Tuesday, December 16, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeनवी मुंबईफ्लेमिंगोंच्या आगमनाला सुरुवात

फ्लेमिंगोंच्या आगमनाला सुरुवात

नववर्षाच्या सुरुवातीला ठाणे खाडी गुलाबी रंगाने न्हाऊन निघणार

ठाणे ः विविध २०० प्रजतींच्या पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या ठाणे खाडी परिसरात सध्या सुमारे ७० हजारांहून अधिक फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले आहे. थंडी लांबल्यामुळे फ्लेमिंगोंचे आमगनही लांबले होते. त्यामुळे फ्लेमिंगोप्रेमींचा हिरमोड झाला होता. मात्र आता थंडी सुरू झाली आहे आणि फ्लेमिंगोंचे आगमनही सुरू झाले आहे. त्यामुळे फ्लेमिंगोप्रेमींची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. नववर्षाच्या प्रारंभीच ठाणे खाडी परिसर फ्लेमिंगोंच्या गुलाबी रंगाने न्हाऊन निघण्याची शक्यता आहे.

थंडी नसल्याने आगमन लांबणीवर

फ्लेंमिंगोंचे लोभस रूप कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पक्षीप्रेमींची चाललेली धडपड

यंदा थंडी लांबल्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमनही लांबले होते. त्यामुळे दरवर्षी १ नोव्हेंबरला सुरू होणारी बोट सफारी यंदाच्या वर्षी दीड महिन्यानंतर सुरु झाली. मात्र फ्लेमिंगो मोठ्या संख्येने नसल्याने बोट सफारीत फ्लेमिंगो प्रेमींचा हिरमोड झाला होता. मुंबई परिसरात अद्यापही गारठवणारी थंडी सुरु झालेली नाही. त्यामुळे पक्ष्यांचे आगमन ठाणे खाडी परिसरात लांबल्याचे पक्षीप्रेमींकडून सांगण्यात आले. मात्र आता थंडी सुरू झाली असून पक्ष्यांचे आगमनही होऊ लागले आहे.
मुंबई आणि ठाण्यासारख्या कॉंक्रीटच्या जंगलात १७ चौ.कि.मी. क्षेत्रावर ठाणे खाडी पसरली आहे. ही खाडी सुमारे २०० प्रजातीच्या पक्ष्यांचे माहेरघर आहे. यात स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. त्यामध्ये ‘रोहित’ (फ्लेमिंगो) हा पक्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

मुबलक खाद्यपदार्थांमुळे वाढ
फ्लेमिंगोसाठी ठाणे खाडीत मोठ्याप्रमाणात खाद्यपदार्थ उपलब्ध असल्याने फ्लेमिंगोची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून सध्या ७० हजार ते १ लाख फ्लेमिंगो आहेत. ग्रेटर फ्लेमिंगोपेक्षा लेसर फ्लेमिंगोच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याची नोंद बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)द्वारे करण्यात आली आहे.
ठाणे खाडीच्या १७ चौ. कि.मी. क्षेत्रात विविध वनस्पती, पशुपक्षी दिसतात. या भागाला ”फ्लेमिंगो अभयारण्य” घोषित करण्यात आले असून नुकताच रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे, दिवसेंदिवस या भागातील जैवविविधता वाढवण्यावर आणि त्यांचा अभ्यास करण्यावर भर दिला जात असल्याचे बीएनएचएसकडून सांगण्यात येत आहे.
देशात राजस्थान, तमिळनाडू, गुजरात या भागात फ्लेमिंगो मोठ्या संख्येने दिसून येतात. मात्र, महाराष्ट्रात ठाणे खाडी परिसरात फ्लेमिंगोच्या संख्येचा आलेख वाढता आहे. १९९१-९२ मध्ये ८ ते १० हजार फ्लेमिंगोची संख्या होती. २०१८ मध्ये ही संख्या ४० हजारांवर पोहचली. आता ७० हजार ते १ लाखापर्यंत फ्लेमिंगोची संख्या वाढली आहे. फ्लेमिंगोला इतर ठिकाणापेक्षा ठाणे खाडी परिसरात खाद्यपदार्थ मुबलक प्रमाणात मिळत असतील हे त्यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

फ्लेमिंगोंचे दर्शन घेण्यासाठी सुरू करण्यात आलेली बोट सफारी

नववर्षांच्या आरंभी वाढ होणार
मुंबईत ऑक्टोबर महिन्याच्या अखेरिस फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. सुरुवातीला फ्लेमिंगो पक्षी कमी संख्येने येतात. हिवाळा स्थिरावल्यानंतर ठाणे खाडीत लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाल्याचे दिसून येते. ठाणे खाडीतील दलदलीच्या भागांत उगवणारे `अल्गे` शेवाळ फ्लेमिंगो पक्ष्याचे प्रमुख अन्न असते. अल्गे शेवाळ खाल्ल्यानंतर फ्लेमिंगोच्या शरीरावरील करडा रंग काहीसा गुलाबी रंगात परिवर्तित होतो. गुलाबी रंगामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची ठाणे खाडीतील फ्लेमिंगो अभयारण्यात झुंबड उडते. मात्र यंदा डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरीही फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या कमी दिसून येत होती. आता गारठवणारी थंडी सुरू होत आहे. त्यामुळे फ्लेमिंगो पक्षी थोड्या संख्येने का होईना; ठाणे खाडीकडे येऊ लागले आहेत. नववर्षाला ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध