स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी साकारला मानवी साखळीतून भारताचा नकाशा
बोधचिन्हाचाही आकार साकारला
मुंबई (जयविजय न्यूज) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे घाटकोपर परिसरातील ‘पंतनगर मनपा शाळा संकुल’ येथील विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह साकारले. सह आयुक्त श्री अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात सोमवारी सकाळी ११.३० वाजता घाटकोपर पूर्व परिसरातील ‘आचार्य अत्रे मैदान येथे आयोजित या कार्यक्रमात तब्बल १२०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
पंतनगर शालेय संकुलातील शारीरिक शिक्षण व चित्रकला या विभागांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी साखळीच्या सहाय्याने आपल्या देशाचा नकाशा व त्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे बोधचिन्ह साकारण्यात आले होते.
“भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा – हर दिल में तिरंगा, जय जवान जय किसान” अशा देशप्रेमाने भरलेल्या घोषणांनी जणू आसमंत दुमदुमला होता. विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या तीन रंगी टोप्यांनी देशाचा नकाशा शोभून दिसत होता.
या कार्यक्रमास सह आयुक्त (शिक्षण) श्री. अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, सहाय्यक आयुक्त एन विभाग संजय सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना सह आयुक्त कुंभार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पंतनगर शाळा संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
===

