Sunday, February 9, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुख्य बातम्यानागपाड्याचे जागृत देवस्थान 'नागोबा मंदिर'

नागपाड्याचे जागृत देवस्थान ‘नागोबा मंदिर’

भेंडीबाजारातील नागपाडा येथे कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीचे संस्थापक लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले यांनी बांधलेल्या पुरातन नागोबा मंदिराला कित्ते भंडारीचे कार्यवाह श्री. अरविंद सुर्वे आणि सहकार्यवाह श्री. संतोष मांजरेकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी विश्वस्तांनीही त्यांचे स्वागत केले.

सामाजिक कार्याबरोबरच

रावबहाद्दूर बाबासाहेबांची

 धार्मिक जनजागृती

मुंबई ः लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के. बोले (बाबासाहेब) यांनी समाजकार्यालाठी उभारलेल्या मालमत्ता सांभाळणे हे कित्ते भंडारी समाजबांधवांपुढे मोठे आव्हान ठरत आहे. समाजाला साह्यभूत ठाराव्या म्हणून रावबहाद्दूर सी. के. बोले यांनी अनेक ठिकाणी मालमत्ता उभारल्या. परंतु आता त्या सांभाळाव्या कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यापैकी मुंबईत भेंडीबाजार येथे असलेले नागोबा मंदिर न्यास हे एक म्हणावे लागेल.

भंडारी समाजाचे मानबिंदू, लोकहितवादी रावबहाद्दूर सी.के. बोले उपाख्य बाबासाहेब यांनी भेंडीबाजारात नागपाडा येथे अग्निशमन दलाच्या समोरच श्रीठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री पंचमुखी हनुमान मंदिर आणि श्री नागोबा मंदिर यांची एकत्रित उभारणी १८८० साली केल्याचे आढळते. दादर येथील कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी (अर्थात कित्ते भंडारी हॉल) या संस्थेची स्थापना १८९० साली झाली. म्हणजेच कित्ते भंडारी हॉलच्या दहा वर्षे आधी नागोबा मंदिरची उभारणी करण्यात आली. मात्र १४५ वर्षे जुने असलेल्या या मंदिराची धर्मादाय आयुक्त कार्यालयात १९५३ मध्ये नोंदणी करण्यात आली. आता  हे मंदिर सांभाळताना तेथील विश्वस्तांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. असलेल्या विश्वस्तांपैकी एक चेंबूरहून येतात. दुसरे पनवेल येथून येतात तर तिसरे मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या इमारतीत राहतात. या मंदिराची मालमत्ता आणि पावित्र्य जोपासण्यासाठी न्यासामध्ये अनेक समाजातील तरुणांनी; विशेषतः भंडारी समाजातील तरुणांनी भाग घ्यावा असे आवाहन विश्वस्त श्री. प्रकाश राणे यांनी केले आहे.

उभारणी स्थापत्यशास्त्रानुसार

नागोबा मंदिराची उभारणी स्थापत्यशास्त्रानुसार झाली आहे. या मंदिरात मूळ नागदेवतेच्या मूर्तिसह श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री पंचमुखी हनुमान, शिवलिंग, पार्वती आणि सि‌द्धिविनायकाची मूर्ती यांचा अंर्तभाव आहे.

शिवलिंगावर जलाभिषेक करताना अरविंद सुर्वे

शिवलिंग (नागेश्वर)

गर्भगृहातून पायऱ्या ओलांडून गेल्यावर शिवलिंग व नागाचे मूळ स्थान दृष्टीस पडते. मंदिराच्या पायऱ्या ओलांडणे म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, माया आणि मत्सर या वाईट गोष्टींचा त्याग करणे होय. शिवाचे दर्शन घेतल्यामुळे मोक्ष व मुक्ती प्राप्त होते.

श्री सिद्धिविनायक

श्री सिद्धीविनायकाची छोट्या स्वरुपातील पांढरी शुभ्र मूर्ती लक्षवेधी आणि मंगलमय आहे.

पार्वतीदेवीची आकर्षक मूर्ती

पार्वतीदेवीची मूर्ती आकर्षक आहे. पार्वतीदेवीच्या एका हातात कमंडलू, दुसऱ्या हातात रुद्राक्ष माळ, तिसऱ्या हातात रुद्र भोलेनाथ व चौथ्या हातात अधिपती श्री गणेश आहे.

पंचमुखी हनुमान

लंकेत अहिरावणाचे साम्राज्य होते. अवतीभवती पाच दिवे जळत असल्यामु‌ळे अहिरावणावर विजय मिळविता येत नसे, ही मांत्रिक विद्या अहिरावणाची आई भवानीने केली होती. हे पाच दिवे एकत्र विझल्यावरच अहिरावणाचा नाश होईल हे मारुतीला ठाऊक होते. त्यासाठी मारुतीने पंचमुखी रूप धारण करून एकाचवेळी पाचही दिवे विझवून अहिरावणाला पराभूत केले.

समुद्रमंथन झाले तेव्हा शिवशंकराने विषारी हलाहल प्राशन केले असता त्यांचा रंग काळानिळा पडला. त्यावेळी विष्णूने काळे विष स्वतःकडे घेतले आणि ते काळ्याकुट्ट रंगात विठ्ठल अवतारात प्रगट झाले. विष्णूच्या अवतारात राम जेव्हा संकटात होते, तेव्हा शिवशंकरांनी घामाने पंचमुखी मारुती अवताराची निर्मिती करुन त्यात आपल्या मुलाला म्हणजे श्री गणेशाला स्थान दिले. शिवशंकराला आपल्या मुलाबद्दल, गणेशाबद्दल असीम प्रेम होते. त्यामुळे त्यांनी लंकेच्या मोहिमेवर पंचमुखी मारुतीमध्ये गणपतीला स्थान दिले, अशी आख्यायिका आहे.

पंचमुखी मूर्तीचे वैशिष्ट्ये

मारुती मंदिरात पंचमुखी मारुती मूर्ती आहे. अशी मूर्ती भारतात कुठेही नाही. विशेष म्हणजे या मूर्तीमध्ये एक श्री गणेशाचे स्थान आहे. चार दिशेला चार मुखे व आकाशाकडे एक अशी पाच मुखे आहेत.

श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती

 मंदिरातील श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती योगरूपी आहेत. ज्ञानाचे प्रतीक म्हणून शंख उजव्या हाती, पावित्र्याचे प्रतीक म्हणून कमळ अशी ही श्री विठ्ठलाची मूर्ती मनाला विशेष आनंद देते. यांचे डोके मान व छाती एका रेषेत आहे. विठ्ठल रुक्मिणी दोघेही कमरेवर हात ठेवून उभे आहेत. त्यामु‌ळे दोघेही ओंकार स्वरूपात स्पष्ट दिसतात.

पिंपळवृक्ष

या मंदिराला निसर्गाची देणगी म्हणून पिंपळवृक्ष आहे. या पिंपळाच्या वृक्षाला गायमुख आहे. या मंदिरातील छोटेखानी जागेत स्थापत्य वास्तूशास्त्राप्रमाणे मूर्तीची मांडणी आहे. मंदिराच्या कमानीला चंद्र, सूर्य, कमळ तर कळसावर नागाचे प्रतीक आहे.

सदर मंदिराची महती समजल्यावर ऑक्टोबर १९१२ मध्ये करवीर विद्यापिठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांनी मंदिरास भेट दिली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा मंदिरात सत्कारसमारंभ केला होता.

कवठी गाव

मुंबई ही पूर्वी सात बेटांची होती. या मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, पाठारे प्रभू आदी समाजाची प्रामुख्याने वस्ती होती कालांतराने ब्रिटिश लोक व्यवसायानिमित्त देशात आले व त्यांनी देशावर एक हाती सत्ता काबीज केली. त्याकाळी चारही बाजूने खाडीने वेढलेला नागपाडा ‘कवठी’ गाव या नावाने ओळखला जात होता. या गावात नागांचे खूप वास्तव्य होते.

नागाच्या दृष्टांतामुळे मंदिराची निर्मिती

रावबहाद्दूर सीताराम बोले यांचे वडील केशवराव हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आरे गावचे रहिवासी होते. नोकरीनिमित्त ते मुंबईत आले. मुद्रण व्यवसायात प्रवेश केल्यानंतर ते एका छापखान्याचे मालकही झाले. त्यांचे थोरले चिरंजीव सीताराम यांचा जन्म आजोळी पालशेत गावी झाला. वडील केशवराव हे जुना नागपाडा येथील कवठी गावात राहत होते. १८६९ साली जन्मलेल्या सीताराम यांना आई मुंबईला घेऊन आली. नागपाडा आणि डोंगरी येथील शाळांमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. सदर विभागात नागांचे वास्तव्य असल्यामुळे व त्यांच्या स्वप्नात नागाने दृष्टांत झाल्यामुळे मंदिराची उभारणी केली म्हणून कवठी गावाला ‘जुना नागपाडा’ म्हणून ओळखू लागले. मंदिराच्या मागे असलेल्या एका खोलीत केशवराव कुटुंबासह राहत असत.

