Saturday, April 18, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeब्रेकिंग न्यूज'सु'नेत्रा राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा

‘सु’नेत्रा राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदासह
पक्षाच्या सर्वच जबाबदाऱ्या

मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाच्या सर्वच जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेतल्या आहेत. आज राजभवनाच्या लोकभवन सभागृहात अगदी साध्या समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्या शपथविधीने उपमुख्यमंत्री कोण हा प्रश्न मिटला आहे. पण पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्या त्या सक्षमपणे पेलतील का, असा प्रश्न केला जात आहे

राजभवनातल्या लोकभावनमधील धीरगंभीर वातावरण, सभागृहात कोठेही फुलांची सजावट नाही की विद्युत रोषणाई नाही, एकदम साधे वातावरण… अशा वातावरणात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत झाल्यानंतर श्वेत वस्त्र परिधान केलेली महिला व्यासपीठावर चढते आणि राज्यपालांच्या सूचनेनुसार शपथ घेते…. मी सुनेत्रा अजित पवार प्रतिज्ञा करते की… या शपथविधी नंतर महाराष्ट्राला सुनेत्रा पवारांच्या रूपाने पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या. यावेळी “अजितदादा अमर रहे” “एकच वादा अजित दादा” या घोषणांनी कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या आठवणी जागवत वातावरण अधिकच गंभीर बनले. त्याचवेळी “सुनेत्रावहिनी आगे बढो, हम तुम्हारे साथ है” असे आश्वासनही दिले. अशा धीरगंभीर वातावरणात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीच्या विधिमंडळाच्या सदस्यांनी राष्ट्रवादीच्या विधिमंडळाच्या गटनेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आणि पक्षनेते म्हणून सर्व संवैधानिक निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले. त्यामुळे अजित पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा म्हणून सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले. त्याचबरोबर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यात सर्वत्र जबरदस्त धक्का बसला होता. सारे आवक झाले होते. सर्वत्र दुःखद वातावरण होते. पण त्याही परिस्थितीत आता पुढे काय, हे प्रश्नचिन्ह होतेच. त्याचे उत्तर शोधण्याची राष्ट्रवादीच्या कोअरकमिटीने सुरुवात केली. त्यातूनच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आले. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीने भेट घेऊन उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव सुचविले. मुख्यमंत्र्यांनीही त्या प्रस्तावाला सकारात्मकता दर्शविली आणि पुढच्या घडामोडी पटापट होत गेल्या. अजित पवारांच्या अस्थिविसर्जनानंतर शुक्रवारी ३० जानेवारीपासून या घडामोडींनी वेग घेतला. उपमुख्यमंत्री पदासह अजित पवारांकडील सर्व जबाबदाऱ्या स्वीकारण्यास सुनेत्रा पवार यांनी काल होकार दर्शविला. सुनेत्रा पवार कालच मुंबईत अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी येऊन दाखल झाल्या आणि आज शपविधीनंतर त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तबही झाले.
काल सर्वांना निरोप देऊन राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना आज मुंबईत बोलावून घेण्यात आले. सकाळी ११ वाजता सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यांना एकूण परिस्थितीची कल्पना देण्यात आली. त्यानंतर विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली.

सुनेत्रा पवार दुपारी २ वाजता विधानभवनात दाखल झाल्या. त्यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीच्या विधिमंडळ सदस्यांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक सुरू झाली. या बैठकीत अजित पवार यांच्याबाबतचा शोकप्रस्ताव प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून मांडण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या गतनेते पदाचा प्रस्ताव मांडला. त्याला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. या प्रक्रियेनंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. गतनेतेपदी निवड झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी या बैठकीत दोन ठराव मांडले. त्यापैकी पहिला ठराव म्हणजे सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी पक्षनेतेपदी निवड आणि दुसरा ठराव म्हणजे पक्षनेते म्हणून सर्व संवैधानिक निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले. हे ठरावही एकमताने मंजूर करण्यात आले.
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी ते पत्र राज्यपालांकडे पाठविले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. महायुतीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत संध्याकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अर्थ खाते वगळता त्यांना अजित पवारांकडील सर्व खाती देण्यात आली आहेत.◆

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध