Friday, March 6, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमनोरंजन / क्रीडानभ मेघांनी आक्रमिले!

नभ मेघांनी आक्रमिले!

नभ मेघांनी आक्रमिले, तारांगण सर्वही झाकुनी गेले…!!

नभ मेघांनी आक्रमिले, तारांगण सर्वही झाकुनी गेले...!!
“ज्येष्ठ-आषाढात मेघांची दाटी, कडाडे चपला होतसे वृष्टी” असे पावसाळ्याच्या हंगामाचे वर्णन कवितेतून आढळते. मात्र ज्येष्ठ-आषाढ सरला, श्रावण (अधिक) मास सुरू झाला तरी अजून ढगांचा गडगडाट नाही की विजांचा कडकडाट नाही. पाऊस बरसतोय, पण तो मूकपणे… अशातच काही ठिकाणी ढग दाटून येतात. त्यावेळी परिसरात अंधारी वातावरण तयार होते.

मंगळवार १८ जुलै २०२३ पासून अधिक श्रावण मासाला आरंभ होत आहे. परंतु अजून म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. मुळातच पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतीची खोळंबलेली कामेही उशिरा सुरू झाली. नद्यांना पूर आले, धबधबे वाहू लागले असले तरी ते पावसाळ्याचा हंगाम उतरणीला (ओसरायला) लागेपर्यंत वाहत राहतील, असे वाटत नाही. कारण जमिनीत मुरेपर्यंत पाऊस अजून बरसलेला नाही.  धो धो बरसणाऱ्या पावसाचे अजून एक नक्षत्र बाकी आहे. त्याचे नाव पुष्य.

नक्षत्राला अनुरूप वाहन असल्यास पाऊस

पुष्य नक्षत्राचा कालावधी २० जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत आहे. खेड्याकडे या नक्षत्राला म्हातारा असे म्हणतात. थंडीत म्हाताऱ्या माणसाला जशी हुडहुडी भरते, त्याप्रमाणे या नक्षत्रात पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. मुसळधार पाऊस कोसळला तर खरोखरच हुडहुडी (थंडी) भरून येते.

या नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. पावसाळ्यात सर्वत्र डराँव, डराँव असा बेडकांचा आवाज येतो. बेडकांना पाऊस आवडतो. म्हणजेच पुष्य नक्षत्राचे वाहन बेडूक असल्याने या नक्षत्रात पाऊस मोठ्या प्रमाणात बरसणार, असा अंदाज आहे. तसेच त्याच्या पुढचे आश्लेषा नक्षत्र आहे.

आश्लेषाची हुलकावणी

आश्लेषा नक्षत्र म्हणजे पाऊस आला आला आणि गेला गेला अशा प्रकारे क्षणात येतो आणि क्षणात जातोही. या नक्षत्राचा कालावधी आहे ३ ऑगस्ट ते १७ ऑगस्टपर्यंत. १७ ऑगस्ट रोजीच निज (नेहमीचा, खरा) श्रावण मास (महिना) सुरू होतो. या नक्षत्रात ऊन-पावसाचा खेळ असतो. धो धो बरसणाऱ्या भीतीदायक पावसाचा काळ ओसरून आनंददायक पावसाळा सुरू होतो. या नक्षत्राचे वाहन आहे म्हैस. म्हशीलाही पाण्याची (पावसाची) आवश्यकता असते. त्यामुळे या नक्षत्रात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. म्हणजे आश्लेषा नक्षत्र हुलकावणी देऊ शकते.  या नक्षत्राला साजेसा (सरसर, आला आला गेला गेला) पाऊस झाला तर याच नक्षत्रात मनमोहक, विलोभनीय अशी कितीतरी विशेषणे लावली तरी कमीच पडतील अशा इंद्रधनुष्याचेही दर्शन घडते. सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. मनसोक्त चरायला मिळाल्याने खिल्लारेही आनंदित झालेली असतात. श्रावण महिन्यापासून सणांनाही सुरुवात होते. श्रावण मासाचे वर्णन कवीने फारच सुंदररीत्या केले आहे.

श्रावण मासी हर्ष मानसी

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज आहाहा तो उघडे
तरुशिखरावर, उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे… 

आता पावसाविषयी अंदाज व्यक्त करणारी आधुनिक यंत्रणा हवामान खात्याकडे आहे. त्यामुळे पाऊस जास्त बरसण्याची शक्यता असली की हवामान खाते सतर्कतेचा इशारा देते. त्यामुळे नदीकाठचे, समुद्रकिनाऱ्यानजीकचे, डोंगराच्या आसऱ्याने राहणारे, दरडींच्या जवळपास असणारे नागरिक सावध होतात. पण पूर्वी अशी आधुनिक यंत्रणा नव्हती, तेव्हा नागरिक कसे सतर्क व्हायचे, असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिकच आहे.

निसर्गच तारक…

पूर्वीच्या काळी कावळे घरटी बांधायची तयारी करू लागले, काट्याकुटक्या गोळा करायला लागले की समजायचे पाऊस जवळ आला. समुद्र फेसाळला ती समजायचे पाऊस लवकर येणार. कावळ्यांनी झाडाच्या शेंड्याला घरटे बांधले की, समजावे यंदा पाऊस कमी, तर झाडाच्या मध्यभागी घरटे बांधले की समजायचे यंदा पाऊस खूप पडणार. आकाशात घारी (घार नावाचा पक्षी) आवाज करत विहार करू लागल्या, पंख असलेले (मुंग्यांसारखे) कीटक घरात भिरभिरायला लागले की पाऊस भरपूर पडणार असेही समजले जायचे आणि लोक सतर्क व्हायचे.

आज पावसाचा अंदाज व्यक्त करणारी आधुनिक यंत्रणा असली तरी कधी कधी अंदाज चुकतो. नुकसान व्हायचे ते होतेच. तसे पूर्वीही अंदाज चुकायचे. नुकसान व्हायचे. शेवटी सर्वकाही निसर्गावर अवलंबून आहे.

 

 

 

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध