
अध्यक्षपदासाठी नार्वेकरांचाच अर्ज
मुंबई ः विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्याशिवाय पर्याय नसल्याप्रमाणे आज महायुतीकडून त्यांच्या एकट्याचाच अर्ज दाखल झाला. शिवाय महाविकास आघाडीची सभासद संख्याच इतकी कमी आहे की, त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळताना मुश्कील असताना त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल करण्याचे धारिष्ट्य दाखविले नाही. तसेच गेल्या पाच वर्षातील आणि विशेषतः मागील अडीच वर्षातील त्यांचे महायुतीबरोबरचे संबंध इतके ताणले गेले आहेत की, ते उपाध्यक्षपदही मागू शकणार नाहीत. त्यामुळे पुढचा खडतर प्रवास लक्षात घेता महायुतीकडून कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी संधी देण्यात आली आहे.
राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांचा अर्ज दाखल केला. मात्र एकच अर्ज दाखल झाल्याने राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट आहे. 288 सदस्यांच्या सभागृहात महायुतीकडे मोठे संख्याबळ असल्याने या पदावर नार्वेकर यांची पुन्हा एकदा वर्णी लागणार आहे.
आज ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सचिवांकडे अध्यक्षदासाठीचा अर्ज दाखल केला. दिलेल्या मुदतीत केवळ नार्वेकरांचाच अर्ज दाखल झाल्याने उद्या ९ डिसेंबरला अधिवेशनात राहुल नार्वेकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याचेच बाकी आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सोमवारचा (9 डिसेंबर) दिवस निश्चित करण्यात आला आहे. सोमवारी विधानसभेत राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाईल. त्याला अनुमोदन दिल्यानंतर आवाजी मतदान पार पडेल. यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल.
राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाली होती. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन झालेल्या वादावेळी राहुल नार्वेकर यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली होती. त्यावेळी सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. मात्र कमी वयाचे असतानाही पेशाने वकील असल्याने नियम आणि कायद्याचा अभ्यास करून त्यांनी परिस्थितीचा सामना केला होता. त्यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाने दबावही आणला. पण ते दबावापुढे झुकले नाहीत.
महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा नाही असे ठरवले असले तरी त्यांनी सरकारकडे दोन प्रस्ताव ठेवले आहेत. त्यातील एका प्रस्तावाद्वारे विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे आणि दुसऱ्या प्रस्तावाद्वारे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावर सत्ताधारी काय निर्णय घेतात याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे वकील ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते
राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे. मुंबई महापालिका तसेच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचे काम राहुल नार्वेकर करत असत. पुढे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही काम केले.
राहुल नार्वेकर आज भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार असले तरी ते सर्वप्रथम एक शिवसैनिक होते, याची आठवण शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी करून दिली.
लोकसभा निवडणुकीत पराभूत
राहुल नार्वेकर यांनी 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा पत्करावा लागला होता

. पण 2014 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवले.
भाजपकडून विधानसभेत
राहुल नार्वेकर यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांनी भाजपतर्फे कुलाबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. शिवाय भाजपकडून त्यांना माध्यम प्रभारी म्हणून जबाबदारीही देण्यात आली होती. 2024 च्या निवडणुकीत कुलाबा मतदारसंघातून नार्वेकर पुन्हा एकदा निवडून आले.
राहुल नार्वेकर यांना यावेळी मंत्रीपदाची अपेक्षा होती. परंतु महायुतीचे आमदार बहुसंख्येने निवडून आले असले तरी पुढचा मार्ग सहजसोपा नाही याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीव आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षांत राहुल नार्वेकर यांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली आहे. त्यामुळे पुन्हा राहुल नार्वेकर यांनाच अध्यक्षपदासाठीच महायुतीतर्फे पसंती देण्यात आली आहे.