अजितदादा पवार करणार पक्षाची नव्याने बांधणी
मुंबई ः लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) अजितदादांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी(NCP) पेक्षा राष्ट्रवादी शरदचंद्र (Sharad Pawar) पवार पक्ष सरस ठरला आहे. त्यामुळे अजितदादा गटातील आमदार अस्वस्थ झाले आहेत. हे आमदार पक्ष सोडून जाण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा असून त्यांचा कल शऱद पवार यांच्याकडे असल्याचे दिसत आहे. त्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार यांनी परखड विधान केले. अनौपचारिक गप्पांच्या ओघात त्यांनी पक्षाची नव्याने बांधणी करण्याची तयारी केली असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच माझ्यासोबतचे सध्याचे आमदार परत गेले तरी हरकत नाही. नव्या लोकांना संधी देऊ, असे मोठे विधान अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधान परिषदेत विजय मिळाल्याने महायुतीत उत्साह आहे. या उत्साहाच्या भरातच महायुतीचे नेते आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. फेक नरेटिव्ह पुसून टाकण्याच्या तयारीला लागले आहेत. अजितदादा गट तर विधानसभेच्या 288 जागांचा सर्व्हे करणार आहे. पक्षाची ताकद ओळखून त्या त्या जागांवर उमेदवार देण्याची तयारी करणार आहेत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना 54 पेक्षा अधिक जागांवर आमचा दावा असेल असे अजितदादा गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विधान परिषद निवडणुकीत अजितदादा गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत केवळ आमदारांनी मतदान करायचे असते. पण लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला नाकारले आहे. अजितदादा गटाचा केवळ एकच खासदार निवडून आला आहे. तर दुसरीकडे जनतेचा कल अजूनही शरद पवार गटाकडे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अजितदादा गटाचे आमदार शरद पवार यांना जाऊन मिळण्याची शक्यता आहे. त्यावर अजितदादांनी परखडपणे भाष्य केले आहे. माझ्यासोबतचे सध्याचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही. नव्या लोकांना संधी देऊ, असे मोठे विधान अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केले. त्यामुळे अजितदादांना नेमके कुणाला सुनवायचे आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
विधान परिषद निवडणुकीत कोणत्याही आमदाराला कोणतेही प्रलोभने दिले नाहीत. अनेक आमदारांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी मला मतदान केले, असा दावा अजित पवार यांनी केला. “तुमच्यावर माझे लक्ष असेल” एवढेच आमदारांना म्हणालो, असेही अजितदादा यांनी स्पष्ट केले.
…तर दोन्ही खासदार महायुतीचे असते
यावेळी अजितदादांनी लोकसभेच्या जागा वाटपातील त्रुटीही लक्षात आणून दिल्या. दक्षिण नगर आणि माढ्याची जागा भाजपने आम्हाला दिली असती तर दोन्ही खासदार महायुतीचे असते. दक्षिण नगरमधून निलेश लंके आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील खासदार असते, असा दावा त्यांनी केला.