भाजपच्या रितू तावडे होणार
मुंबईच्या महापौर
शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेत महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. तर मुंबईच्या उपमहापौरपदी शिंदेसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
रितू तावडे यांचे पूर्वाश्रमीचे नाव ज्योती चंद्रकांत सावंत असे असून मालवण तालुक्यातील पेंडुर खरारेवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचे सासर राजापूर तालुक्यातील विल्ये गावी आहे. त्यामुळे रितू तावडे या खऱ्या अर्थाने कोकण कन्या आहेत. त्यामुळे आशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या महापालिकेची सूत्रे महापौर म्हणू भाजप नगरसेविका असलेल्या रितू तावडे यांच्या हातात येणार असल्याने मालवण आणि राजापूर तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
रितू तावडे या अडीच वर्षांसाठी महापौर राहणार आहेत, तर संजय घडी हे सव्वा वर्षांसाठी उपमहापौर असणार आहेत.
महापौरपदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाले होते. त्यामुळे भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली.
सध्याचे भाजप-शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ पाहता आणि शिवसेना ठाकरे गटाने महापौरपदाच्या शर्यतीत न उतरण्याचे ठरविले असल्याने रितू तावडे यांनी महापौरपदी निवड निश्चित आहे. फक्त त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. ही निवड ११ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाईल.
भाजपचा मराठी चेहरा
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाने मराठी महापौरपदाच्या मुद्द्यावरुन भाजपला घेरले होते. भाजपने सुरुवातीला आपला महापौर हिंदू असेल, असे म्हटले होते. तर ठाकरे गटाने आपला महापौर मराठी असेल असे म्हटले होते.
मराठी मतदार नाराज होतील, हे लक्षात घेऊन भाजपनेही मुंबईचा महापौर हिंदू असेल आणि तो मराठी असेल असे म्हटले होते. त्यामुळे आता कोणताही वाद टाळण्यासाठी भाजपने रितू तावडे यांच्या रुपाने मुंबईच्या महापौरपदी मराठी चेहरा बसवला आहे.
पक्षभेद विसरून काम करणार
रितू तावडे यांनी महापौरपदी नाव घोषित झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.
भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे, पक्ष जो निर्णय घेतो, तो आम्हाला मान्य असतो. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मी सर्वांचे आभार मानते. सर्वांनी निर्मळ आणि प्रामाणिकपणे काम करावे. मुंबईची महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेक निवडून गेले आहेत. सभागृहाची गरिमा ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरुन निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं अशी माझी अपेक्षा आहे, असे रितू तावडे यांनी म्हटले.
पंचवीस वर्षांनंतर महापौरपद
मुंबई महापालिकेत २५ वर्षे शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. परंतु भाजपला नेहमी उपमहापौरपदावर समाधान मानावे लागत होते. २०१७ मध्ये शिवसेनेशी बरोबरी करायला भाजप नगरसेवकांचे संख्याबळ केवळ दोन जागांनी कमी पडले. त्यावेळी शिवसेनेने युतीच्या अलिखित नियमानुसार महापौरपद आपल्याकडेच ठेवले. तेव्हा मात्र भाजपने उपमहापौरपद आणि संवैधानिक समित्यांची अध्यक्षपदे न स्वीकारत केवळ पहारेकरी म्हणून भूमिका घेतली होती. तेव्हाच खरी भाजपच्या नाराजीची चाहूल लागली होती. त्यानंतर मागील आठ वर्षे शिवसेना-भाजपमध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. त्या सत्तासंघर्षात भाजप मोठा पक्ष ठरला आणि त्यांना महापौरपदासाठी उमेदवार जाहीर करण्याची संधी मिळाली.
चार माजी महापौरांचा करणार सामना
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये मिलिंद वैद्य, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव आणि विशाखा राऊत या चार माजी महापौरांचा समावेश आहे. या सगळ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची प्रत्येक नस माहिती आहे. त्यामुळे रितू तावडे यांना सभागृहात ठाकरे गटाच्या या 4 माजी महापौरांच्या आरोपांना आणि शाब्दिक टीकेला तोंड द्यावे लागणार आहे. त्या चार माजी महापौरांचा सामना करताना त्यांची कसोटी लागणार आहे.
एका निर्णयाने दोन हेतू साध्य
मुंबईच्या महापौरपदी भाजपने रितू तावडे यांच्या रूपाने मराठी चेहरा दिला, पण गुजराती व्होटबँक भक्कम केली. त्यामुळे भाजपने एका निर्णयात दोन हेतू साध्य केले आहेत.
