Sunday, November 10, 2024

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeकोकणप्रशासकीय सेवेत यायचंय? हा मंत्र जपा!

प्रशासकीय सेवेत यायचंय? हा मंत्र जपा!

प्रशासकीय अधिकारी सत्यवान रेडकर यांनी
विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र
कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक प्रशासकीय अधिकारी श्री. सत्यवान रेडकर यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष श्री. भरत शेटे. सोबत (डावीकडून) संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मयेकर, प्रमुख पाहुण्या सौ. तृप्ती हातिसकर, प्रमुख पाहुणे श्री. नरेंद्र शिरधनकार, विश्वस्त श्री. नविनचंद्र बांदिवडेकर. (पाठीमागे) अरविंद सुर्वे, विलास सुर्वे
कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक प्रशासकीय अधिकारी श्री. सत्यवान रेडकर यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष श्री. भरत शेटे. सोबत (डावीकडून) संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मयेकर, प्रमुख पाहुण्या सौ. तृप्ती हातिसकर, प्रमुख पाहुणे श्री. नरेंद्र शिरधनकार, विश्वस्त श्री. नविनचंद्र बांदिवडेकर. (पाठीमागे) अरविंद सुर्वे, विलास सुर्वे

मुंबई ः अनेक विद्यार्थ्यांना राज्य अथवा केंद्रीय प्रशासकीय सेवेत यायचे असते. कोणाला पोलीस अधिकारी व्हायचे असते. कोणाला कलेक्टर व्हायचे असते. पण योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांची वाट खडतर बनते. इतकेच नव्हे तर खासगी क्लासेसची भरमसाट फी ऐकली की अनेकजण “तो मार्ग नको रे बाप्पा!” असे म्हणत त्यामार्गाने जाण्याचे टाळत अखेरीस खासगी नोकरी पत्करतात. मात्र या पृथ्वीतलावर असा एक मसिहा अवतरलाय… की त्याने प्रशासकीय सेवेत येण्यासाठी साधा आणि सोपा मंत्र दिलाय. शिवाय मार्गदर्शन मोफत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांचे नाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सत्यवान यशवंत रेडकर. आयपीएस, यूपीएससी परीक्षा पास होण्यासाठी त्यांनी अगदी सोपा मंत्र दिला आहे…. “जो वाचेल तोच वाचेल” या न्यायला धरून दररोज न चुकता वाचन. भाषा सुधारण्यासाठी पुस्तकांचे वाचन, दररोजच्या महत्वाच्या घटनांची नोंद ठेवण्यासाठी वर्तमानपत्रांचे वाचन आणि २ ते ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ ठेवणे हाच त्यांचा साधा आणि सोपा मंत्र आहे.तिमिरातून तेजाकडे
सत्यवान रेडकर यांची “तिमिरातून तेजाकडे” ही संस्था असून विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या अंधकारातूनन ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे महत्वाचे कार्य ही संस्था करते. गेल्या अडीच वर्षात या संस्थेच्या माध्यमातून सत्यवान रेडकर यांनी सुमारे सव्वादोनशे व्याख्याने दिली. एकेका व्याख्यानाचे पैशात मूल्य करायचे झाल्यास ते चाळीस हजार रूपये आहे. मात्र परप्रांतातील रहिवासी आपल्या राज्यात येऊन प्रशासकीय सेवा बजावण्यापेक्षा आपल्याच राज्यातील; विशेषतः दहावी-बारावीच्या परीक्षेत उच्चस्तरीय गुणांनी आणि मोठ्या संख्येने उत्तीर्ण होणाऱ्या कोकणातील विद्यार्थ्यांनी यूपीएससी; एमपीएससीच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत यावे यासाठी रेडकर यांचा कटाक्ष असतो.

“कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी”च्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९७.०२ % गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कु. मालविका मिलिंद मालगुंडकर या विद्यार्थीनीचा प्रमाणपत्र,रोख पारितोषिक, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन गुणगौरव  करताना संस्थेचे अध्यक्ष श्री .भरत वासुदेव शेटे .

कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या १३३ वर्षे जुन्या संस्थेमार्फत होणारा विद्यार्थ्यांचा ९७ वा गुणगौरव सोहळा नुकताच (रविवार २९ ऑक्टोबर २०२३) संस्थेच्या दादर येथील कित्तेभंडारी सभागृहात पार पडला. यावेळी सत्यवान रेडकर हे विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी मुंबई महापालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षिका राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या तृप्ती दशरथ हातिसकर, जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी डी आर्ट पदवी घेतलेले आणि बीए फिलॉसॉफी व एलएलबीची पदवी घेतलेले नरेंद्र चंद्रकांत शिरधनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दहावी-बारावी, पदविका उत्तीर्णांची आणि त्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पालकांची मोठी उपस्थिती हे या गुणगौरव सोहळ्याचे खास वैशिष्ट्य ठरले.

सत्कारमूर्ती विद्यार्थी
सत्कारमूर्ती विद्यार्थी 

योग्य मार्गदर्शनाचा अभाव

भारत सरकारच्या सीमाशुल्क विभागातील कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर असणारे सत्यवान यशवंत रेडकर यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महत्त्वाच्या घटनांची नोंद ठेवण्यासाठी रोजचे वृत्तपत्रवाचन आणि २ ते ३० पर्यंतच्या पाढ्यांचे पाठांतर या दोन बाबी विद्यार्थ्यांना यूपीएस, आयपीएस परीक्षांत उत्तीर्ण होण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. स्पर्धा परीक्षा किंवा प्रशासकीय सेवा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने दहावी-बारावीत प्राधान्य क्रमाने उत्तीर्ण होणारे राज्यातील विद्यार्थी तसेच कोकणातले हुशार विद्यार्थी राज्याच्या किंवा केंद्राच्या प्रशासकीय सेवेत कुठेच दिसत नाहीत. यामागे या परीक्षांबाबत त्यांच्या मनात निर्माण केलेली भीती, किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते खितपत पडतात, अशी खंत रेडकर यांनी व्यक्त केली.

डॉ. जिचकार यांच्यानंतर रेडकर

नववीत नापास होऊनही वेटर, केसांसाठी लागणाऱ्या पिना विकणे असली कामे करून खडतर प्रयत्नाने रेडकर उच्च विद्याविभूषित झाले. माजी मंत्री दिवंगत डाॅ. श्रीकांत जिचकार यांच्यानंतर जास्त पदव्या घेतलेले अशी रेडकर यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांना या अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर काढण्याचा त्यांनी विडाच उचलला. त्यासाठी त्यांनी त्यांच्या घरापासून सुरुवात केली. पत्नीला प्रशासकीय सेवेत आणले आणि नंतर मुंबईपासून संपूर्ण कोकणभर त्यांनी ज्ञानदानाचे विनामूल्य कार्य सुरू केले. एकेका व्याख्यानाची फी ४० हजार रुपये असताना रेडकर यांनी मात्र मागील अडीच वर्षांच्या काळात सव्वादोनशेच्या आसपास विनामूल्य व्याख्याने दिली आहेत. हसत खेळत मार्गदर्शन करणे ही त्यांच्या व्याखानाची हातोटी आहे. त्यामुळेच तीन-साडेतीन तास मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे विद्यार्थी त्यांचे व्याख्यान ऐकत असतात.

उगाचच भीती कशाला?
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रेडकर म्हणाले की, स्पर्धा परीक्षा किंवा प्रशासकीय सेवेच्या परीक्षा याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात उगाचच भीती निर्माण केली जाते. कोणत्याही परीक्षेसाठी अभ्यास तर करावाच लागतो. पण मोठ्या रकमांची फी असलेले क्लासेस वगैरे लावण्याची काही गरज नसते. प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश करायचा असेल तर महत्वाच्या घटनांची नोंद आणि २ ते ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी दररोज वर्तमानपत्र वाचणे आवश्यक आहे. ही तयारी असली की आपण अर्धी परीक्षा पास झालेले असतो. अर्धी परीक्षा पास होण्याची हमी माझ्याकडे सोपवा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

५५व्या वर्षीही अभ्यासाचा ध्यास
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षिका तृप्ती हातिसकर यांनी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याचे सांगतानाच स्वतः काबाडकष्ट करून शिक्षण घेतल्याचे नमूद केले. तसेच वयाच्या ५५ व्या वर्षी पदवीधारक झाल्याचे सांगत मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.

कलेमुळे शिक्षणाला तजेला

नरेंद्र शिरधनकर यांनी शिक्षणाबरोबरच एका कलेचा अभ्यास करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित केले. कोणतेही शिक्षण घेतले तर ते वाया जात नाही. आपल्या अंगी एखादी कला असेल तर शिक्षणाला तजेला मिळतो, याचा आवर्जून उल्लेख केला.

“कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी” संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य

विश्वस्त नाविनचंद्र बांदिवडेकर यांनी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळींच्या कार्याची माहिती सांगतानाच छत्रपतींच्या आरमारात मायनाक भंडारी यांचे असलेले महत्त्वाचे स्थान याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी कार्याध्यक्ष भूपेंद्र देवकर यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी गुणगौरव समितीचे समितीचे प्रमुख संतोष मांजरेकर यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष भरत शेटे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
गुणगौरव समितीचे संजय भरणकर, अरविंद सुर्वे, पंकज मोरे, दत्तात्रय सुर्वे यांनी संस्थेच्या सर्वांचे सहकार्य घेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध