मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन
मुंबई, दि. १५ ः भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन मुंबईसह महाराष्ट्रात देशगौरवाचा स्वाभिमान उराशी बाळगत मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना श्री. लोढा यांनी देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान असून राज्य शासनामार्फत विविध लोकोपयोगी योजना सुरू असल्याचे सांगितले. राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, स्थानिक आमदार झिशान सिद्दिकी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, नागरिक, शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.लोढा यांनी स्वातंत्र्य सैनिक, उपस्थित विद्यार्थी, नागरिक, अधिकारी यांच्याशी संवाद साधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिष्यवृत्ती परीक्षांमधील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रमाणपत्र योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे महसूल पंधरवड्यानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला.
‘वर्षा’ निवासस्थानाच्या प्रांगणात
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. ध्वजारोहण कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. त्यानंतर नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात महसूल पंधरवडा २०२४ ची सांगता करण्यात आली.
यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सैनिक, नागरिक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी मुंबई शहर येथील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2024 मधील पारितोषिक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते
मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण
मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयातील आजी-माजी न्यायाधीश, वकील व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते
विधान भवन येथे ध्वजारोहण
विधान भवन येथे विधानसभेचे अध्यक्ष, अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे माजी सदस्य ॲड. जयप्रकाश बाविस्कर, विधानसभेचे माजी सदस्य राम संभाजी गुंडीले, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे आणि डॉ.विलास आठवले, सहसचिव शिवदर्शन साठये, उप सचिव सुभाष नलावडे, उमेश शिंदे, अवर सचिव विजय कोमटवार यांच्यासह, सुनिल वाणी, रविंद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे उप मुख्य सुरक्षा अधिकारी श्रीराम कोरेगांवकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
यांच्या हस्ते ध्वजारोहण
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधान भवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह सैन्यदलातील अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.