जुना नागपाडा (आताचा भेंडीबाजार) येथे मुस्लिम समाजाची बहुसंख्येने वस्ती होती. त्यावेळी दोन समाजात क्षुल्लक कारणांवरून दंगली होत असत. १८९३ मध्ये झालेल्या दंगलीत सीताराम यांचे वडील केशवराव जबर जखमी झाले व त्यातच त्यांचा अंत झाला. सतत दंगली होत असल्यामु‌ळे बोले कुटुंबीय व पुजारी दीक्षित यांनी मंदिराचा कारभार उत्तर भारतीय पुजारी गोस्वामी यांचेकडे सोपवून ते दादरला राहण्यासाठी गेले. जाण्यापूर्वी मंदिराच्या कारभारावर देखभालीसाठी स्थानिक लोकांचे विश्वस्त मंडळ नेमले. परंतु सततच्या दंगलीमुळे मंदिराची महती आणि माहिती लोकांपासून दुर्लक्षित राहिली.

दंगल व मंदिर सुरक्षा

१८ मे १९८४ रोजी भिवंडीत दोन गटात तुफान दंगल झाली. याचे पडसाद मुंबईत; विशेष करून मुस्लिम बहुल विभागात उमटले. मात्र या दंगलीत डोंगरी पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त व जागरुकतेमुळे मंदिराचे काहीएक नुकसान झाले नाही.

७ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद हिंदूंनी तोडली. त्याचे पडसाद मुंबईभर उमटले. हिंदूंची संख्या कमी असलेल्या वसाहतीवर मुस्लिम समाजकंटकांनी हल्ला फेला. मंदिरानजिक असलेल्या इमामवाडा परिसरातील हिंदूंच्या इमारतीवर बाहेरून ट्रकमधून आलेल्या गुंडांनी सोडावॉटरच्या बाटल्या, अॅसिड बल्ब, जळते बोळे यांचा मारा केला. तेव्हाही रस्त्यावर असलेल्या विठ्ठल-रखुमाई व हनुमान मंदिरास सुदैवाने काही झाले नाही.

७ डिसेंबर १९९३ रोजी वर्षपूर्तीनिमित झालेल्या समारंभात काही समाजकंटकांनी याच मंदिरावर मटणाचे तुकडे फेकले. पुजाऱ्याने ही बाब मंदिराचे काम पहाणारे श्री अमोल सरतांडेल यांचे कानी घातली. मंदिराबाबत झालेल्या घटनेमुळे गिरगांव, कुंभारवाडा, उमरखारी, डोंगरी येथिल मंडळी जमा झाली. यावेळी डोंगरी पोलीस स्टेशनचे सहआयुक्त श्री. मधुकर झेंडे पोलिस ताफ्यासह हजर झाले. त्यांनी घटनेबदल तीव्र खेद व्यक्त करून मंदिराचा कळस गोमूत्राने साफ करून देण्याची व्यवस्था केली. तसेच २४ तासाच्या आत गुन्हेगारांना पकडण्यात आले. पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे  मंदिर आजही अबाधित आहे.

सततचा पाहरा

दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जे.जे. पोलीस ठाण्याची निर्मिती केली. आज हा विभाग जे. जे. पोलीस ठाण्याच्या अखत्यारित असून मंदिराभोवती कायमस्वरूपी पोलीस पहारा असतो. मंदिराला डोंगरी व जे जे. पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस यांचे सहकार्य वेळोवेळी मिळत आहे.

जीर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन

या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यासाठी  निधीची कमतरता जाणवत आहे. भाविकांनी सढळहस्ते यथाशक्ती मदत करावी आणि लोकसहभागातूनच मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा असे आवाहन विश्वस्तांचे  आहे.

बाबासाहेबांच्या निवासस्थानावर कब्जा

दरम्यान रावबहाद्दूर बाबासाहेब ज्या सदनिकेत राहिले होते, त्या सदनिकेचा एका मुस्लिम व्यक्तीने ताबा घेतला आहे. त्या सदनिकचे (रूमचे) तो नाममात्र भाडे देतो. मात्र त्या सदनिकेला त्यांने अमिन मेन्शन असे नाव दिले आहे. हे नाव काढून त्या सदनिकेला रावबहाद्दूर बोले निवास असे नाव देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी मंदिराच्या विश्वस्तांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी कित्ते भंडारी समाजाचे सहकार्य मागितले आहे.

आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाचे प्रकाश राणे यांना निमंत्रण

आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाचे पहिले पर्व य़शस्वी ठरल्यानंतर दुसरे आंतरराष्ट्रीय अधिवेशन १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानच्या नगरीत होत आहे. त्यासाठी नागपाडा नागोबा मंदिराचे विश्वस्त श्री. प्रकाश  बाळाराम राणे यांना निमंत्रण आले आहे. मंदिर अर्थव्यवस्था, प्रशासन, कामकाज आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणारे हे व्यासपीठ जगभरातील मंदिरांच्या व्यापक व्यवस्थापनासाठी समर्पित आहे. टेम्पल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन होत आहे. आयटीसीएक्सचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड हे कार्यक्रमाचे सहनेतृत्व करत आहेत.

 

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध