Friday, April 18, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeब्रेकिंग न्यूजशंभरावे नाट्यसंमेलन मुंबईत

शंभरावे नाट्यसंमेलन मुंबईत

विभागीय पातळीवरही होणार
संमेलनाचे कार्यक्रम

मुंबई, दि. ३० : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे होणारे शंभरावे मराठी नाट्यसंमेलन देशभरातील नागरिकांची सांस्कृतिक नगरी असलेल्या मुंबईत होण्याची दाट शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या मुंबईत संमेलनाचा मुख्य कार्यक्रम व्हावा, अशी सूचना परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांनी मांडली. त्यामुळे हे नाट्यसंमेलन मार्च २०२४ मध्ये मुंबईत व्हावे हे जवळजवळ निश्चित होणार आहे. तसेच या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल असतील, असेही स्पष्ट करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ आणि विश्वस्त मंडळाची संयुक्त बैठक शुक्रवारी (३० जून २०२३) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नाट्यपरिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व विश्वस्त उदय सामंत, शशशी प्रभू, गिरीश गांधी, अशोक हांडे आणि मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. सभेस राज्यभरातील नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते.

कसोटी क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू ९९ धावांपर्यंत पोहोचावा आणि शंभरावी धाव घेण्यासाठी त्याला काहींना काही अडचणींमुळे प्रतीक्षा करावी लागावी, तसे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे झाले. शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमाची रूपरेखा ठरल्यानंतर  २०२० मध्ये कोरोनाने भारतात शिरकाव केला आणि पुढील दोन वर्षे सारेच व्यवहार ठप्प झाले. रंगभूमीचा पडदाही उघडला नाही. त्यामुळे ९९ नाट्यसंमेलने झाल्यानंतर शंभराव्या नाट्यसंमेलनासाठी नाट्यरसिकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. मात्र आता निवडणूक होऊन नाट्य परिषदेचा कारभार नवीन नियामक मंडळाच्या हाती आला आहे. विक्रमी नाट्यप्रयोग केलेले कलाकार, निर्माते प्रशांत दामले नाट्य परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. रंगभूमीला भेडसावत असलेल्या अडचणींची त्यांना जाणीव असून, त्यातून मार्ग काढण्याचे कसबही अवगत आहे. त्यातून नाट्यपरिषदेचा कारभार सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा उघडलेला पडदा आणि नियामक मंडळ व विश्वस्त मंडळाच्या संयुक्त बैठकीत परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी शंभराव्या नाट्यसंमेलनाविषयी मांडलेल्या सूचना ही त्याची अनुभूती आहे, असे म्हणावयास हरकत नाही.

संमेलनाची रूपरेषा लवकरच आखण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. नियोजित १०० वे संमेलन उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी सभेत नियामक मंडळ सदस्य व विश्वस्तांनी सुचना मांडल्या. सभेचे अध्यक्ष शरद पवार यांनी १०० वे नाट्यसंमेलन विभागीय पातळीवर घेण्यात यावे आणि मुख्य कार्यक्रम मध्यवर्ती ठिकाणी साजरा व्हावा, अशी केलेली सूचना स्वागतार्ह ठरणार आहे. तसेच नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित नियामक मंडळ व कार्यकारी समितीने यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल दुरुस्तीचे काम हाती घेतले यासाठी सर्वोतोपरी मदत विश्वस्त मंडळ करेल, असे आश्वासनही शरद पवार यांनी दिले.

नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाच्या नूतनीकरणाचा अहवाल सादर केला. उर्वरित कामांसाठी पुढाकार घेऊन लवकरात लवकर नाट्यसंकुल प्रेक्षकांसाठी उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करताच सर्व विश्वस्तांनी यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी दुरुस्ती खर्चाचा अहवाल सभेपुढे सादर केला.

विश्वस्त, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, नाट्य परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येऊन , परिषदेच्या शाखांचे सक्षमीकरण पुढील काळात करण्यात यावे. नाट्यसंकुलाच्या दुरूस्तीचे काम वेगात चालू आहे. यास शासनही सहकार्य करील, असे आश्वासन सामंत यांनी दिले.
उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर सहकार्यवाह समीर इंदुलकर यांनी सदस्यांचे आभार मानले.

डॉ. जब्बार पटेल संमेलनाध्यक्ष

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९९ वे नाट्यसंमेलन २०१९ मध्ये नागपूर येथे झाल्यानंतर २०२० मध्ये होणाऱ्या शंभराव्या नाट्यसंमेलनासाठी जब्बार पटेल यांनी निवड करण्यात आली होती. कोरोनापूर्व काळात झालेल्या त्या निवडीनुसार शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल हेच असतील, असेही या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले.

झाडीपट्टी’ची ओळख सर्वत्र व्हावी

संग्रहित चित्र

रंगभूमीवर नाटक आणि संगीत नाटक, दशावतार असे नाटकांचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे वैदर्भीय शैलीतील नाट्यप्रकार ‘झाडीपट्टी’ रंगभूमीने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. या कलाप्रकाराचे सादरीकरण महाराष्ट्राच्या इतर भागात व्हावे. नाट्य परिषद या कलाप्रकारास उत्तेजन देईल, असेही या बैठकीत जाहीर करण्यात आले.
—-

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध