Sunday, May 18, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeकोकणगोवेले येथे अखंड हरिनाम सप्ताह

गोवेले येथे अखंड हरिनाम सप्ताह

मुंबई, दि. १८ ः माणगाव तालुक्यातील गोवेले येथे २३ ते २६ जानेवारी दरम्यान माघी गणेशोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे. चार दिवसांत दररोज पहाटे काकड आरती, सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सांस्कृतिक कार्यक्रम, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर व त्यानंतर संगीत भजन होईल.

अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त ह.भ.प. मुरकर महाराज (मु. नाईटणे), रायगड भूषण ह.भ.प. सुरेश महाराज गायकवाड (मु. देगांव), ह.भ.प. संजय महाराज साळवी (मु. चिपळूण), ह.भ.प. मारुती नागम महाराज (मुंबई), ह.भ.प. गोविंद महाराज गोरे (मु. देवाची आळंदी), ह.भ.प. शिवलीलाताई पाटील (मु. सोलापूर) यांचे कीर्तन होणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन रायगडभूषण ह.भ.प. श्री. मुरकर महाराज यांच्या हस्ते होणार आहे. दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १० वा. गणेश पूजा अभिषेक, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आणि दुपारी ३ वाजता विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच दि. २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम इंदापूर पंचक्रोशी रायगड दिंडी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या अमृतमयी ज्ञानगंगा किर्तनांचा समस्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांसह गोवेले ग्रामस्थांनी केले आहे.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध