Wednesday, February 18, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमहाराष्ट्रउन्हात तळपती, थंडीत गारठती सावित्रीच्या लेकी

उन्हात तळपती, थंडीत गारठती सावित्रीच्या लेकी

सावित्रीबाईंच्या जयंतीदिनीच

अंगणवाडी सेविकांचे धरणे

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार

मुंबई ः देशभरात मंगळवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होत असतानाच मुंबईतील आझाद मैदानात सावित्रीच्या लेकी अर्थात अंगणवाडीसेविका हजारोंच्या संख्येने त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करत होत्या. मुंबईत रात्री गारठा असला तरी दिवसा मात्र कडक उन्ह असते. त्यामुळे सावित्रीच्या लेकी त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी  तळपत्या उन्हात ठाण मांडून होत्या.  आजही त्यांचे आंदोलन सुरू होते.

मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत धरणे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशमध्ये मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. काल (३ जानेवारी २०२३) त्यांच्या जन्मदिनीच राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सावित्रीबाईंचे मुखवटे धारण करून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील आणि सरचिटणील ब्रुजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात धरणे धरून बसल्या होत्या. मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत धरणे धरणार असल्याचा त्यांचा निर्धार आहे.

प्रलंबित मागण्या आजही धूळ खात पडून

महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडीत काम करून लहान मुलांना शिक्षणाचे बाळकडू देत त्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी अंगणवाडी सेविका विद्येचे अधिष्ठान तयार करीत असतात. त्याच आपल्या मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात धरणे आंदोलनास बसल्या हे विदारक सत्य राज्यकर्त्यांच्या नजरेसमोर येणे गरजेचे आहे. राज्यभरात जवळपास दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस शिशुवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतात. त्यांच्या प्रलंबित मागण्या आजही सरकार दरबारी धूळ खात पडल्या आहेत.
बहुतांश अंगणवाडीसेविकांनी सावित्रीबाई फुले यांचा कागदी मुखवटा धारण करून धरणे आंदोलनात सहभाग घेतला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होईपर्यंत अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धारच त्यांनी केला आहे.अंगणवाडीसेविकांनाच मदतनीसाची कामे

राज्यात सुमारे १३००० मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. त्यांना मदतनीस नसल्याने अंगणवाडी केंद्राची सर्व कामे एकटीलाच  करावी लागतात. मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा ५,९०० रुपये वेतन मिळते. त्यांना अंगणवाडी सेविकांप्रमाणेच मानधन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

मुख्य मागणी : मानधनात वाढ

राज्यात दोन लाख अंगणवाढी कर्मचारी असून अंगणवाडी सेविकांना दरमहा ८,५०० व मदतीसांना ४,४५० रुपये मानधन मिळते. मात्र त्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सुधारणा झालेली नाही. मानधनात वाढ व्हावी ही मुख्य मागणी आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल असे मंत्रिमहोदयांनी विधानसभेत आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासनच राहिले असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला.

राज्य सरकारकडून पिळवणूक

देशभरातील तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, केरळ व इतर राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जास्त मानधन मिळते. परंतु महाराष्ट्रात हे प्रगतिशील राज्य असूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कमी मानधन देऊन त्यांची पिळवणूक राज्य सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला.

मोबाईल बंद

पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत २०१९ मध्ये राज्यातील १,०५,५९२ अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. सदर मोबाईलच्या वॉरंटीचा दोन वर्षांचा कालावधी मे २०२१  मध्येच संपला. त्यामुळे हजारो मोबाईल नादुरुस्त व  बंड पडलेले आहेत. त्यामुळे सेविकांन अहवाल देणे अशक्य झाले आहे. त्यांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवरून अहवाल पाठविण्याची  सक्ती करण्यात येत आहे. त्यांना त्वरित नवीन मोबाईल देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात येत आहे.

हजारो पदे रिक्त
सध्या १,०९,७४२ अंगणवाड्यांमध्ये ४,०४२ सेविकांची, १२,२६७ मदतनीसांची व १००० मुख्य सेविका/पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. लाभार्थ्यांना योग्य लाभ वेळेवर मिळण्यासाठी सर्व रिक्त जागा त्वरित भरणे आवश्यक आहे, अशी संघटनेची मागणी आहे.
या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध