Sunday, May 17, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeब्रेकिंग न्यूजसुनेत्रा पवारांचा होकार

सुनेत्रा पवारांचा होकार

राष्ट्रवादीच्या विधिमंडळ सदस्यांच्या

उद्याच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

राज्याला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

संध्याकाळी ५ वाजता होणार शपथविधी

मुंबई ः  उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीत कोणाकडे असेल याबाबत तर्कवितर्क सुरू असतानाच असतानाच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना होकार कळविला आहे. त्यामुळे उद्या सकाळी राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत त्यांची विधानमंडळातील गटनेत्या म्हणून निवड होऊन शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता विधानभवनात बैठक होईल.  त्यानंतर संध्याकाळी त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होईल. उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभणार आहेत.

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीकडे असणारे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि आमदारांनी उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांना मिळावे याबाबतचे एकमत मुख्यमंत्री फडणवीस यांना कळविण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनीही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मागणीला सहमती दर्शविली होती. मात्र सुनेत्रा पवार यांचा होकार आवश्यक होता.  मात्र त्यांना दुःखातून सावरायला अवधी मिळाला पाहिजे म्हणून काही धार्मिक विधी होण्यापर्यंत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी धीर धरला होता. आज अस्थिविसर्जन झाल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य महत्त्वाच्या नेत्याने राजकीय सल्ला देणारे, अजित पवारांच्या जाहिरातीचे काम पाहणाऱ्या डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी आज दुपारी पवार कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिला. तसा निरोप घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे शनिवारी  सकाळी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत त्यांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यातून बाहेर येण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावे अशी मागणी करण्यात येत होती. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुखपदही त्यांच्याकडेच राहावे यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते.

विधीमंडळ गटनेत्याची निवड

पक्षाकडून होत असलेल्या आग्रहानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकरण्यास मान्यता दिली आहे. अजित पवारांच्या जाहिरातीचे काम पाहणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.  शनिवारी, राष्ट्रवादीच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी  सुनेत्रा पवार यांची त्या पदावर निवड होणार आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

अजित पवारांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर पाच बड्या नेत्यांची बैठक झाल्याचे समजते.  त्यामध्ये हा निर्णय झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने घेतलेल्या या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार आहे. त्यानुसार शनिवारीच सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्याकडे अर्थखाते, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क खाते होते. ही महत्त्वाची खाती कुणाला द्यायची यावरही खलबतं केली जात आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचे असलेले अर्थखाते आपल्याकडेच राहावे असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला एकसंध बांधण्यासाठी पवार कुटुंबीयांमधील कुणाकडे तरी पक्षाची धुरा असावी असे मत भाजपच्या नेतृत्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.  त्यामुळेच पक्षप्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे देखील बोलले जात आहे.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध