‘अनाम प्रेम’च्या कार्याची
टपाल कर्मचाऱ्यांकडून प्रशंसा

मुंबई : जगात सामाजिक बांधिलकी फार मोलाची असते. त्यामुळेच जग एकमेकांशी बांधले जाते. त्यातूनच द्वेषभावना लोप पावते आणि माणुसकीचे झरे निर्माण होतात. स्नेहभाव वृद्धिंगत होतो. म्हणूनच सामाजिक बांधिलकी मानून ‘अनाम प्रेम’ परिवाराने टपाल कर्मचाऱ्यांचे केलेले कौतुक हे प्रशंसेस पात्र ठरते, असे उद्गार टपाल कर्मचाऱ्यांनी काढले.
नुकत्याच झालेल्या जागतिक टपाल दिनानिमित्त ‘अनाम प्रेम’ परिवाराने सर्व देशभरात टपाल कार्यालयात जाऊन त्यांच्या कामाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या कृतज्ञतेने भारावलेल्या टपाल कर्मचाऱ्यांनी ‘अनाम प्रेम’ परिवाराला धन्यवाद दिले. वर्षभरात टपाल कर्मचारी; विशेषत: पोस्टमन अनेक अडचणींशी तोंड देत पत्ररूपाने घरोघरी सुखदुःखाच्या गोष्टी पोहोचवीत असतात. आज समाजमाध्यमे झाली आहेत. त्यामार्फत प्रत्येकाला त्याच्या सुखदुःखाच्या घटना कळत असतात. तरीही प्रत्येक जण टपालाची वाट पाहत असतो. कारण त्यांचा आजही टपालावर विश्वास आहे, असे सांगतानाच आज टपाल विभागाने कात टाकली आहे. त्यांनीही डिजिटल कारभाराकडे लक्ष पुरविले आहे. टपालाला विलंब न होता ते वेळेत पोहोचते. त्यामुळे देशभरातील नव्हे; तर जगाचा टपालावर विश्वास आहे, त्यामुळे जागतिक टपाल दिन साजरा करण्यात येतो, असे प्रत्येक टपाल कार्यालयात सांगण्यात येते.

प्रशंसेमुळे उत्साहात वाढ
घरोघरी पत्र वाटप करताना एक दिवस कौतुकाची थाप मिळणे म्हणजेच टपाल कर्मचाऱ्यांच्या कामाची प्रशंसा करण्यासारखेच आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढतो आणि ते अधिक जोमाने काम करू लागतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘अनाम प्रेम’च्या कार्याला वंदन

दहिसर येथील टपाल कर्मचाऱ्यांनी अनाम प्रेम परिवाराचे कौतुक करताना म्हटले आहे की अनाम प्रेम परिवाराचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. आज देशभरात नव्हे; तर जगात अनाम प्रेम परिवाराचे लोक विखुरलेले आहेत आणि तेथे ते त्यांचे कार्य प्रामाणिकपणे करत असतात. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे अनेक लोक या परिवारात स्वतःहून सहभागी झालेले आहेत. त्यामुळे लुळे-पांगळे, मुके-बहिरे, परित्यक्ता, घटस्फोटिता, यांच्याबरोबरच समाजासाठी आवश्यक; तरीही उपेक्षित असलेले घटक म्हणजे शहर पोलीस, वाहतूक पोलीस, सफाई कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, जखमी सैनिक, सैनिकांच्या विधवा यांचाही अनाम प्रेम परिवारातर्फे सत्कार केला जातो. त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला जातो. या कार्यात सर्वजण झोकून देत काम करतात. त्यांच्या कार्यालाच खरे वंदन केले पाहिजे.

प्रेमसिंचनाने स्नेहभाव वृद्धिंगत
आराम प्रेम परिवारातर्फे घटनेशी प्रामाणिक राहून वर्षभरात जवळजवळ सुमारे 52 आणि त्याहून अधिक कार्यक्रम राबविले जातात. अक्कल आलेल्या मुलापासून वयोवृद्धापर्यंत विविध प्रकारचे लोक समर्पण भावनेने अनाम प्रेम परिवारमध्ये काम करत आहेत आणि उपेक्षितांवर आपुलकीचे, प्रेमाचे सिंचन करून माणसा-माणसातला स्नेहभाव वृद्धिंगत करत आहेत.

कौतुकाची थाप : जबाबदारीची जाणीव
दहिसर टपाल शाखेचा एक कर्मचारी म्हणतो की, अनाम प्रेम परिवार म्हणजे ज्यांना नाव नाही असे. नावात काहीही नसते आणि नावात बरेच काही असते. नाव हे शरीराचे संबोधन आहे. अनाम प्रेम परिवाराच्या सभासदांनी आम्हा कर्मचाऱ्यांना केलेला चरणस्पर्श ही आमच्या कामाप्रति कृतज्ञता आहे. कारण जीवात्मा हाच शिवात्मा आहे. आम्ही आमचे काम करतो. त्याचा पगार घेतो. मात्र आमच्या कामाची प्रशंसा करून पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आमचा

उत्साह वाढविणारी आहेच, पण जबाबदारीची जाणीव करून देणारीही आहे. तुम्ही केलेल्या कौतुकास पात्र राहून यापुढेही अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करू, असे वचन देतानाच, दर वर्षी आमच्याकडे या आणि आमच्या कामाची पोचपावती म्हणून दोन चांगले शब्द आणि पाठीवर कौतुकाची थाप द्या, अशी अपेक्षाही या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी पोस्ट मास्तरांचा आणि सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.