
माहीमच्या सरस्वती मंदिरचे
स्नेहसंमेलन थाटात साजरे
युवराज अवसरमल/मुंबई
माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलचे स्नेहसंमेलन नुकतेच थाटामाटात संपन्न झाले. सरस्वती मंदिर हायस्कूल ही माहीममधील प्रख्यात शाळा यावर्षी अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. शाळेत झालेल्या या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून ‘पुढारी न्यूज’चे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी स्वागतगीतांनी पाहुण्यांचे स्वागत केले गेले.
प्रमुख पाहुणे तुळशीदास भोईटे म्हणाले की, आज सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अनेक प्रतिभावान विद्यार्थ्यांची कला पाहता आली. या शाळेचे पदाधिकारी, शिक्षक हे सारे मन व बुध्दी एकत्र करून काम करतात. त्यामुळे प्रतिभावान विद्यार्थी घडतात. ज्या झोकून देऊन काम करणारे शिक्षक असतात, ती शाळा केव्हाही व कुठल्याही क्षेत्रात मागे राहू शकत नाही. या शाळेत प्रत्येक शिक्षक झोकून देऊन काम करतो. त्यामुळे या शाळेचा लौकिक वाढत आहे. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला भरभरून देत असतात, विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करून यशाची पायरी गाठायची आहे. यश मिळाल्यावर हुरळून जाऊ नये हा मोलाचा संदेश त्यांनी दिला. आपल्याला पुढे काय करायचे आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरविले पाहिजे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी माहिती होत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याने त्या आत्मसात कराव्यात. चांगल्या व वाईट गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनी ओळखाव्यात, असेही श्री. यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. वाचेल तोच पुढे वाचेल. वाचनामुळे मुले बौद्धिकदृष्ट्या समृद्ध होत असतात, असेही भोईटे म्हणाले.
मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या मानाच्या हिंद करंडक स्पर्धेत सरस्वती मंदिरच्या मुलांच्या संघाने विजेतेपद व मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले याबद्दलही त्यांनी शाळेच्या क्रीडा शिक्षकांचे व शाळेचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक व इतर काही शिक्षकांना विविध समाज संघटना व शैक्षणिक संस्थांनाकडून मिळालेल्या पुरस्कारांची त्यांनी विशेष नोंद घेतली.
या स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे पाहुणे व संस्थेच्या पदाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका व पर्यवेक्षक यांकडून देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना देखील गौरविण्यात आले.
नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उच्च प्राथमिक गटामध्ये शिक्षकनिर्मित शैक्षणिक साहित्यवर्गात सरस्वती मंदिर शाळेचे शिक्षक राजाराम दगडू बंडगर यांना प्रथम पारितोषिक मिळाले. “धूम्रपानाचे व्यसन करी मानवी शरीराचे शोषण” या शीर्षकाखाली त्यांनी बनविलेल्या शैक्षणिक साहित्यासाठी त्यांना प्रथम क्रमांक देऊन राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी त्याची निवड करण्यात आली. त्यांचा व त्यांना मदत करणाऱ्या विवेक चव्हाण व राजेंद्र खराडे या शिक्षकांचा पाहुणे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रतिभा सांगळे यांनी केले, आभारप्रदर्शन मयुरी गोगटे यांनी केले. या स्नेहसंमेलनास संस्थेचे अध्यक्ष कोटणीस, सचिव संजय सुखटणकर व इतर पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक मारुती चाबुकस्वार, उपमुख्याध्यापिका शामल बिनसाळे, पर्यवेक्षक कृष्णा जाधव, शिशुवर्गाच्या मुख्याध्यापिका, प्रायमरी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका, सीबीएसइच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी वेशभूषा, सोलोगीत, समूहगीत, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य सादर केले. समूहनृत्यामध्ये देवीचा जागर, देवीचे माहात्म्य सांगणारी गीते, आसामचे बिहू नृत्य इत्यादी सादर केले गेले.