Wednesday, January 21, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeकोकणपालशेत समुद्रकीनारी  "जेट स्की"

पालशेत समुद्रकीनारी  “जेट स्की”

‘गाज’ रिसॉर्टतर्फे साहसी खेळांच्या सुविधा

तवसाळ (वार्ताहर) ः गुहागर तालुक्यातील पालशेत गावच्या समुद्रकिनाऱ्यावर “गाज” रिसॉर्टतर्फे पर्यटकांसाठी “जेट स्की” खेळांची सुविधा निर्माण करण्यात आल्याने आता या किनाऱ्यावर पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे.

गाज रिसॉर्टचे श्री. जितेंद्र जोशी यांनी समुद्रपूजन करून जेट स्की सुविधेचे उद्घाटन केले. जेट स्की द्वारे समुद्रातील पहिल्या फेरीचा मान शाल्वी महेष तोडणकर आणि अर्णव पाटील या पालशेत गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आला.

पर्यटनाला चालना

या सुविधेमुळे पर्यटक पालशेतच्या समुद्रकिनाऱ्याकडे वळतील. त्यामुळे सद्गुरु बाळोजीनाथ महाराज (बाळोजी फकीरजी सुर्वे, मूळ गाव – तवसाळ) यांनी १०० वर्षांपूर्वी स्थापन केलेले दत्तमंदिर राज्यात प्रसिद्ध होणार आहे.  महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या पालशेतमधे आता पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे.

झाडे न तोडता सुविधा

पुण्यातील जीतेंद्र जोशी या उद्योजकाने पालशेत समुद्रकिनाऱ्या लगतच्या डोंगरामध्ये गाज रिसॉर्ट उभे केले आहे. परिसरातील जंगली झाडे न तोडता, सपाटीकरण न करता,  उपलब्ध जागेचा उत्कृष्ट वापर रिसॉर्ट बांधण्यासाठी करण्यात आला आहे. रिसॉर्टमधील सर्व मनुष्यबळ स्थानिक आहे. रिसॉर्ट सुरु झाल्यानंतर नियमितपणे पालशेत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता रिसॉर्ट व्यवस्थापनाद्वारे केली जाते. त्यामुळे पर्यटन विकासाबरोबर पर्यावरण संरक्षण आणि स्थानिकांना रोजगार ही या रिसॉर्टची वैशिष्ट्ये आहेत.

गाज रिसॉर्टने वर्षअखेरीस पालशेतच्या पर्यटन विकासात आणखी भर घातली आहे. सी स्टॉर्म व सी स्पिरिट या दोन नवीन जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळ पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरु होत आहे. सध्या सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत जेट स्कीद्वारे समुद्रसफरीचा आनंद पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

मान्यवरांची मांदियाळी

सागरी साहसी खेळांच्या पालशेत किनाऱ्यावरील सुविधेचे उद्‌घाटन  पारंपरिक पध्दतीने करण्यात आले. जीतेंद्र जोशी यांनी सुरुवातीला सागरपूजन केल्यानंतर दोन्ही जेटस्कींचे पूजन केले. त्यानंतर पालशेतचे उपसरपंच महेश वेल्हाळ, उद्योजक राजन दळी, लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू, गुहागर शहर व्यापारी संघटना अध्यक्ष नरेश पवार, पालशेतमधील हॉटेल व्यावसायिक पांडुरंग विलणकर, कल्पवृक्ष पर्यटन संस्थेचे अध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आंबा बागायतदार विलास ओक (महाजन), नरवणचे डॉ. कैलास वैद्य व सौ. मधुरा वैद्य,  सरपंच सौ. संपदा चव्हाण, पंकज बिर्जे, पद्मनाभ जोशी, नरेंद्र नार्वेकर, महेश तोडणकर, सौ. श्रीया सोमण, केदार सोमण, बाबासाहेब राशिनकर, नाखरे गुरुजी, सीताराम पटेकर, सौ. सारिका जोशी, पुरोहित राहुल ओक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मान

उद्घाटनानंतर जेटस्कीवरुन पहिली समुद्र सफर करण्याचा मान चवथीमध्ये प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झालेला अर्णव पाटील, तिसरीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी शालवी तोडणकर आणि जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारी पालशेतकर विद्यालयाची विद्यार्थीनी प्रगती जोशी यांना देण्यात आला. या जेट्स की चालवण्याकरता स्थानिक तरुणांना आवश्यक असणारे प्रशिक्षण देऊन त्यांना याकरता परिपूर्ण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक व परिसरातील तरुणांना रोजगारही निर्माण झाला आहे.

यावेळी मनोगत व्यक्त करताना जितेंद्र जोशी म्हणाले की, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तसेच पर्यटन विभागाच्या सर्व परवानग्या घेऊन ही सुविधा पालशेत समुद्रकिनारी आपण सुरु केली आहे. या कामासाठी मेरीटाईम बोर्डाचे क्षेत्रीय बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांचे मार्गदर्शन आणि योगदान मिळाले. या सुविधेमुळे पालशेतमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यातून रोजगार निर्मिती होईल.

गुहागर तालुका हळूहळू पर्यटन क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करू लागला आहे. यामुळे पर्यटकांना सुट्टीच्या दिवसात मौज मस्तीसाठी, निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी गुहागर एक उत्तम पर्यायी पर्यटन ठिकाण म्हणून प्रगतशील होत असताना गाज रिसॉर्टचे श्री जितेंद्र जोशी यांनी पालशेत सारख्या मध्यवर्ती ठिकाणी साहसी खेळांची केलेली सोय ही गुहागर तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी लक्षणीय गोष्ट ठरणार असल्याचे मत सर्व पर्यटन प्रेमींनी व्यक्त केले.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध