राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहा याचि देही, याचि डोळा
मुंबई, दि. १९ – अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या २२ जानेवारीला होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम संपूर्ण पाहता यावा तसेच श्री रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा याचि देही याचि डोळा पाहता यावा यासाठी राज्य शासनाने सोमवारी (२२ जानेवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
प्रभू रामचंद्र मंदिराचा लोकार्पण सोहळा सर्वाना पाहता यावा म्हणून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईचे कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती. राज्य शासनाने त्यांची मागणी मान्य करत राममंदिर लोकार्पण सोहळा आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा राज्यातील जनतेला याचि देही याचि सोहळा पाहण्याचे भाग्य लाभू दिले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने या दिवसासाठी अर्ध्या दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला पूर्ण एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून देखील 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचा 22 जानेवारीचा लोकार्पणाचा दिवस हा दिवाळी म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या दिवशी देशभरात दीपावली साजरी करण्यात यावी, घरोघरी दिवे लावण्यात यावेत, दीपोत्सव साजरा करण्यात यावा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. प्रभू श्रीराम लंका जिंकून १४ वर्षांचा वनवास करुन अयोध्येत परत आले होते, तेव्हा अयोध्यावासीयांनी दिवाळी साजरी केली होती. अगदी तशाच प्रकारचे सेलिब्रेशन करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. हा दिवस दिवाळी म्हणून साजरा करण्यासाठी गरिबांना आनंदाचा शिधाही देण्यात आला आहे.
अयोध्येत राममंदिर लोकार्पणाचा भव्यदिव्य कार्यक्रम
अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पणाचा कार्यक्रम हा अतिशय भव्यदिव्य असा असणार आहे. या कार्यक्रमाला देश-विदेशातील एकूण 6 हजार व्हीआयपींची उपस्थिती असणार आहे. यामध्ये सिनेकलाकार, आंतरराष्ट्रीय खेळाडू, विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा समावेश असणार आहे. हा सोहळा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक व्हावा यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून अयोध्या नगरी सजवली जात आहे. अयोध्येत त्यासाठी अतिशय जय्यत तयारी सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना मंदिराच्या लोकार्पणाच्या दिवशी अयोध्येत येऊन गर्दी करु नये, असे आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे काही नेत्यांकडून देशभरात ठिकठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती बनवण्यात येत आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या दिवशी रामभक्त अशा प्रतिकृतीच्या ठिकाणी जाऊन रामलल्लांचं दर्शन घेऊ शकणार आहेत.