दक्षिण मुंबईत वाहतुकीत मोठे बदल
मुंबई ः टी-२० विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ आज मुंबईत दाखल होणार असून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी त्यांची शोभा यात्रा काढण्या येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत. त्यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत.
शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर एन. एस. मार्गाची उत्तर व दक्षिण वाहिनी एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वीर नरिमन रोड चर्चगेटपासून किलाचंद चौकपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, दिनशॉ वाच्छा मार्ग डब्ल्यू आय. ए चौकपासून रतनलाल बुबनाचौकापर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. हुतात्मा चौकापासून वेणूताई चव्हाण चौकापर्यंत मादाम कामा रोड बंद ठेवण्यात येणार आहे. बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग व विनय शहा मार्गही वाहतुकींसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
नारिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहेत. मुंबई किनारी मार्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वरील सर्व मार्गांवर रुग्णावाहिका, पोलिसांची वाहने, अग्निशमन दल व अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची वाहने वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सायंकाळी ५ नंतर आयोजित शोभायात्रेसाठी पोलीस वानखेडे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहे. त्यासाठी पाच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी येणाऱ्या चाहत्यांनी रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.