्माल आणि मस्ती करायचो तशीच ती अनुभवणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.

तेव्हाच्या सवंगड्यांची उणीव

आमची पन्नाशी हा कार्यक्रम आम्ही करत असतानाच तत्कालीन काही सहकाऱ्यांची आम्हांला उणीव जाणवत होती. कारण संसाराचा गाडा हाकताना म्हणा, किंवा संसारसुख अनुभवण्यापूर्वीच काहीजणांनी या जगाचा निरोप घेतला होता. आशा आनंदाच्या प्रसंगी त्यांची आठवण येणे साहजिकच होते. त्यांना यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या आठवणी हृदयाशी जपून ठेवत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

शाळेचा मानबिंदू
आमच्या शाळेचा बॅच हा आमचा मानबिंदू आहे. म्हणून सर्वांना तो बॅच एक आठवण म्हणून देण्यात आला. श्री. कडुलकर यांनी त्याची अप्रतिम अशी डिझाइन करून तो बनवून घेतला होता.

सामाजिक बांधिलकी
या कार्यक्रमात आम्ही सामाजिक बांधिलकी जपत आमची बॅचमेट सुमन हिच्या विशेष शाळेतील हर्षल या विद्यार्थ्याने बनवलेले शुभेच्छापत्र व याच मुलांच्या पालकांच्या मदतीने बनवलेली सुंदर कागदी फुले भेट दिली. या वस्तू ठेवण्यासाठी पुनर्वापर करता येईल अशी कापडी पिशवीही दिली.

“जगी घुमवा रे, दुमदुमवारे” या समूहगायनने कार्यक्रमाची सुरुवात झाली .
शाळेत जसे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करायचो तसे कार्यक्रम देवेंद्र शेलार, सुरेंद्र जाधव, डॉ. सतिश पळशीकर, भारती उपडे, चंदा चव्हाण, आरती बागवे, सविता गावकर यांच्या सहकार्याने सादर झाले.
गाण्यांची धुरा अनिल तेल्ला, शोभा मळेवाडकर यांनी सांभाळली. सुषमाने सुंदर कविता सादर केली.
ह्या कार्यक्रम पत्रिकेतील हळवी कविता आमचा मित्र संजय जाधव याची पत्नी मिनल जाधव हिने लिहिली आहे. कार्यक्रम पत्रिका आमचा कलाकार मित्र संदीप सावंत याने तयार केली होती.

पुन्हा भेटायचेच
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रबद्ध नियोजन सुमन हिंदळेकर यांनी केले. त्यांना राजन गावडे, अंजली लोके, राजेश बांदिवडेकर, संजय मेस्त्री, संजय जाधव, शशिकांत हांडे, विजय तेटांबे यांनी उत्तम सहकार्य केले.
या कार्यक्रमात आमच्या बॅचचा प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभागी झाला होता. या नितांतसुंदर कार्यक्रमाच्या आठवणी मनात साठवत आणि “पुन्हा भेटायचेच” असे वचन घेत प्रत्येक जण आपापल्या मार्गाने निघून गेला. मात्र काही तासांच्या कार्यक्रमाने प्रत्येकाच्या त्या काळातील गमतीजमतींनी आयुष्या जगणे सुसह्य केले असेल हे निश्चित!

======

जयविजय न्यूज’ व्हॉट्सअप लिंकला जॉईन व्हा!*📹✒️🎙️

व्हॉट्सअप लिंक : https://chat.whatsapp.com/HntwkIt5RmX8uAiLKzFnqf

Facebook : jayvijay news
youtube : jayvijay marathi
Tweeter : @jayvijayNews
Telegram : jayvijay news.general
Instagram : jayvijaynews

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध