●सरकार सन्माननिधी द्यायच्या तयारीत ●
●विरोधक म्हणतात ‘आचारसंहिता भंग’ होईल●
मुंबई ः नगरपालिका. नगरपंचायती निवडणुका आणि महापालिका निवडणुकांची आचारसंहिता यामुळे लाडक्या बहिणांचा डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ चा रखडलेला सन्माननिधी मकर संक्रांतीला देण्याचा प्रयत्न सरकारडून होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र निवडणूक होण्याच्या आधी सन्माननिधी दिल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरेल, असा विरोधकांचा आक्षेप आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. सन्माननिधी कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत त्या आहेत.
ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती, या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वार वाहत आहे.
आधी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांची आचारसंहिता आणि त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. यामुळे या योजनेतील पैशांना ब्रेक लागला होता, तरी देखील सरकारने मध्यंतरी नोव्हेंबरचा हाफ्ता लाभार्थी महिलांना वितरीत केला, मात्र डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे आता लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आता या योजनेतील लाभार्थी महिलांची सक्रांत गोड करण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी अशा दोनही महिन्याचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 14 किंवा 15 जानेवारी रोजी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र तसे झाल्यास त्यासा विरोधकांकडून आक्षेप येण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकी दरम्यान सरकारने महिलांना सन्मान निधी दिल्याने त्याचा सरकार पक्षाला फायदा झाला होता. आता महापालिका निवडणूक असल्याने आणि मतदान १५ जानेवारी रोजी असल्याने लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा हाफ्ता मकर सक्रांतीपूर्वी मिळल्यास त्याचा सरकारपक्षाच्या उमदवारांना फायदा होईल. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे, जर लाभार्थी महिलांना निधीचं वितरण झाले तर हा आचारसंहितेचा भंग होईल असे विरोधकांनी म्हटले आहे. त्यामुळे सन्माननिधी मिळण्यात लाडक्या बहिणींची कोंडी होण्याची शक्यता आहे. कदाचित निवडणुका झाल्यावरच पैसे बँक खात्यात जमा होण्याची अधिक शक्यता आहे.●

