हॉटेल एकादशी आणि
पंचामृत कॅटरर्सचे मालक
बाबूशेठ नागवेकर यांना
मित्रपरिवाराची श्रद्धांजली
हॉटेल एकादशी आणि पंचामृत कॅटरर्सचे सर्वेसर्वा दिवंगत बाबूशेठ नागवेकर यांच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रद्धांजली अर्पण करताना त्यांचा मित्रपरिवार आणि कुटुंबीय
मुंबई : बाबूशेठ नागवेकर यांच्या धिप्पाड देहाप्रमाणेच त्यांचे हृदयही मोठे दिलदार होते. त्यामुळे ते भंडारी समाजाचे न राहता सर्व समाजाचे मित्र आणि आश्रयदाते ठरले होते. त्यांच्या जाण्याने आपल्या कुटुंबातील एक माणूस गेल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. म्हणूनच त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार आणि त्यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
दादर येथील गोखले रोडवरील एकादशी हॉटेलचे आणि समारंभाला जेवणाची ऑर्डर घेणाऱ्या प्रसिद्ध पंचामृत कॅटरर्सचे मालक प्रताप (बाबूशेठ) अर्जुन नागवेकर यांचे गुरुवार २ जानेवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या मित्रपरिवाराने शुक्रवार १० जानेवारी २०२५ रोजी दादर येथील कित्ते भंडारी सभागृह येथे शोकसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी एकादशी हॉटेलचे ग्राहक, बाबूशेठ नागवेकर यांचे हितचिंतक, मित्रपरिवार, पंचामृत कॅटरर्सचे ग्राहक, कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी संस्थेचे सभासद आणि पदाधिकारी असे मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबूशेठ याचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना वरळी शाखेचे ज्येष्ठ शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेचे माजी सदस्य वसंत गोताड, बाबूशेठ यांचे गुहागर येथील स्नेही चकोर शेटे, कित्ते भंडारी संस्थेचे विश्वस्त मधुकर तोडणकर, भंडारी मंडळाचे खजिनदार नंदकुमार कांबळी, कित्ते भंडारी संस्थेचे कार्यवाह अरविंद सुर्वे, शिवसैनिक रवी गजने, मनसेचे माजी शाखा अध्यक्ष अभिजीत नागवेकर, माजी शाखाप्रमुख भरत राऊत, संजय नगरकर, अखिल भारतीय भंडारी महासंघाचे खजिनदार जगदीश आडविरकर, भारतीय जनता पक्षाचे विवेक भाटकर, बाबूशेठचे भाचे मंगेश मयेकर, भगिनी अरुणा पाटकर आणि कर्तव्यनिष्ठ लोकप्रतिनिधी आमदार महेश सावंत यांनी बाबूशेठ यांच्याबरोबर घालवलेल्या क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला.
दिलदार बाबूशेठ, प्रसंगाला धावून येणारा रक्षणकर्ता बाबूशेठ, अडीनडीला धावून येणारा मदतकर्ता बाबूशेठ, चवदार पदार्थांप्रमाणे ग्राहकांशी आणि मित्रांशी गोड बोलणारा बाबूशेठ, विवंचनेत असणाऱ्याला केवळ हसऱ्या चेहऱ्याच्या दर्शनाने चिंतामुक्त करणारा बाबूशेठ, धंद्यात खोट देणाऱ्यालाही “जा तुझे भले होऊदे” म्हणणारा क्षमाशील बाबूशेठ, तारुण्यात क्रिकेट खेळताना कोणतीही हुज्जत न घालताना पंचांचा निर्णय मान्य करणारा बाबूशेठ, व्यवहारात खोट आली तरी पदार्थाची चव बिघडू न देणारा बाबूशेठ अशा विविध प्रकारच्या आठवणींना यावेळी वक्त्यांनी उजाळा दिला. या आठवणी ऐकताना बाबूशेठ यांच्या कुटुंबीयांना गहिवरून आले होते.
कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीचे कार्याध्यक्ष आणि बाबूशेठ यांचे मित्र सूर्यकांत बिर्जे यांनी शोकसभेचे सूत्रसंचालन करताना प्रभादेवी, दादर, माहीम-माटुंगा या भागात बाबूशेठ यांच्याशी निगडित असलेल्या अनेक आठवणींना उजाळा देत त्या आठवणी उपस्थितांच्या डोळ्यांसमोर उभ्या केल्या.
कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीचे सहकार्यवाह आणि बाबूशेठ यांचे मित्र संतोष मांजरेकर यांनी या शोकसभा कार्यक्रमाची नियोजनबद्ध आखणी केली.
एकादशी हॉटेलच्या उद्घाटनापासून मी बाबूशेठबरोबर आहे. एकादशी हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर आमचा दिवस सुरू व्हायचा. त्यामुळे बाबूशेठ आणि आमचे ऋणानुबंध आहेत. आता बाबूशेठ हयात नसले तरी ते ऋणानुबंध तुटणार नाहीत. बाबूशेठ यांच्या पश्चात त्यांच्या मुलांना धंद्यात कोणताही प्रसंग उद्भवला, काहीही अडचण आली तरी कधीही हाक मारा. बाबूशेठचा मित्र म्हणून तुमच्या हाकेला सदैव धावून येईन आणि मला शक्य आहे ती सर्व मदत करीन, असे आश्वासन देत आमदार महेश सावंत यांनी बाबूशेठ यांच्या मुलांना धीर दिला.