फडणवीसांची फत्ते
विधिमंडळ गटनेतेपदी
एकमताने निवड
सत्तास्थापनेचा घोळ संपुष्टात
मुंबई ः “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन,” असे म्हणत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये विरोधकांना आव्हान दिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले सुद्धा. पण युती सरकारमधील घटकपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ इच्छेमुळे युती संपुष्टात आली आणि फडणवीसांच्या मार्गात अडथळा आला. पण पाच वर्षानंतर अखेर ते पुन्हा येणार, हे अखेर निश्चित झाले. इच्छेला मार्ग सापडला.
भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या आत्मविश्वासाने सांगणारे देवेंद्र फडणवीस अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणार यावर शिक्कामोर्तब झाले.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. कोअर कमिटीच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे निरीक्षक म्हणून आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, मनिषा चौधरी, प्रविण दरेकर, पराग अळवणी, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, अतुल सावे, शिवेंद्रराजे भोसले, राहुल नार्वेकर, चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते.
कोअर समितीच्या बैठकीनंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक घेण्यात झाली. यावेळी गटनेतेपदाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून मांडण्यात आला. तर आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, मेघना बोर्डीकर, पंकजा मुंडे, योगेश सागर, संजय कुटे, प्रवीण दरेकर, रणधीर सावरकर व अन्य काही आमदारांनी या प्रस्तावावर अनुमोदन देत पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यानंतर एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे आज (५ डिसेंबर) होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ते पुन्हा येणार
–
विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत युतीला जनाधार मिळालेला असतानाही केवळ मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे .यांनी भाजपबरोबर काडीमोड घेतला. त्या दरम्यान अजित पवार यांनी भाजपबरोबर संधान बांधले आणि पहाटेचा शपथविधी होऊन फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. पण ते सरकार औटघटकेचे ठरले. काका शरद पवार यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अजित पवार पुरते अडकले आणि त्यांनी शरणागती पत्करत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा राष्ट्रवादीला येऊन मिळाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ होते. ते शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाचा अभ्यास करीत होते. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांची होत असलेली घुसमट त्यांनी हेरली. त्याचप्रमाणे महाविकासआघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात होत असलेल्या सापत्न वागणुकीमुळे आमदारांच्या नाराजीचा फडणवीस यांनी फायदा उचलला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडाळीचा फायदा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. 2022 मध्ये झालेल्या सत्तांतरात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते. वरिष्ठांचा आदेश मान्य करुन त्यांनी ते स्वीकारले होते. त्यावेळी मी पुन्हा येईन या त्यांच्या घोषणेची महाविकासआघाडी आणि उद्धव ठाकरे यांनी अनेकदा खिल्ली देखील उडवली होती. पण आता फडणवीस पुन्हा आले आहेत.
एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री केले आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले तेव्हा देखील उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीने फडणवीसांना खूप टोमणे मारले होते. फडणवीस हे राजकीय चक्रव्यूहात अडकले अशी टीका त्यांनी केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाआघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द संपली असे अनेकांना वाटले होते. पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत इतिहास घडला. मागील ३० वर्षांत जे झाले नव्हते, ते झाले. भाजपसह महायुतीला भरघोस यश मिळाले आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. महायुतीतही भाजप मोठा पक्ष ठरल्याने आणि प्रथम राष्ट्रवादी, त्यानंतर शिवसेनेने पाठिंबा दिल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला.
—
भाजपची राज्यातील सर्वोत्तम कामगिरी
—
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले. लोकसभा निवडणुकीत पीछेहाट झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अभूतपूर्व 85 टक्के स्ट्राइक रेटसह 132 जागा निवडून आणल्या. त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपची ही राज्यातील सर्वोत्तम कामगिरी होती. महाराष्ट्रातील विजयाला भाजपमधील अनेकजण फडणवीस यांच्या रणनीतीला श्रेय देतात. त्यामुळेच विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी त्यांची एकमताने निवड झाली. त्याचबरोबर त्यांच्या मुख्यमंत्रीपदावरही शिक्कामोर्तब झाले आणि मुख्यमंत्रीपदी ते पुन्हा येणार हेही सिद्ध झाले.