Sunday, May 17, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeब्रेकिंग न्यूजखेडच्या कन्यांची 'फेडरेशन कप'साठी निवड

खेडच्या कन्यांची ‘फेडरेशन कप’साठी निवड

तस्नीम बुरोंडकर, समरीन बुरोंडकर यांची
कबड्डीसाठी महाराष्ट्र संघात निवड

मुंबई : संगणक युगामुळे जग जवळ आले आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे गल्लीबोळातील मुलानाही प्रगतीची द्वारे खुली झाली आहेत. खेडच्या (रत्नागिरी) दोन मुलींची त्यांच्या मेहनतीच्या जोरावर फेडरेशन कपसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
मध्यप्रदेश येथे १९ मार्च ते २२ मार्च २०२६ दरम्यान पाचवी सीनियर फेडरेशन कप महिला कबड्डी स्पर्धा होत आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन होतकरू महिला खेळाडू तस्नीम बुरोंडकर आणि समरीन बुरोंडकर यांनी महाराष्ट्र संघात स्थान मिळवत जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

अनिकेत स्पोर्ट्स क्लब, भरणे येथील तस्नीम बुरोंडकर आणि समरीन बुरोंडकर या खेळाडूंची महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेसाठी राज्यभरातून उत्कृष्ट खेळाडूंची निवड प्रक्रिया पार पडली होती. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तस्नीम व समरीन यांनी निवड समितीचे लक्ष वेधून घेत महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले.

दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत जिल्हा व विभागीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबियांचे पाठबळ आणि अनिकेत स्पोर्ट्स क्लबचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.

राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या प्रतिष्ठित फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही मोठी बाब मानली जात असून, त्यांच्या कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडीबद्दल क्रीडाप्रेमी, स्थानिक नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दोन्ही खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी स्पर्धेतही त्यांनी उत्कृष्ट खेळ करत राज्याचे नाव उंचवावे, यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

(समाजमाध्यमावरून साभार)

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध