Saturday, June 13, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुंबईहा उत्सव सन्मानाचा, उत्सव दृढनात्याचा

हा उत्सव सन्मानाचा, उत्सव दृढनात्याचा

आम्ही वडाळा पूर्वकर संस्थेमार्फत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

दोनशेहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

चूल-मूल सांभाळून शिक्षण घेणाऱ्या      अंगणवाडी सेविकांचा सत्कार

आर्थिक दुर्बल कुटुंबातील पाच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
—-
मुंबई (निलेश कोकमकर/शांताराम गुडेकर )

पाऊस सुरू झाला की पेरलेल्या बीजला अंकुर फुटण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असते. त्यानंतर तो शेतीच्या कामाला लागतो, आर्थिक दुर्बल कुटुंबे उदरनिर्वाहासाठी पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्यांकडे लक्ष ठेवून असतात. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षेत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झालेली मुले त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडेल या अपेक्षेत असतात. नातेवाईकांकडून कोडकौतुक होते, पण एखाद्या संस्थेकडून होणारा सामूहिक सन्मान त्यांचा हुरूप वाढवणारा असतो. या विद्यार्थ्यांचा हुरूप वाढविण्याचे, त्यांना शाबासकी देण्याचे महत्त्वाचे काम करते “आम्ही वडाळा पूर्वकर” ही संस्था.
“आम्ही वडाळा पूर्वकर ” या संस्था परिवारतर्फे दहावी – बारावी परीक्षेत यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा व घर-संसार तसेच चूल – मूल सांभाळून परीक्षेत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेल्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार समारंभ कोरबा मिठागर मुंबई महापालिकेच्या शाळेत संपन्न झाला.

“आम्ही वडाळा पूर्वकर ” या संस्था परिवारतर्फे वडाळा पूर्व विभागात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे यावर्षी देखील सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जोपासत संस्थेमार्फत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घडवून आणला.

चार वर्षांत सर्वसामान्यांना आपलेसे
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आर. एम. भट शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, गांधी हॉस्पिटलचे प्रमुख सर्जन डॉ. गजाजन भगत , एस. आय. डब्लू. एस हायस्कुलचे शिक्षक संजय सकपाळ, साहित्यिक , लेखिका स्मिताक्षी चिपळूणकर, नाडकर्णी पार्क मनपा शाळेचे माजी शिक्षक जयप्रकाश धुरी, जाधव नॉलेज सेंटरचे संस्थापक जे. के. जाधव, साहित्यिक चंद्रकांत जगताप, समाजसेविक असुंता डिसोझा, आदर्श शिक्षक , समाजसेवक गणेश हिरवे आदी उपस्थित होते.आम्ही वडाळा पूर्वकर ही संस्था त्या विभागातील कार्यकर्ते व महिलावर्ग यांना सोबत घेऊन गेली चार वर्षे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. कोरोना काळात सर्व ठप्प असताना देखील गरजूंना धान्य वाटप करणे, आरोग्य शिबिरे राबवणे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे असे महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” या बाबासाहेबांच्या ब्रीद वाक्याची आठवण करून देत, शिकले पाहिजे, त्यातून समाज घडत असतो. त्याचबरोबर अंगी अन्य गुण सुद्धा अंगीकारले पाहिजेत, असे मत व्यक्त करून माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले.

पाच विद्यार्थी दत्तक
आपला समाजात आणि आजूबाजूला अनेक रत्न घडलेले असतात आणि घडत आहेत, पण त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष जात नाही आणि असेच काही रत्न वडाळा पूर्व भागात सुद्धा दडलेले आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व असे अजून रत्न घडत राहावेत यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे संस्थेचे सर्वेसर्वा शिवाजी फणसेकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान वडाळा पूर्व विभागातील आर्थिक दुर्बल घटकातील पाच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व राज्यात आणि देशात नाव उंचावणाऱ्या व कर्तृत्ववान कार्य करणाऱ्या वडाळा येथील राष्ट्रीय कबड्डीपटू पंकज मोहिते, कौन बनेगा करोडपती विजेता अक्षय कदम, रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल विजेती आकांक्षा हांडे, कोरोना काळात दिवस रात्र सेवा देणारे डॉ. शैलेश टेम्भूर्डे, यदा कदाचित नाटकाच्या २५० प्रयोगात कला सादर करणारी अभिनेत्री सोनाली नाडकर, सुप्रसिद्ध कच्चीढोल वादक मिलिंद जंगम, क्रिकेटपट्टू यश तांबे, मंत्रालय ते रेल्वे भिंतीवर चित्रातून जनजागृती करणारे चित्रकार स्वप्नील कदम, ऑस्कर पुरस्कार विजेते गायक विशाल पवार, आठ वर्षाची जिमनॅस्टिक गोल्ड मेडल विजेती सान्वी कासले या शिलेदारांना वडाळा रत्न पुरस्कार- २०२२ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर जवळजवळ २०० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. जे विद्यार्थी या समारंभास उपस्थित नव्हते त्यांना संस्थेचे कार्यकर्ते स्वतः भेट देऊन सन्मानित करणार आहेत. कारण ज्यांनी यश संपादन केले आहे आणि नाव नोंदणी केली होती त्यांचा सुद्धा आदर झाला पाहिजे, असे मत संस्थेच्या कार्यकारणीचे आहे.

तेथे कर आमुचे जुळती
सौ. सुचिता कोलंबेकर, सौ. संगीता घोडके, सौ. संगीता निकाळे, सौ. सुषमा कदम, सौ. संगीता मोरे, सौ. योगेश्री पवार आणि पौर्णिमा गडकर या अंगणवाडी सेविका घर – संसार आणि नोकरी सांभाळून दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्याबद्दल यांचा देखील सत्कार करण्यात आला.

यांनाही दंडवत

या सोहळ्यासाठी विद्यार्थी गुणगौरव सोहळा अध्यक्ष शिवाजी फणसेकर, माजी नगरसेविका प्रेसीला कदम, माहिती अधिकार – पोलीस मित्र कार्यकर्ते , पत्रकार समाजसेवक निलेश कोकमकर, कॅमेरामन प्रवीण मागाडे, फोटोग्राफर अण्णा साहेब हांडे, उडान स्टुडिओचे संचालक संतोष फाऊंडेशनचे अध्यक्ष हरेश शिवलकर साहेब उपस्थित होते.मनीषा डांगळे , सुशांत दोडमनी, कुमार बनसोडे , प्रकाश आरोळे, दीपाली उके, प्रेसीला कदम, महेंद्र गायकवाड, विशाल जाधव, राजा सिंग सिंगावले, राहुल सातपुते, मोनिका खंडागळे, अर्चना कुलकर्णी, सुरेखा दुबे, मनीषा मागाडे, भालचंद्र गायकवाड, संदीप जाधव, तुषार राजे कांबळे, विशाल जाधव, अकबर पटेल, आनंद उके, चेतन गायकवाड, मस्के आणि कार्यकर्त्यानी हा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध