Monday, March 17, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुख्य बातम्याकिल्ल्यात आढळली श्री गणेशमूर्ती

किल्ल्यात आढळली श्री गणेशमूर्ती

जयगड खाडीच्या संगमावर…सुरूंच्या बनात… आमराईत वसलेले तवसाळचे प्रसिद्ध स्वयंभु श्री गणेशाचे आकर्षक मंदिर

श्री गणेश जयंतीनिमित्त तवसाळ गावी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई : गुहागर तालुक्यातील तवसाळ गावी “स्वयंभू गणेश” म्हणून प्रसिध्द असलेल्या मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, जवळजवळ आठवडाभर दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. विशेष म्हणजे ही गणेश मूर्ती विजयगड किल्ल्याचे बांधकाम करताना सापडली आहे. त्यामुळे हा स्वयंभु गणेश मानला जातो.

तवसाळ गावचे आराध्य दैवत स्वयंभु श्री गणेश

हेदवीच्या दशभुज गणपतीबरोबरच तवसाळचा स्वयंभू गणेश प्रसिद्ध आहे. मंदिराच्या पश्चिमेला अरबी समुद्र, त्याच्या लाटांचा धडाका सोसत निधड्या छातीचा कोट करून उभा असलेला जयगड किल्ला, शत्रूवर करडी नजर ठेवून त्याला कोंडीत पकडताना प्रसंगी तोफगोळ्यांच्या माऱ्याने तटबंदी छिन्नविच्छिन्न झाली तरी विजयी वीराच्या दिमाखात उत्तर-पश्चिम (वायव्य) पाय रोवून उभा असलेला तवसाळचा विजयगड किल्ला, उत्तर-पूर्व (ईशान्य) आणि पूर्व-दक्षिण (आग्नेय) उभ्या असलेल्या डोंगररांगा, दक्षिणेकडे असलेले सुरूचे बन, पूर्व-पश्चिम वाहत असलेली शास्त्री नदी (जयगड खाडी) आणि शास्त्री नदीचे अरबी समुद्राशी होणाऱ्या संगमतटावरच आमराईत वसलेले स्वयंभु श्री गणेशाचे मंदिर. फारच विलोभनीय वातावरण आहे. या निसर्गसुंदर परिसरात असलेल्या तवसाळ गावच्या स्वयंभु श्री गणेशाचा जयंती उत्सव जवळ जवळ आठवडाभर चालणार आहे.
बुधवार २९ जानेवारी २०२५…माघ शुद्ध प्रतिपदा संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सुरू होत असून त्याच दिवशी श्री गणेशग्रंथाचे वाजतगाजत मंदिरात आगमन होईल. त्याच दिवसापासून ग्रंथपारायणाला सुरुवात होणार असून त्यानिमित्त स्थानिकांचे भजन होणार आहे.
गुरुवार ३० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासून कार्यक्रमाना सुरुवात होणार असून ग्रंथवाचन, स्थानिक भजन आणि मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत ग्रंथवाचन, स्थानिकांचे भजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
शनिवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी ‘श्रीं’चा जन्मसोहळा, महाप्रसाद, संध्याकाळी भव्य रथयात्रा आणि रात्री निमंत्रितांची भजने असा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी २ फेब्रुवारी रोजी ग्रंथसमाप्ती आणि दिंडी निघणार आहे. तर सोमवार ३ फेब्रुवारी रोजी श्री सत्यानारायणाची महापूजा, हळदीकुंंकु समारंभ, स्थानिकांचे भजन आणि रात्री १० वाजता स्थानिक कलारांचे श्री गजानन नाट्यमंडळ ‘लव्ह लव्हर जिंदाबाद’ हे धमाल विनोदी नाटक सादर करणार आहे. भाविकांनी आणि कलारसिकांनी आठवडाभराच्या या भरगच्च कार्यक्रमांचा लाभ घेऊन ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन स्थानिक आणि मुंबईस्थित तवसाळ ग्रामस्थ मंडळाने केले आहे.

तवसाळ गावचे पुरातन श्री गणेश मंदिर

स्वयंभु श्री गणेशाची आख्यायिका
स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले. त्यापैकीच एक जयगड खाडी. स्वराज्याच्या खजिन्यासाठी सुरतेची बाजारपेठेवर चढाई करणाऱ्या शिवरायांची मोगलांच्या संगमेश्वर बाजारपेठेकडे नजर होतीच. त्याकाळी संगमेश्वर बाजारपेठेकडे जाण्यासाठी जलमार्ग होता. मोठमोठी मालवाहू गलबते अरबी समुद्रातून जयगडच्या खाडीत शिरत असत. तेथून त्यांचा प्रवास संगमेश्वरकडे होत असे. शत्रूला कोंडीत पकडण्यासाठी शिवरायांनी जयगड आणि तवसाळचा विजयगड असे दोन किल्ले बांधले. माल घेऊन येणाऱ्या जहाजांची जयगड किल्ल्यावरून टेहळणी होत असे. दूरवर दिसणारी गलबते जयगड खाडीत शिरायला किमान एक दिवस तरी लागायचा. त्याकाळी इंजीनावर चालणारी जहाजे नव्हती. वाऱ्यावर चालणारी शिडांची गलबते (जहाज) होती. वाऱ्याच्या लहरीपणावर आणि भरती-ओहोटीवर त्यांचा प्रवास होत असे.

अरबी समुद्राच्या धडका सहन करत शास्त्री नदीच्या संगमावर उभा असलेला जयगड किल्ला. पलीकडे.. स्वयंभू श्री गणेशाचे मंदिर असलेला तवसाळ गाव

गलबते खाडीत शिरली की जयगड आणि विजयगड किल्यावरून शत्रूंच्या जहाजांवर मारा व्हायचा. शत्रू जेरीस यायचा मग त्या गलबतातील मालावर मावळ्यांचाच हक्क असायचा.  अशा या महत्त्वाच्या किल्ल्याची बांधणी पूर्ण होत आली असताना प्रवेशद्वाराचे बांधकाम मात्र रखडले होते. प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण होत आल्याचे समाधान व्यक्त करावे तोच त्याचे चिरे कोसळत असत. असे अनेकदा झाले. गवंडी कंटाळले, आरेखक त्रस्त झाले. सर्वांनीच हात टेकले. अशावेळी राजपुरोहितांना पाचारण करण्यात आले. राजपुरोहितांनी सल्ला दिला. एकेक चिरा तपासोनी पाहावा. त्यावेळी केवळ गवंड्यांवर काम न संपवता आरेखकही चिरा तपासोनी पाहू लागले.  त्यानंतर राजपुरोहितांची त्यावर नजर फिरत असे. नंतर तो चिरा गवंड्यांच्या हाती सोपवला जात असे. असे होता होता श्री गणेशाचा आकार असलेला  एक चिरा आरेखकांच्या नजरेस पडला. त्यांनी तो  राजपुरोहितांकडे सोपवला. राजपुरोहितांची खात्री झाली. हा तो दगड नसोनि दगडात प्रत्यक्ष गणरायांनी आकार घेतला आहे. त्यानंतर प्रत्येक दगडाची (चिऱ्याची) बारकाईने तपासणी होऊ लागली. तेव्हा दुसरा दगड आढळला…ज्याच्यावर हनुमंताचा आकार होता. मग काय, उसंत कसली? प्रवेशद्वार कोसळण्याचे कारण तर स्पष्ट झाले. दोन्ही चिरे वेगळे काढण्यात आले. त्यांचे यथाविधी शुद्धीकरण करण्यात आले. जणू येथे किल्ला बांधून पूर्ण व्हावा हे तो श्रींची इच्छा. म्हणून किल्ल्यातच मंदिर बांधण्यात आले.

विजयपताका फडकावणारा तवसाळचा विजयगड

पुढे स्वराज्यासाठीच्या लढाईत किल्ल्याचे फार नुकसान झाले. मोगलांची जहाजे कोंडीत सापडली की जयगड आणि विजयगडातून त्यांच्यावर हल्ला चढवला जात असे. त्यामुळे मोगल सैन्यांनी विजयगड लक्ष्य केले. जेव्हा किल्ल्याचे नुकसान होऊ लागले तेव्हा मूर्तींना धोका पोहोचू नये म्हणून बाजूलाच असलेल्या घेऱ्यात (एका ठिकाणाचे नाव, जेथे पूर्वी जंगल होते.) झोपडीवजा मंदिर बांधून त्या मूर्ती तेथे स्थलांतरित करण्यात आल्या.
तवसाळ गावातील दानशूर व्यक्ती तुकाराम बाबाजी सुर्वे यांनी कालांतराने मंदिरासाठी जागा दान केली. त्या जागेत श्रीगणेशाचे  मंदिर उभारले गेले. शिवाय श्री गणेशाच्या उत्सवात कोणतीही न्यूनता भासू नये यासाठी भातशेती होईल अशी जमीनही दान केली. त्याकाळी हे मंदिर माडांच्या बनात होते. शंभराहून अधिक माड होते. १९९० च्या दशकांपर्यंत हे मंदिर माडांच्या बनात होते. मात्र माड जुने झाले, दळणवळणाची साधने आणि व्यापारउदीम वाढल्यानंतर माडांच्या जागी आंबा कलमांची लागवड करण्यात आली. माडांच्या बनात शोभून दिसणारे मंदिर आता आमराईच्या छायेत आले. ही सर्व माहिती एकाकडून दुसऱ्यांकडे आलेली आहे. काही संदर्भ वेगळेही असू शकतात. मात्र ज्या महान विभूतींनी मंदिरासाठी जागा दिली, त्यांचे घर तवसाळ गावी होते. कालांतराने ते कोसळले. त्या घराचा चिरंबेदी पाया त्यांच्या दौलतीची आणि मोठ्या मनाची ओळख देत असे. आता त्या पायावर त्यांच्या वारसांनी तवसाळ गावी बंगला बांधला असून, त्यांच्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा मिळत आहे.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध