Sunday, February 9, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeब्रेकिंग न्यूज'मिशन अयोध्या'

‘मिशन अयोध्या’

* २४ जानेवारीपासून राज्यभरात
मोजक्याच चिपटगृहात प्रदर्शित होणार

‘मिशन अयोध्या’ चित्रपटाची पहिली झलक

छत्रपती संभाजीनगरमध्ये सादर झाली पहिली झलक

‘मिशन अयोध्या’ चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी झालेली रसिकांची गर्दी
  • महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत

    पहिली झलक पाहण्यासाठी शेकडो रसिकांची उपस्थिती

मुंबई ः  अयोध्या नगरी म्हटले की नजरेसमोर येते ती रामजन्मभूमी. पण या रामजन्मभूमीत प्रभुरामाचे जन्मस्थळ कुठेच दिसत नव्हते. कारण त्या जन्मस्थळावर उभी होती बाबरी मस्जिद. बाबराने हिंदू मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारल्या होत्या. मात्र १९९२ मध्ये कारसेवकानी आंदोलन करून बाबरी मशिद उद्धवस्त केली आणि न्यायालयीन लढ्यानंतर तीस वर्षांनी तेथे राममंदिर उभारण्यात आले. रामजन्मभूमी मंदिरासाठी सुमारे पाचशे वर्षांच्या लढ्यात अनेकांनी प्राणांची आहुती दिली. त्यामुळे तेथे केवळ राम जन्मभूमी मंदिर उभारून प्रश्न मिटणार नाहीत. तर यापुढे हिंदू धर्मरक्षणाचा हा लढा पुढे चालूच ठेवावा लागेल. यासाठी कृष्णा शिंदे-योगीता शिंदे या दाम्पत्याने ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाची निर्मिती केली असून समीर सुर्वे या कोकणच्या सुपुत्राने त्याचे मोठ्या कौशल्याने दिग्दर्शन केले आहे.

कोकण जशी नररत्नांशी खाण आहे, त्याप्रमाणे मराठवाड्यातील संभाजी नगरला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. या संभाजीनगरमध्येच मंगळवार ७ जानेवारी रोजी महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाची पहिली झलक दाखविण्यात आली. ही पहिली झलक (ट्रेलर लाँचिंग) पाहण्यासाठी संभाजीनगरच्या भव्य मॉलमधीच चित्रपटगृहात मोठी गर्दी उसळली होती. वातावरण निर्मितीसाठी प्रभुरामचंद्रांवर आधारीत गीते ऐकवण्यात येत होती आणि त्या गीतांमुळे प्रभावित होऊन श्रीरामांचा जयघोषाने चित्रपटगृह दणाणून गेला होता.  पहिली झलक पाहण्यासाठी रामभक्त एवढ्या मोठ्या संख्येने आले होते, तर प्रत्यक्ष चित्रपट पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीला आवर कसा घालायचा, असा प्रश्न निर्मात्यांना आणि वितरकांना आतापासूनच पडला आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभु श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभु श्रीरामांचा महिमा सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी व्यासपीठावर आमदार अनुराधाताई चव्हाण, चित्रपटाचे निर्माते कृष्णा शिंदे-योगीता शिंदे, दिग्दर्शक समीर सुर्वे, विरुपाक्ष महाराज, प्रल्हाद महाराज नवल, बद्री पठाडे, सुनील जगताप, रामचंद्र नरोटे, कृष्णा पाटील उकिर्डे, पद्माकर पडूळ, राम शिंदे, मधुकर महाराज, राधाकिशन पठाडे, विवेक ढोरे, रवी करमाडकर, बाबू महाराज असे सामाजिक कार्यकर्ते आणि संतमहंत आणि त्यांच्या शिष्यवर्ग मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होता.


हिंदू साधुसंत सहिष्णू असल्यामुळे आतापर्यंत चित्रपटांमध्ये हिंदू धर्मातील साधुसंतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले. मात्र मुस्लिम धर्मगुरु किंवा ख्रिश्चन धर्मगुरु यांच्या विरोधात तसे दाखवण्याची हिंमत कोणी केली नाही. त्यामुळे आपल्या गालात कोणी एक मारली तर दुसरा गाल पुढे करावा हे तत्त्वज्ञान आता मागे पडले आहे. आता कोणी एक मारली तर त्याला दोन ठेवून द्याव्यात, असे ठकास महाठक वागले तरच आयुष्यात सन्मानाने जगता येते ही भूमिका अंगिकारल्याने आज हिंदू धर्मातील साधुसंताबद्दल चांगले दाखविण्यात येत आहेत, असे म्हणत रामगिरी महाराज यांनी ‘मिशन अयोध्या’ मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