मुंबई महानगरपालिकेची सत्ता पहिल्यांदाच हस्तगत करण्यात यश मिळवलेल्या भाजपने शनिवारी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 132 मधून विजयी झालेल्या नगरसेविका रितू तावडे यांची महापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना युतीने 114 हा बहुमताचा आकडा गाठल्याने रितू तावडे यांनी महापौरपदावरील निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे.
घाटकोपरचा वॉर्ड क्रमांक 132 चा परिसर हा गुजरातीबहुल म्हणून ओळखला जातो. या वॉर्डमध्ये विद्याविहार पूर्वेचा काही भाग, गारोडिया नगर, सोमय्या कॉलेज आणि राजावाडी रुग्णालयाचा भाग येतो. या भागात मोठ्याप्रमाणावर गुजराती आणि जैन वस्ती आहे. त्यामुळे हा वॉर्ड भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. रितू तावडे या मराठा समाजातील आहेत. मात्र, भाजपने त्यांना आपल्या गुजरातीबहुल बालेकिल्ल्यातून निवडून आणत आता थेट महापौरपदावर बसण्याची संधी दिली आहे. भाजपने रितू तावडे यांच्या रुपाने महापौरपदासाठी मराठी चेहरा दिला असला तरी अप्रत्यक्षपणे गुजराती व्होटबँकेला आश्वस्त केल्याची चर्चा आहे.
रितू तावडे यांनी कारकीर्द
रितू तावडे यांची भाजपने महापौरपदासाठी केलेली निवड अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. रितू तावडे या सर्वप्रथम 2017 मध्ये घाटकोपरमच्या प्रभाग क्रमांक 121 मधून निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी वॉर्ड क्रमांक 132 मधून विजय मिळवला. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भुषविले आहे. याशिवाय, त्या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष राहिल्या आहेत.
रितू तावडे यांच्या नावामागे
काही महत्वाची कारणे
रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजपने मुंबईचा महापौर बसवताना अत्यंत सूक्ष्म राजकीय गणिते आखल्याचे बोलले जात आहे. रितू तावडे यांना महापौरपदाची उमेदवारी देऊन भाजपने एकाच वेळी मराठी अस्मिता आणि सोशल इंजिनिअरिंग असा दुहेरी मास्टरस्ट्रोक खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
●मराठी-गुजराती समाजातील दुवा :
रितू तावडे या स्वतः मराठा समाजातील असून एक खंबीर मराठी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. तरीही त्या घाटकोपरमधील गुजराती बहुल प्रभाग क्रमांक १३२ मधून निवडून येतात. भाजपसाठी हा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक आहे. यामुळे पक्षाला मराठी मतदारांची सहानुभूती मिळेलच. पण गुजराती मतदारांमध्येही आपला प्रतिनिधी सर्वोच्च पदावर असल्याचा विश्वास निर्माण होईल. हे समीकरण येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते.
●शिक्षण समितीमधील प्रभावी कामगिरी :
रितू तावडे यांची ही नगरसेवक म्हणून दुसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद अत्यंत प्रभावीपणे भूषवले आहे. महापालिकेतील गुंतागुंतीचे विषय आणि प्रशासकीय कामकाज हाताळण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ठेवलेला वचक यामुळे त्या एक अभ्यासू नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात.
●विरोधकांच्या मराठी महापौर कार्डाला छेद :
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून भाजपचा महापौर अ-मराठी असेल असा प्रचार केला जात होता. मात्र, रितू तावडे या मराठी असल्याने त्यांच्या रूपाने एक खंबीर मराठी चेहरा भाजपने महापौरपदाच्या शर्यतीत उतरवला आहे. त्यामुळे भाजपने विरोधकांच्या राजकारणाला ब्रेक लावला आहे.
●आक्रमक वक्तृत्व आणि पक्षाशी निष्ठा :
रितू तावडे या केवळ अनुभवीच नाहीत, तर त्या आक्रमक वक्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. सभागृहात विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपला एका कणखर नेतृत्वाची गरज होती, जी तावडे यांच्या रूपाने पूर्ण होईल, असे म्हटले जात आहे.
●. पक्षांतर्गत पकड आणि क्लीन इमेज:
नगरसेवक पदाच्या दोन टर्ममध्ये रितू तावडे यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ राहिली आहे. घाटकोपर हा भाजपचा अभेद्य बालेकिल्ला असून तिथे त्यांनी केलेली बांधणी पक्षाला अधिक मजबूत करणारी ठरली आहे. महिला आरक्षण असल्याने पक्षाकडे इतरही नावे होती, परंतु रितू तावडेंचा प्रशासकीय अनुभव सर्वाधिक असल्याने त्यांचे पारडे जड ठरले आहे.

