थाटात साजरा झाला श्री शिवाजी विद्यालयातील शिक्षक, माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
मुंबई (प्रतिनिधी) : आयुष्याला वळण देणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. कोणी हसले, कोणी मुसमुसले, कोणाला आश्चर्याचा धक्का बसला. पण… दहावी उत्तीर्णचे प्रमाणपत्र घेऊन शाळेची पायरी उतरलेले अनेकजण पुन्हा भेटले ते २८ वर्षांनी. कोणीतरी एक-दोघांनी पुढाकार घेतला आणि तेव्हाच्या सगळ्यांची मोट बांधली आणि साजरा झाला स्नेहमेळावा!
देहूरोड येथील श्री शिवाजी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९६-१९९७ या १० वी बॅचमधील शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा नुकताच थाटामाटात पार पडला. यावेळी तब्बल २८ वर्षानंतर शिक्षक व त्यावेळचे विद्यार्थी (आता आई-बाबा, आजी-आजोबा) एकत्र जमले. प्रत्येकाला हुरहूर होती… कोण कसा दिसत असेल याची उत्सुकता होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह, प्रेम, उर्जा यांचा सुंदर मिलाफ पहावयास मिळाला. या स्नेहसंमेलनात विविध विषयातील सुमारे ४० शिक्षक व १२० माजी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. या शाळेतील माजी विद्यार्थी, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, अनेक खाजगी कंपनीमध्ये मॅनेजर, आय.टी. क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती/तज्ज्ञ, नगरसेवक व इतर अशा समाजातील प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. सर्व माजी विद्यार्थ्यांनी याचे श्रेय शाळेलाच दिले हे विशेष.
श्री शिवाजी विद्यालय , देहूरोड ही शाळा सन १९६१ पासून देहूरोड व आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिक्षणाच्या पवित्र कार्यात अग्रेसर आहे. या शाळेने शिक्षण क्षेत्राच्या पवित्र कार्याद्वारे अनेक पिढ्या घडविल्या. शाळेने शिक्षणाच्या माध्यमातून लावलेल्या बीजांना अंकुर फुटून त्याचा वटवृक्ष झाला. तो वटवृक्ष समाजास दिशा दाखविण्याचे कार्य करत आहे.
या स्नेहसंमेलनास माजी प्राचार्य श्री. डुंबरे, श्री. शिंदे, सध्याचे प्राचार्य श्री. शिंदे, तसेच अनेक शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते व निवेदक प्रा. लक्ष्मण शेलार यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. मोहन पाटील, सहाय्यक डाक अधीक्षक, मुंबई यांनी केली. तर प्राध्यापक सौ. सुवर्णा धुमाळ-सिध्दे यांनी आभार प्रदर्शन केले.

