Sunday, February 9, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeदेश विदेशरसिका पावसकर हिला चीन विद्यापीठाची पदवी

रसिका पावसकर हिला चीन विद्यापीठाची पदवी

पदव्युत्तर शिक्षणासाठीही दिली १०० टक्के शिष्यवृत्ती

मुंबई : भारतीय असलेल्या रसिका प्रभाकर पावसकर हिने चीनच्या चंगचौ विद्यापीठाची इतर भाषिकांना चायनीज भाषा शिकविण्याच्या विषयात प्राविण्य मिळविले असून, चंगचौ विद्यापीठाने ‘उत्कृष्ट पदवी स्नातक, म्हणून तिचा गौरव केला. तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी तिला १०० टक्के शिष्यवृत्तीही जाहीर केली. रसिकाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रसिका पावसकर हिने चायना या देशांतील चंगचौ विद्यापीठ, पिपल्स रिप्बलिक ऑफ चायना येथे “चायनीज भाषा इतर भाषिकांना शिकवणे” ही पदवी प्राप्त केली आहे. सदर अभ्यासक्रम पूर्ण करतांना रसिकाने जे नैतिक, बौद्धिक, शारिरीक, सौंदर्यपूर्ण श्रमिक प्रगती विशेष साध्य केले त्याची दखल सदरील विद्यापीठाने घेतली आणि रसिकाला फक्त पदवी प्रदान करून थांबले नाहीत तर हजारो विद्यार्थ्यांमधून रसिका हिला त्यासाठी सन्मान प्रमाणपत्र प्रदान केले आणि चंगचौ विद्यापीठाची उत्कृष्ठ पदवीस्नातक म्हणून गौरव केला आहे.
विशेष म्हणजे तिला चीनमधील या विद्यापीठाने पदव्युत्तर शिक्षणासाठी (Master)१०० टक्के शिष्यवृत्ती प्रदान केली आहे.

रसिकाने तिच्या प्रशिक्षण काळातच परमपुज्य साने गुरुजी यांच्या “श्यामची आई” या पुस्तकाचे चिनी भाषेत अनुवाद करून भारतीय संस्कृतीची ओळख चिनी लोकांनाही करून दिली.

भारतीय तरुणाईच्या मनात आईविषयी प्रेम, वात्सल्य, भक्ती निर्माण करणारे ‘श्यामची आई’ हे पुस्तक आता चिनी भाषेतही उपलब्ध आहे. ‘अनाम प्रेम’ तर्फे रविवार २९ जानेवारी २०२३ रोजी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. एका व्रतस्थ व्यक्तीच्या मार्गदर्शनानुसार एका आईचे, पूज्य सानेगुरुजींचे व समाजाचे ऋण म्हणून रसिका पावसकर यांच्याकडून “श्यामची आई” चिनी भाषेत अनुवादित करण्यात आले.

संपूर्ण जगात विशेषत: चिन देशांत करोनाने धुमाकूळ घातला असताना धैर्य न सोडता आपले शिक्षण विशेष प्राविण्याने पूर्ण करणे, तेथील वास्तव्यात श्यामची आई या पुस्तकाचा चिनी भाषेतील अनुवाद करणे, भारतीय संस्कृती सातासमुद्रापार पोहचविण्यासाठी काम रसिका हिने केले आहे.
चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत चीनमध्ये राहून वाघिणीचे दूध पिणे असे ज्या भाषेबद्दल बोलता येईल अशा चायनीज भाषेमध्ये पदवी मिळवणे हे खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे, तसेच ते इतरांना प्रेरणादायी आहे.

या सर्व यशाच्या मागे सद्गुरूंचा आशीर्वाद आणि वडील प्रभाकर पावसकर, आई पूजा पावसकर यांनी दाखवलेला विश्वास मोलाचा ठरल्याचे पूजा सांगते. रसिकाच्या देदीप्यमान यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध