मुंबई (जयविजय न्यूज) ः `हर घर तिरंगा` अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत छोट्या गटात शुभ्रा निलेश सुर्वे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
`हर घर तिरंगा`अभियानाअंतर्गत गुहागर तालुक्यातील कुडली हायस्कूल येथे केंद्र स्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवी १ ते ५ वी या छोट्या गटात कु. शुभ्रा निलेश सुर्वे हिने प्रथम क्रमांक पटकावला. शुभ्रा सुर्वे ही प्राथमिक मराठी शाळा, तवसाळ येथीत विद्यार्थिनी आहे.
दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यांच्या जोखडातून मुक्त होत स्वातंत्र्य मिळवून आपल्या देशाला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यवर्षानिमित्त गेले वर्षभर देशात विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून `हर घर तिरंगा` उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वातंत्रदिनी १५ ऑगस्टला चौकाचौकात ध्वजारोहण केले जाणार आहेच, पण १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घराघरात तिरंगा फडकवला जाणार आहे. या उपक्रमामागचा उद्देश आणि तिरंग्याचे महत्व जनमानसावर बिंबवावे यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळ देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी घरावर राष्ट्रध्वज लावण्याचे आवाहन करतानाच या मोहिमेमुळे आमचा तिरंग्याशी संबंध अधिक दृढ होईल, असे म्हटले आहे.
तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून २२ जुलै १९४७ रोजी स्वीकारण्यात आल्याचे प्रंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. आम्ही वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढत असताना स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वांचे धैर्य आणि प्रयत्न आज आम्हाला आठवतात. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे

