Monday, March 17, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमहाराष्ट्रअनाम प्रेम परिवाराचा सैनिकांसाठी दिवाळी फराळ

अनाम प्रेम परिवाराचा सैनिकांसाठी दिवाळी फराळ

तनमन अर्पून बनविलेला
आपुलकीचा स्नेह दरवळणारा
सीमेवरील सैनिकांसाठी दिवाळी फराळ

सैनिकांसाठी लाडू बनविण्यात तल्लीन झालेल्या आनंदी चेहऱ्याच्या अनाम प्रेम परिवाराच्या बंधू-भगिनी

अनाम प्रेम परिवाराचा उपक्रम

मुंबई : आधीच झगमगत्या मुंबईत दिवाळीचा झगमगाट डोळे दीपवणारा आहे. विद्युतमाला लकलकत आहेत. आकाश कंदील झुलत आहेत. फटाक्यांची आतषबाजी चालली आहे. दुकाने सजलेली आहेत. मिठाईच्या दुकानांतही दिवाळीचा गोडवा वाढवणारी खरेदी जोरात चालली आहे. याच वातावरणात मुंबईत मालाड येथे चिंचोलीबंदर परिसरातील कोळी समाज हॉलमध्ये दिवाळीचा फराळ बनविण्यात शेकडो हात मग्न होते. ते कुठल्या दुकानदाराची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी धडपडत नव्हते, तर कुटुंबापासून दूर असणाऱ्या देशाच्या रक्षणकर्त्या सैनिकांना दिवाळीचा फराळ वेळेत गेला पाहिजे, यासाठी ते हात झटत होते. अर्थात असा फराळ ते विकत घेऊनसुद्धा पाठवू शकले असते. पण फराळात प्रेमाचा स्पर्श आणि आपुलकीचा गोडवा यायला हवा म्हणून “अनाम प्रेम परिवार”च्या सदस्यांकडून सुमारे पंधरा दिवस फराळ बनविण्याचे काम चालले होते. फराळ बनवून त्याचे पॅकिंग होऊन ते सीमेवर पोहोच झाले तेव्हा अनामप्रेमी सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सैनिकांचे मनोबल वाढवणारा होता.

फराळाची गणती आणि काळजी घेताना

अंध, अपंग, लुळेपांगळे, कर्णबधिर, मतिमंद अशा अनेक प्रकारच्या मुलांना, व्यक्तींना प्रेमाचे सिंचन करून त्यांच्यात आपुलकीची भावना निर्माण करणारे अनामप्रेमी हे शत्रूपासून देशातील जनतेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता मानतात. म्हणूनच गणेशोत्सवात ते सैनिकांचे पूजन करतात. जखमी सैनिकांबाबत आदर व्यक्त करणे, धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या वीरपत्नीचा सन्मान करून आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असा विश्वास देतात. आज सैनिक आहेत म्हणून देश सुरक्षित आहे. कुटुंबापासून कोसो मैल दूर राहून शिर तळहातावर घेत देशवासियांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करता येत नसली, तरी दिवाळीत देशवासियांना आपली आठवण आहे, आमच्या कर्तव्याप्रति ते कृतज्ञ आहेत, म्हणूनच आपुलकीच्या भावनेने बनवलेल्या प्रेमाच्या फराळाचा सुगंध दरवळेल तेव्हा सारा देश हेच आपले कुटुंबीय आतून ते आपल्याबरोबर असल्याच्या भावनेने त्यांचे मनोबल निश्चितच वाढेल आणि देश कायम सुरक्षित राहील, या भावनेने अनाम प्रेम परिवारातर्फे सैनिकांसाठी फराळ बनविण्यात येतो.

अनाम प्रेम परिवारातर्फे सन २०१८ पासून सीमेवर

बॉक्स तयार करताना अनामप्रेमी

प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत असलेल्या आपल्या सैनिक बांधवांना दिवाळीचा फराळ पाठवण्यात येतो. सीमेवर सैनिक आहेत म्हणून आपण आपले सर्व सण आनंदाने व शांतपणे साजरे करू शकतो. सिमेवरील जवान सणांचा आनंद आपल्या परिवारासोबत साजरा करु शकत नाही, म्हणूनच आम्ही अनाम प्रेमी दिवाळीत त्यांना घरी बनवलेला फराळ पाठवतो. एका छोट्या बॉक्समध्ये दोन रव्याचे लाडू , चकल्या , शंकरपाळी व चिवडा पॅकिंग करून पाठवला जातो. सोबत एक प्रिंट केलेले व स्वहस्ते तयार केलेले दिवाळी भेटकार्ड पाठविण्यात येते. ज्यामध्ये ते आपल्या देशासाठी व समाजासाठी करत असलेल्या त्यागाबद्दल, अतिदुर्गम भगत सीमेवर करत असलेल्या धैर्यशील कामाबद्दल कौतुक करण्यात येते व धन्यवाद सुध्दा दिले जातात.

बनविलेला फराळ चांगल्या पद्धतीने पॅकिंग करण्याची काळजी घेताना अनाम प्रेम परिवाराचे सदस्य

यावर्षी फराळाचे जवळजवळ १५००० तयार करण्यात आले. हा फराळ बनविण्यासाठी दहा-बारा वर्षाच्या मुलांपासून ८०-९० च्या आसपास वय असलेले सुद्धा तनमनाने यात गढून गेले होते. जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे अनाम प्रेमी व त्यांचे सहकारी यासाठी सातत्याने कार्यरत होते. हे फराळाचे बॉक्स जोधपूर, बागडोरा, गुवाहाटी, लेह, लडाख, चंदिगड, श्नीनगर, जम्मू, अश्या विविध २० सीमांवरील जवानांना पाठवण्यात आले.
आम्हाला आमच्या सैनिकांचा अभिमान
आम्हाला आमच्या सैनिकांचा अभिमान आहे. त्यांच्यावरील प्रेमामुळेच कुटुंबापासून दूर असलेल्या सैनिकबांधवांपर्यंत घरगुती फराळ पोहचावा, त्यामागील प्रेम व कृतज्ञता पोहचवावी, त्यांच्यावर प्रेमसिंचन करावे, म्हणून आम्ही स्वहस्ते बनविलेला फराळ सैनिकांना पाठवतो, असे असे अनाम प्रेम परिवाराच्या सदस्यांनी सांगितले.
पोलिसांबरोबर फराळ
वाहनांच्या वाढत्या गर्दीत वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस आहेत, म्हणून आपल्या वाहनांना जागा मिळते. आपण वेळेत घरी पोहोचतो. आपण कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करत असताना वाहतूक पोलीस बांधव/भगिनी मात्र रस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण करीत असतात. शहर पोलीस लोकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवता. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. त्यामुळे मुंबईतील जनता हेच आपले कुटुंब ही भावना वृद्धिंगत व्हावी, आणि पोलिसबंधाव/भगिनींच्या कामप्रति कृतज्ञात व्यक्त व्हावी यासाठी अभ्यंगस्नानादिवशी वाहतूक पोलिसांबरोबर आणि दिवाळी पाडव्याला शहर पोलिसांबरोबर अनाम प्रेमींतर्फे दिवाळी फराळ करण्यात येतो.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध