कित्ते भंडारी संस्थेच्या वर्धापनदिनी
महापूजेचे यजमानपद भूषविलेले
नंदिता पेडणेकर दाम्पत्य
मुंबई : आयुष्याची पंचाहत्तरी म्हणजे एकतर विश्रांती करत राहायचे आणि डॉक्टरच्या गोळ्या घेत राहायचे. परंतु काही माणसे वय विसरून कार्यरत राहतात. त्यापैकी एक आहेत कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीच्या माजी कार्याध्यक्ष सौ. नंदिता पेडणेकर. पंचाहत्तरीतही त्या तारुण्याच्या सळसळत्या उत्साहाने वावरत असतात. त्याच उत्साहाने श्री. व सौ. पेडणेकर दाम्पत्याने कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी (कित्ते भंडारी सभागृह) संस्थेच्या महापूजेचे यजमानपद भूषविले.
श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे यजमानपद भूषविणारे श्री. दत्ता पेडणेकर आणि सौ. नंदिता पेडणेकर हे कित्ते ऐक्यवर्धक मंडळी संस्थेचे माजी कार्यकारिणी सदस्य आहेत. सौ. नंदिता पेडणेकर यांनी मागील काही वर्षे संस्थेचे कार्याध्यक्षपद भूषविले आहे. स्पष्टवक्तेपणा ही त्यांची खासियत आहे. यापूर्वी एकदा या पेडणेकर दाम्पत्याने श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे यजमानपद स्वीकारले आहे. मात्र त्यांनी यंदा श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे यजमानपद स्वीकारण्यात तसे विशेष कारण आहे.
सौ. नंदिता पेडणेकर यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. ९ जानेवारी रोजी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या यजमानांचे वय ८३ वर्षे आहे. एकमेकांच्या साथसंगतीने हसत-खेळत जीवन जगणारे हे जोडपे आहे. वयाची पाऊणशे वर्षे पूर्ण होणार त्या आनंदाप्रीत्यर्थ पुढील वर्षी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे यजमानपद मिळावे अशी इच्छा सौ. नंदिता पेडणेकर यांनी मागील वर्षी “कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी”चे अध्यक्ष श्री. भरत शेटे यांच्याकडे व्यक्त केली होती आणि भरत शेटे यांनी त्यांना होकार दिला होता. सहकार्यवाह श्री. संतोष मांजरेकर आणि जेष्ठ सभासद श्रीमती शोभा आजगावकर यांनी त्याबाबत कार्यवाह श्री. अरविंद सुर्वे याना माहिती दिली. १४ जानेवारी जवळ येताच सौ. नंदिता पेडणेकर दाम्पत्याने ऑफिसमध्ये येत कार्यवाह श्री. अरविंद सुर्वे यांची भेट घेतली. त्यांनी आपली इच्छा बोलून दाखविली. त्यावेळी उपस्थित असलेले पदाधिकारी कार्याध्यक्ष श्री. सूर्यकांत बिर्जे, उपाध्यक्ष श्री. संजय गुढेकर, सहकार्यवाह श्री. संतोष मांजरेकर, सहखजिनदार श्री. पंकज मोरे, हिसेबतपासनीस श्री. प्रमोद चव्हाण यांनी त्यांच्या इच्छेला संमती दिली आणि पेडणेकर दाम्पत्याची महापूजेचे यजमानपद भूषविण्याची मनीषा पूर्ण झाली. संस्थेचे अध्यक्ष श्री. भरत शेटे आजारी असतानाही इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांची उणीव भासू न देता इतर पदाधिकाऱ्यांनी पेडणेकर दाम्पत्याची इच्छा पूर्ण केली.
संस्थेचे जुने पदाधिकारी आणि नवीन पदाधिकारी एकदिलाने काम करत असतील तर संस्थेचे आरोग्य उत्तम राहते याचे उदाहरण म्हणजे संस्थेच्या वर्धापनदिनी १४ जानेवारी २०२५ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात पार पडलेली संस्थेची महापूजा.
श्री. पेडणेकर दाम्पत्याला उत्तम आयुरारोग्य लाभो आणि त्यांनी वयाची शंभरी पूर्ण करावी, अशी प्रार्थना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री सत्यनारायण महाराजांच्या चरणी केली.