‘मिशन अयोध्या’ चित्रपटाची पहिली झलक दाखविण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण संभाजीनगर ‘मिशन अयोध्या’मय झाले होते. सर्व रस्त्यांवर आणि चौकाचौकात ‘मिशन अयोध्या’चे बॅनर्स झळकत होते. महंत रामगिरी महाराज यांच्या आगमनाचे फलकही जागोजागी लावण्यात आले होते.
अयोध्येत राममंदिराच्या उद्घाटनावेळी व्यक्त झालेले संतमहंतांचे विचार ऐकून ‘मिशन अयोध्या’च्या पहिल्या झलकेच्या अनावरणासाठी आलेल्या महंत रामगिरी महाराजांचे विचार ऐकण्यासाठीही  शहरवासीयांमध्ये कमालीचे कुतुहल तयार झाले होते. त्यामुळे  या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने चित्रपट रसिकांची उपस्थिती लाभली होती. तसेच रामगिरी महाराज यांच्या अनुयायांनीही बहुसंख्येने गर्दी केली होती. ज्ञानोबा-तुकाराम माऊलींचा गजर करीत टाळ-मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांनी ‘जय श्रीराम’ नामाचाही जयघोष केला. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकात चित्रपटाची फलकबाजी करण्यात आली होती. तसेच महंत रामगिरी महाराज यांच्या आगमनाचे फलकही जागोजागी लावण्यात आले होते.
चित्रपटाविषयी थोडक्यात…
राज्यभरात २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘मिशन अयोध्या’ हे एका शिक्षकांचे मिशन आहे.  मिशन सैनिकांचे असते, मिशन अतिरेक्यांचे असते. मग मिशन एका शिक्षकाचे का नसावे? हा चित्रपट म्हणजे असामान्य महानायकांचा इतिहास वाचत असताना आपलेही एक पान इतिहासात असावे, ही इच्छा मनाशी बाळगून आयुष्य जगणाऱ्या एका सामान्य शिक्षकाची एक असामान्य कथा आहे. अजित देशमुख हा इतिहास विषयचा शिक्षक असूनही छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्याने गाजवणारा प्रभावी वक्ता सुद्धा आहे. त्यांनी एका मिशनला पुढचे आयुष्य समर्पित  करायचे ठरवले आहे. ज्याचे नाव आहे “मिशन अयोध्या”.
साधारण पाचशे वर्षाच्या एका अभूतपूर्व संघर्षानंतर भारतातील अयोध्यामध्ये अखेर श्री राम जन्मभूमी मंदिर उभारले गेले, त्या घटनेने देशमुख सर प्रभावित होतात. रामजन्मभूमी मंदिर उभारले गेले, पण पुढे काय? मंदिर उभारले; पण श्रीरामाच्या विचारांचे काय? असे त्यांच्यासमोर बरेच प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांनी स्वतः ते बेचैन होतात आणि प्रभु श्रीराम ही त्यांची अस्वस्थता बनते. कारण ते ज्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना आपला आदर्श मानतात त्या आदर्शांचा आदर्श श्रीराम आहे. अयोध्यात निर्माण झालेले भव्य मंदिर रामराज्याची सुरुवात असायला हवी, पुढच्या पिढ्यांना ‘आदर्श राजा’ रामाचा इतिहास आपण सांगायला हवा. श्रीराम हा संपूर्ण विश्वाचा आहे. त्याला कोणताही धर्म, जात-जमात अपवाद नाही. श्रीराम हा कोणाच्या द्वेषाचा, तिरस्काराचा विषय नसावा. त्याला सर्वांनी स्वीकारायला हवे, असे त्यांचे चरित्र आदर्श आहे आणि हा विचार सर्व समाजात पोहोचवणे, तो पुढच्या पिढ्यांत रुजवणे आणि रामराज्याकडे वाटचाल करणे हेच मिशन अयोध्या आहे.

मिशन अयोध्या
चित्रपट गृहातच पाहणे योग्य
अत्यंत वेगळा विषय घेऊन २४ जानेवारी २०२५ रोजी मिशन अयोध्या चित्रपटगृहात दाखल होत असून हा चित्रपट रसिकांनी चित्रपटगृहातच पाहावा असे आवाहन कलावंत तंत्रज्ञानी केले आहे.

कलाकार-तंत्रज्ञांची हजेरी
या चित्रपटाचे निर्माते म्हणून जबाबदारी कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे यांनी सांभाळली आहे. तर कथा कृष्णा शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद लेखन समीर सुर्वे यांनी केले आहे. या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी ट्रेलर लॉंच सोहळ्याला हजेरी लावली होती.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध