मुंबई ः बिनविरोध निवड सरळ मार्गाने झाली नाही. बिनविरोध निवडणुका या धमकी, पैसे आणि यंत्रणांचा गैरवापर याच्यामुळे झालेल्या आहेत. पालिकेने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला होता, त्यालाही निवडणूक आयोगाने क्लीनचीट दिली. पैसे देऊन ज्या ठिकाणी लोकांनी टोकन घेतले, त्यांना अर्ज भरू दिले नाहीत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. मात्र, बिनविरोध निवडणुका होत असल्याने जोरदार टीका केली जात आहे. सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसतंय की, बिनविरोध सरळ मार्गाने झाली नाही. निवडणूक आयोगाकडून राहुल नार्वेकर यांनी क्लीनचीट देण्यात आली. बिनविरोध निवडणुका ही धमकी, पैसे आणि यंत्रणांचा गैरवापर याच्यामुळे झालेली आहे. निवडणूक आयोगाने पालिकेने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला होता, त्यालाही क्लीनचीट दिली. पैसे देऊन ज्याठिकाणी लोकांनी टोकण घेतले, त्यांना अर्ज भरू दिली नाहीत. शिवसेना आणि मनसेचे उमेदवार बबन महाडिक हे रांगेत उभे आहेत. त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही. हे सर्व निवडणूक आयोगाला दिसत नसेल तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो, असा आरोप राऊत यांनी केला.
पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, या निवडणूक आयोगाच्या काळात 70 ठिकाणी महाराष्ट्रात बिनविरोध होतात. यापूर्वी महाराष्ट्रात मोठमोठे नेते होऊन गेले. अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, मनोहर जोशी असे मोठमोठे नेते होऊ गेले, पण कोणी बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही. मग हे छपरी टपरी शिंदे आणि भाजपाचे गुंड लोक हे बिनविरोध निवडून आणले जातात आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीनचीट देत आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.
निवडणूक आयोगाचा क्लीनचीटचा हा कारखाना देशासाठी आणि राज्यासाठी धोकादायक आहे. प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगाने घोटाळा केला, नियमाच्या बाहेर जाऊन काम केले जातंय, कायद्याचे उल्लंघन होतंय. सत्ताधारी पक्षाला मदत होईल, असे काम केले जात आहे. पण निवडणूक आयोगाला या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल, असे राऊत म्हणाले.

