
तवसाळ गावी लोटला
भावभक्तीचा महापूर

ग्रामदेवता महामाई-सोनसाखळी मंदिराचा
जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळ्यासाठी
रत्नागिरी जिल्ह्यातील भाविकांची तुफान गर्दी
गुहागर ः उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे गंगा नदीकिनारी महाकुंभमेळा भरला असतानाच, तवसाळ गावी सोमनाथ मंदिराकडून वाहत येणाऱ्या काशीवंडा नदीकिनारी वसलेल्या ग्रामदेवता महामाई-सोनसाखळी मंदिराच्या जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांचा महामाईमेळा भरला होता. भाविकांच्या तुडुंब गर्दीत चार दिवस हा महामाईमेळा चालला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या गुहागर तालुक्यातील तवसाळ गावच्या (तवसाळ पंचक्रोशीच्या : तवसाळ, पडवे, रोहिले, तांबड, बाबर) श्री देवी महामाई-सोनसाखळी ग्रामदेवतेच्या नव्याने बांधलेल्या मंदिराचा लोकार्पण आणि कलशारोहण सोहळ्यासाठी चार दिवस भाविकांचा महापूर लोटला होता. त्यानिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी होतीच; परंतु प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात जसे गंगा-यमुनेच्या संगमावर पवित्र स्नान केले जाते. त्याप्रमाणे महामाई मेळ्यात सोमनाथ मंदिराकडून वाहत येणाऱ्या पवित्र काशीवंडा नदीत स्नान करून पुण्यफल मिळविण्याची व्यवस्था होती.

रत्नागिरी जिल्ह्यातील महामाई-सोनसाखळी ग्रामदेवतेची महती ठाऊक असलेल्या सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील भविकांनीही या सोहळ्यासाठी तुफान गर्दी केली होती. शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झालेल्या या महामाई मेळ्याचा सोमवार १७ फेब्रुवारी रोजी समारोप झाला. मात्र ते चार दिवस न भूतो न भविष्यती असा डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा झाला.
हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आणि माहेरवाशीणींची पाठराखण करणारी अशी महामाई-सोनसाखळी देवीची ख्याती, तर दुर्जनांचा संहार करणारा बावा रवळनाथ देव, सोबतीला देवी त्रिमुखी आणि सोमजाय आहेतच. अशी दिगंत किर्ती असलेल्या देवीचा सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्याचे भाग्य मिळणार म्हटल्यानंतर ही संधी कोण सोडणार? चार दिवस भाविकांचा महापूर लोटला होता. रात्रंदिवस गटागटाने लोक येतच होते.

मंदिरावर चढवण्यात आलेले कलश माहेरवाशीणींच्या निधीतून घडवण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देवीच्या गादी (देवीचे मानकरी गावठे राजेश सुर्वे यांचे घर) पासून मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या कलशांच्या सवाद्य मिरवणुकीत माहेरवाशीणींचा मोठा सहभाग होता. तीन तास ही मिरवणूक चालली होती. दुसऱ्या दिवशी षोडशोपचारे पूजन करून कलशारोहण करण्यात आले. तिसऱ्या दिवशी मंदिरात दृष्ट ओवाळणी करण्यात आली आणि चवथ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा आणि तांबड-बाबरवाडीच्या सुप्रसिद्ध नमनाच्या कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता करण्यात आली.
ग्रामदेवता महामाई-सोनसाखळी मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याची आणि कलशारोहण कार्यक्रमाची माहिती चार ओळीत सांगण्यात आली असली तरी हा सोहळा रात्रंदिवस चालू होता. यावेळी रसिकांना आणि भाविकांना संगीत भजनांची मेजवानीच मिळाली. पंचधातूच्या कलशांच्या काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आबाल-वृद्धांप्रमाणे माहेरवाशीणींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
झळकला कळस
मंदिरे ही ग्रामवासीयांची श्रद्धास्थाने असतात. कोणी दररोज किंवा आठवड्यातून एकदा अशाप्रकारे वेळ मिळेल तेव्हा आपापल्या श्रध्दास्थानाला वंदन करण्यासाठी येत असतात. तवसाळ पंचक्रोशीची ग्रामदेवता त्या पंचक्रोशीची न राहता, “हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी” अशी तिची ख्याती सर्वदूर पसरल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील भविकांचेही ते श्रद्धास्थान झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच घडणारा हा कलशारोहणाचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. जणू भक्तीचा मळाच फुलला होता. शनिवारी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी मंदिरावर चढवतानासुद्धा पहिल्या दिवशी कलश आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीला येऊ न शकलेल्या जिल्हाभरातील भाविकांसाठी मंदिराभोवती कलशाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आणि श्री देवी महामाई सोनसाखळीच्या जयघोषात कलश मंदिरावर दिमाखात झळकविण्यात आला.
होमहवन आणि दृष्टओवळणी
आपल्या हिंदु संस्कृतीत होमहवन आणि दृष्ट काढणे याला मोठे महत्त्व आहे. घरात सुख-शांती नांदावी म्हणून होमात आहुती देण्याची प्रथा आहे. तसेच दृष्ट काढण्याचीही प्रथा आहे. घरात नवीन पाहुणा (बाळ) आल्यावर त्याला बाहेरची बाधा (संसर्ग) होऊ नये, त्याला उत्तम आयुरारोग्य लाभावे म्हणून होम (धुरी) करून शेक दिला जातो. त्याला पाहायला येणाऱ्या अनेकांची दृष्ट लागू नये म्हणून त्याची दृष्ट काढण्यात येते. त्याप्रमाणेच जीर्णोद्धार झालेल्या मंदिराचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी होमविधी करण्यात आला. त्यात विविध पदार्थांची आहुती देऊन पंचमहाभूतांची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करण्यात आले. तसेच मंदिराची, त्याचबरोबर भविकांचीही दृष्ट ओवाळणी करण्यात आली.
पर्यायावरणपूरक हवनकुंड
वेळी करण्यात आलेल्या होमसाठी धातूचे हवनकुंड न वापरता नैसर्गिक साधनसामग्रीचा उपयोग करण्यात आला. कोळीचे खोड वापरून त्याचे कुंड तयार करण्यात आले. त्यात भरपूर मातीचा वापर करण्यात आला. त्यामुळे पर्यावरणपूरक हवनकुंड तयार करण्यात आले.
संस्कृती आणि परंपरांचा मेळ
हिंदू संस्कृतीत कोणताही धार्मिक कार्यक्रम असला तरी त्यावेळी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात येते. विष्णूदेवाला आवाहन करण्यात येते. त्याप्रमाणे जीर्णोद्धारित मंदिरांचे लोकार्पण आणि कलशारोहण सोहळ्याच्या वेळी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. तसेच संध्याकाळी भजनांचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री तांबड-बाबरच्या ग्रामस्थांचे प्रसिद्ध नमनाचा कार्यक्रम झाला. या भरगच्च कार्यक्रमाला चारही दिवस भाविकांचा महापूर लोटला होता. आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. देवीच्या दर्शनाने भाविक जसा प्रसन्न होतो, तसाच या सोहळ्यामुळेही संस्कृती आणि परंपरा लक्षात घेत देवीची महती आणि कीर्ती गातच भाविक प्रसन्न मनाने त्यांच्या गावी परतले.
महामाई मंदिर पर्यटनस्थळ व्हावे
निसर्गसान्निध्यात असलेले श्री देवी महामाई सोनसाखळीचे मंदिर अतिप्राचीन आहे. आजूबाजूला गर्द झाडी, मंदिराच्या पुढे माडांचे बन, सोमनाथाकडून येणारी आणि मंदिराच्या बाजूने खळ्ळ्ळ् ख्ळ्ळ्ळ् करत वाहणारी काशीवंडा नदी, उन्हाळ्यात पाणवठ्यावर येणारी गुरे, पक्षांचा किलबिलाट आणि निरवशांततेत भाविक मंदिरात आल्यानंतर आजूबाजूच्या डोंगरकपारीत घुमणाऱ्या घंटेच्या नादाच्या लहरी, असे मनाला प्रसन्नता देणारे वातावरण कायम आहे. या मंदिराला ब्रिटिश सरकारची सनद होती. मात्र जमाना बदलत गेला. जग जवळ येत चालले. दळणवळणाच्या सुविधा वाढत गेल्या. जिकडे-तिकडे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मंदिरांची सुधारणा होऊ लागली. मग त्यात तवसाळ गावही मागे कसे राहील? तवसाळ पंचक्रोशीतील भाविकांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विडा उचलला आणि तो तडीस नेला. आता महाराष्ट्र शासनाने या मंदिराची दखल घेऊन हे मंदिर पर्यटनदृष्या नकाशावर आणावे, अशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे.
विकासरूपी बोला नवस
मंदिराच्या इमारतीचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराच्या परिसरात अजूनही बऱ्याच सुधारणा व्हावयाचा आहेत. त्यासाठी निधीची गरज आहे. हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी श्री देवी महामाई सोनसाखळी भाविकांना तिच्या कृपाशीर्वादाची प्रचीती देत असते आणि यापुढेही देत राहील. मात्र देवीला कोंबड्या-बकऱ्याचा नवस बोलण्याऐवजी भाविकांनी निधीच्या रुपात वा मंदिर परिसराच्या एखाद्या भागाचा विकास करून नवसफेड केली तर संपूर्ण जीर्णोद्धाराचा पंचक्रोशीतील भाविकांचा आणि ग्रामस्थांचा मनोदय निश्चितच तडीस जाईल आणि जीर्णोद्धाराचा वसा सफल संपूर्ण होईल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
महाकुंभमेळा ते महामाईमेळा
कुंभमेळा हिंदूंच्या श्रद्धेचे महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. ठरावीक कालावधीनंतर हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि महाराष्ट्रात नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केले जाते. अनेक दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्यात काही दिवस मात्र शुभ आणि विशेष मानले जातात. या दिवसांत भाविक कोट्यवधीच्या संख्येने मेळ्याला हजेरी लावतात. त्याचप्रमाणे जीर्णोद्धार झालेल्या मंदिराचे लोकार्पण आणि कलशारोहण सोहळ्याच्या महामाईमेळ्याला भाविकांना गर्दी केली होती.
पवित्र काशीवंडी नदी
महामाईच्या देवळाजवळून खळ्ळ खळ्ळ नाद करत वाहणारी काशीवंडी नदी फारच पवित्र आहे. पुराणात सोमनाथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र स्थान आहे. तवसाळनजीकच असलेल्या सोमनाथ मंदिराकडून वाहणाऱ्या या नदीचे पाणी नितळ आणि गोड आहे. महामाई मंदिराच्या पुढे अरबीसमुद्राला मिळणाऱ्या खाडीशी ही नदी एकरूप होते. प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात गंगा-यमुना नद्यांच्या संगमावर भाविक जसे स्नान करून पुण्य मिळवितात. त्याचप्रमाणे महामाई मंदिराकडून वाहत जाणारी काशीवंडा नदी आणि रोहिल्यातील विठ्ठल मंदिराकडून वाहत येणारी नदी म्हणजे जणू चंद्रभागाच. या दोन्ही नद्यांचा अरबी समुद्राशी होणारा संगम हे पवित्र स्नान मानले जाते.