महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि अजिंक्य युवा प्रतिष्ठानतर्फे आदिवासी भागात मदतीचा हात
मुंबई (जयविजय न्यूज) : आपला मदतीचा एक हात अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणतो, त्यांच्या जीवनात चैतन्य फुलवितो. अशाच प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि अजिंक्य युवा प्रतिष्ठानतर्फे आदिवासी मुलांना मदत तर केलीच, शिवाय त्यांच्याबरोबर शेतात राबून त्यांना आनंदही मिळवून दिला.
“एक हात मदतीचा” या उपक्रमाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील जि. प. शाळा तांबडीपाडा या दुर्गम आदिवासी विभागातील विद्यार्थीवर्गाकरिता शैक्षणिक साहित्य, त्याचबरोबर शालेय उपयोगी वस्तू, मुलांना खाऊ तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच कृषीप्रधान आपल्या देशातील शहरी भागातील युवकांना तसेच विद्यार्थ्यांना शेतीविषयक माहिती व्हावी याकरिता तांबडीपाडा या ठिकाणी भातशेती (भातलावणी)चे प्रशिक्षण देखील देण्यात आले. शिवाय ग्रामस्थांच्या माध्यमातून उत्तम असे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमास वर्ल्ड मराठा ऑर्गनाझेशनचे महत्वाचे योगदान मिळाले. आयोजकांतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्याचबरोबर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभारही माणण्यात आले.
संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी तांबडीपाड्यातील सर्व ग्रामस्थ तसेच जि. प. तांबडीपाडा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक संतोष रघुनाथ निमसे यांचे देखील मनःपूर्वक आभार व्यक्त केले. असेच प्रेम व विश्वास यापुढेही संस्थेवर दाखवाल अशी आम्ही आशा बाळगतो असे मत आयोजकांनी यांनी व्यक्त केले.
या उपक्रमात संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रसाद मांडवकर, स्वाती गावडे, गौतम बनसोडे, निलेश कुडतरकर, साईनाथ खामकर, तुषार गांगुर्डेकर, विष्णू रामबाडे, मानसी बनसोडे, सचिन खेतले, सीमा भालेराव, मोनिका गाडे, छाया तांबे, आर्यन बनसोडे या सर्वांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले.

