सहशालेय उपक्रम स्पर्धेत माहीम येथील सरस्वती मंदिर हायस्कूलचे घवघवीत यश
मुंबई (जयविजय न्यूज) : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन अंतर्गत वॉर्ड स्तरीय सहशालेय उपक्रम स्पर्धेत माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले. नवरात्रोत्सवादरम्यान देवीचा जागर सर्वत्र चालू असताना सरस्वती विद्यामंदिर हायस्कूलला मिळालेले घवघवीत यश म्हणजे विद्यार्थ्यांना सरस्वतीच प्रसन्न झाल्यासारखे आहे.
सहशालेय उपक्रमामध्ये एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये माहीम येथील सरस्वती मंदिर हायस्कूलमधील विद्यार्थिनी कुमारी जान्हवी किसन लोंढे (गट २ , इ. ९) हिने प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्याची महापुरुषाशी झालेली भेट व त्यांच्यातील संवाद या विषयामध्ये तिने बाजी मारली. या एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी तिला शिक्षक युवराज अवसरमल सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
वाद्यसंगीत स्पर्धेमध्ये कु. पियूष मुकेश मोरे (गट १, इ. ६ वी ते ८ वी) याने हार्मोनियम मध्ये, तर कु. शुभम प्रसाद सावंत (गट २, इ.९ वी) याने ‘तबला’ वाद्यामध्ये यश प्राप्त केले. त्यांना संगीत शिक्षिका अनघा बेंद्रे यांनी मार्गदर्शन केले.
विजेत्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चाबुकस्वार, उपमुख्याध्यापिका बिनसाळे व पर्यवेक्षक कृष्णा जाधव यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
विज्ञान प्रदर्शनामध्ये ज्युनिअर गट व सीनिअर गटाने देखील जिल्हास्तरामध्ये बाजी मारलेली आहे . ज्युनिअर गटात इयत्ता आठवीतील जान्हवी माळी हिने शिक्षक राजाराम बडंगर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या ‘हर घर सुरक्षा’ या प्रकल्पास द्वितीय क्रमांक मिळाला, तर सीनिअर गटात स्वरांगी तनलकर हिने शिक्षिका दीप्ती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या ‘स्मार्ट रोड’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. या दोन्ही प्रकल्पाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे.
शाळेने याही वर्षी यशाची परंपरा कायम राखण्यात यश मिळवल्याने मुख्याध्यापक मारुती चाबुकस्वार यांनी समाधान व्यक्त केले .

