Friday, April 18, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeकोकण`हर हर महादेव`च्या गर्जनेने भग्न तटबंदीलाही स्फुरण

`हर हर महादेव`च्या गर्जनेने भग्न तटबंदीलाही स्फुरण

तवसाळच्या विजयगडावर
शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

jayvijaynews : सध्या ढासळलेल्या अवस्थेत असला तरी शौर्याच्या खुणा जोपासत जीर्णोद्धाराची प्रतीक्षा करत असलेल्या तवसाळ गावच्या (तालुका-गुहागर) विजयगडावर `हरहर महादेव` `जय भवानी, जय शिवाजी` अशा गर्जना झाल्या आणि विजयगडाच्या त्या भग्न तटबंदीला जाग येत साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमांकडून छाताडावर झेललेले शेकडो वार, तोफगोळ्यांचा मारा, याच्या रक्ताळलेल्या आठवणीला जाग्या झाल्या. सुमारे साडेतानशे वर्षांनंतर तशाच घोषणा ऐकल्यानंतर पुन्हा दगडादगडात चैतन्य निर्माण झाले, स्फुरण चढले, पण… या गर्जना म्हणजे शत्रू सैन्याला ललकारी नव्हती, तर ज्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देदिप्यमान शौर्याला मानवंदना होती… त्यांच्या ३९३ व्या जयंतीदिनी.

गुहागर तालुक्याच्या उत्तर किनारपट्टीवर, शास्त्री नदी (जयगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावरच अतिप्राचीन काळी उभारलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या विजयगडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

चाणाक्ष युद्धनीतीची साक्ष

तटबंदी ढासळलेला, भग्नावस्थेत असलेला तवसाळचा विजयगड

कुशल संघटक, कुशल व्यवस्थापक, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या रयतेच्या राजाची चाणाक्ष युद्धनीती कशी असेल याची साक्ष म्हणजे शास्त्रीनदीचा संगम असलेल्या अरबीसमुद्राच्या मुखावरच जयगड आणि विजयगड असे असलेले दोन किल्ले. जयगड बंदरापासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या संगमेश्वराकडे कूच करण्यासाठी शत्रू सैन्याच्या जहाजांनी शास्त्री नदीत शिरकाव करताच जयगड आणि विजयगडावरून त्यांच्यावर शस्त्रास्त्रांचा मारा होत असे. त्यामुळे भांबावलेले शत्रूसैन्य खाडीत न शिरता मागच्या मागे अरबी समुद्रात पळत असे. अशा वेळी शत्रूसैन्याकडूनही जयगड आणि विजयगडावर शस्त्रास्त्रांचा मारा होत असे. त्या आठवणी कवटाळत आज विजयगड भग्नावस्थेत उभा आहे. मात्र अशा गर्जना ऐकल्या की तेथील दगडा दगडात पुन्हा चैतन्य निर्माण होते. ते दगड मनाशी म्हणत असतील… रयतेच्या या राजाची जयंती युगानुयुगे साजरी होऊदे, गडावर अशीच गर्जना होऊदे!

ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आणि भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या विशेष सहकार्याने गडाची साफसफाई करण्यात आली होती. या शुभ दिनी जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर १ मधील सर्व विद्यार्थ्यां आणि शिक्षकवृंद यांनी शाळेमध्ये शिवजयंती साजरी केल्यानंतर विजयगडाकडे सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनींसह कूच केली. गडाच्या अग्रणी बुरुजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तवसाळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रदीप सुर्वे, सरपंच प्रसाद सुर्वे, मंगेश गडदे, मुख्याध्यापक खंडगावकर, सहशिक्षक राठोड, विजय शिवलकर, अशोक पड्याळ या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी `छत्रपती शिवाजी महाराज की जय`, `जय भवानी जय शिवाजी`, `हर हर महादेव` अशा घोषणांनी विजयगडाचा परिसर दुमदुमून गेला. यानंतर जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर १ मधील विद्यार्थ्यांनी छत्रपतींबद्दल मनोगत, माहिती सर्वांसमोर अतिशय मोजक्या शब्दात मांडली. यावेळी पडवे येथील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि शिवप्रेमी विनायक कोळवणकर, काताळे ग्रामपंचायत सदस्य विनायक बारस्कर, दीपक बारस्कर, ग्रामविस्तार अधिकारी महेंद्र निमकर, तवसाळ बौद्धवाडीमधील जेष्ठ ग्रामस्थ रवींद्र पवार, मनोज कांबळे, तवसाळ भंडारवाड्यातील विलास सुर्वे, प्रशांत सुर्वे, पंकज सुर्वे, राजेश सुर्वे, उदय शिलधनकर, किरण गडदे, जगदीश गडदे, विदुल जाधव, विज्ञान सुर्वे, प्रीतम सुर्वे, महेश सुर्वे, अमोल सुर्वे, रत्नदीप गडदे, तेजस शिवलकर, शुभम सुर्वे, प्रणय सुर्वे, पुष्पराज सुर्वे, संकेत गंधेरे, सौ. सानवी सुर्वे, सौ. तन्वी गंधेरे, पोस्ट कर्मचारी देशमुखे आदी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. हेदवी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या संपूर्ण शिवजयंतीच्या महोत्सवामध्ये स्वरांगी गंधेरे आणि अस्मिता गंधेरे या दोन गंधेरे भगिनींनी परिधान केलेली ऐतिहासिक वेशभूषा सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी होती.

विजयगडाचा पुनर्विकास करा

शौर्याच्या खुणा जोपासत भग्नावस्थेत असलेला तवसाळचा विजयगड
तवसाळ ग्रामस्थांची मागणी

छत्रपती शिवराय हे स्वातंत्र्याचे प्रणेते होते. त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीतून देशाच्या स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली, असे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना म्हणाले. आता देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण झाले आहे. शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. पर्यटन मंत्री या नात्याने मंगलप्रभात लोढा महत्त्वाच्या किल्ल्यांच्या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने हजारो कोटी रुपये देत असतील, तर त्यांनी महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या तवसाळच्या विजयगडाचा पुनर्विकास आणि सुशोभीकरणासाठी काही कोटी रुपये जाहीर करून त्याला पुन्हा वैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी तवसाळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध