अभिनेते अभय कुलकर्णी यांनी दिला करिअरमंत्र
मुंबई (युवराज अवसरमल) : विद्यार्थ्यांना आपल्या करिअरविषयी धोरण ठरविण्यासाठी शाळेने त्यांच्यातील कलागुण जोपासले पाहिजेत, असा करिअर मंत्र अभिनेते अभय कुलकर्णी यांनी दिला. माहीम येथील सरस्वती मंदिर हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अभय कुलकर्णी म्हणाले, माझी शाळा अलिबागमध्ये होती. त्यावेळी आमची प्रतिभा दाखविण्यासाठी आम्हाला वर्षभरात फक्त स्नेहसंमेलन ही एकच संधी होती. आज शाळेतर्फे भरपूर स्पर्धा घेतल्या जातात, विद्यार्थ्यांमधील कला जोपासल्या जातात. शाळेने विद्यार्थ्यांमधील कला जपली पाहिजे, असे कुलकर्णी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, भविष्यातील आपल्या करिअरविषयी धोरण ठरविण्याचे विद्यार्थ्यांचे हेच वय आहे. त्यामुळे त्यांना आता त्याविषयी योजना आखण्यास वेळ मिळेल. आईवडिलांसोबत शाळेने देखील विद्यार्थ्यांमध्ये कला जपली पाहिजे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांमधील कला शिक्षकांमार्फत जपली जातेय याचे प्रमाणपत्रच कुलकर्णी यांनी दिले. विद्यार्थ्यांमधील भविष्यातील करिअरविषयीचा पाया शाळेत रोवला जातो. त्याच्या कलागुणांना येथे प्रोत्साहन मिळते. रंगमंचावर कला सादर करण्यासाठी मोठे धैर्य लागते. अभ्यास सांभाळून कला जपण्याचे मोठे कार्य शाळा करीत असते. कोणत्याही क्षेत्राला कमी लेखून चालणार नाही. अभिनय करणे ही देखील कठीण गोष्ट आहे. कारण ती आपल्या जीवनाशी, भावनाशी निगडित असते. शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे. अभिनयाकडे केवळ मनोरंजनदृष्ट्या न पाहता उदरनिर्वाहाचे साधन म्हणून देखील पाहिले गेले पाहिजे. लोकांचा अभिनयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर ही कला अजून जोमाने विकसित होईल. कला केवळ आपले मनोरंजन न करता ती आपल्याला जिवंत ठेवत असते. आपल्याला नैराश्यातून कलाच बाहेर काढते. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कल पाहून त्याला त्या कलेसाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यानी स्वतः वर विश्वास ठेवावा, संयम ठेवावा आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून वाटचाल करावी. विद्यार्थ्यानी वाचन करावे, स्वतःवर विश्वास ठेवावा, संयम ठेवावा, दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा, आपले स्वप्न गाठण्याचा प्रयत्न करा, जीवनातील संकटाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा, असा मोलाचा सल्ला कुलकर्णी यांनी दिला.
या स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे कलावंत अभय कुलकर्णी यांच्या भाषणांनी मुले भारवून गेली. वेगवेगळ्या आंतरशालेय व शालेय स्पर्धात व क्रीडा क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करण्यात असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे सचिव संजय सुखटणकर, ट्रस्टी प्रकाश नायक, मुख्याध्यापक मारुती चाबुकस्वार, उपमुख्याध्यापिका शामल बिनसाळे, पर्यवेक्षक कृष्णा जाधव, इंग्रजी माध्यम शिशु वर्गाच्या मुख्याध्यापिका कविता पगारे, मराठी माध्यम शिशु वर्गाच्या मुख्याध्यापिका वैष्णवी चोथे उपस्थित होत्या.
महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलच्या प्राथमिक विभागाला तृतीय क्रमांक मिळाला. रोख एक लाख रुपये असे पारितोषिकाचे स्वरूप होते. त्याचा आनंद या स्नेहसंमेलनात जाणवत होता. त्यामुळे हे संमेलन दर वर्षापेक्षा वेगळे जाणवत होते.

