Sunday, May 17, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeब्रेकिंग न्यूजकेवढे हे औदार्य!

केवढे हे औदार्य!

भंडारी समाजाच्या दोन महान व्यक्ती म्हणजे ‘कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी’चे संस्थापक लोकहितवादी सी. के. (बाबासाहेब) बोले आणि दानशूर भागोजीशेठ कीर. या दोन्ही महान विभूतींचे वर्णन करायला शब्द कमी पडतील. ‘अ’ पासून सुरू ज्ञान ‘ज्ञ’जवळ गेले संपून… एवढेच आपले मर्यादित ज्ञानभांडार. परंतु या दोन महान विभूतींनी त्यांच्याकडे असलेल्या अफाट ज्ञानाच्या जोरावर समाजासाठी अनेक कामे केली. स्वातंत्र्यसेनानींना साह्य केले.

लोकहितवादी बाबासाहेब बोले यांनी भंडारी समाजाच्या उद्धारासाठी अनेक कामे केली आहेत. त्यापैकी एक दादर येथील कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी ही संस्था. ही संस्था आता १५० वर्षांकडे वाटचाल करीत आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि त्यांचे कार्य वाढविता आले नाही तरी त्यांचा सांभाळ करणे हे संस्थेत कार्यरत असणाऱ्यांचे आद्य कर्तव्य ठरते. आज संस्थेपुढे अनेक अडचणी असताना त्यांचा सामना करत संस्था टिकविणे हे आज मोठे आव्हान आहे. संस्थेचा सचिव या नात्याने ‘काया, वाचा, मने, धने’ मला शक्य होईल तशी माझ्या सहकाऱ्यांच्या सोबतीने संस्थेची सेवा करण्याची संधी मिळाली यामुळे मी स्वतःला धन्य समजतो.
भंडारी समाजाच्या दुसऱ्या महान विभूती म्हणजे दानशूर भागोजीशेठ कीर. दानशूर या उपाधीतच त्यांचे गुणविशेष आणि मोठेपण सामावलेले आहे. कशाचीही अपेक्षा न करता स्वतःकडे असलेले दुसऱ्याला दान करणे यालाच म्हणतात दानशूर. रत्नागिरी येथे बांधलेले पतितपावन मंदिर आणि मुंबईत दादर येथील चैत्यभूमीपासून महापौर बंगल्यापर्यंत अनेक एकर जागा त्यांनी दान केली. आज आपण माझे माझे म्हणत इंच इंच जागेसाठी कोर्ट-कचेऱ्या करतो. पण त्याकाळी अनेक एकर जागा दान करणे म्हणजे केवढे मोठे मन आणि केवढा मोठा त्याग.

‘अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ’तर्फे दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या जीवनचरित्रावर आधारित स्मृतिस्मरणिका ‘हिंदू धर्मरक्षक दानशूर भागोजीशेठ कीर’ नुकतीच प्रकाशित करण्यात आली. महासंघाचे खजिनदार मा. श्री. जगदीश आडवीरकर हे स्मृति स्मरणिकेचे संपादक आहेत. शनिवार २१ मार्च २०२६ रोजी श्री. आडवीरकर यांनी ‘कित्ते भंडारी’ संस्थेच्या कार्यालयात येत स्मृतिस्मरणिकेची एक प्रत मला सन्मानपूर्वक प्रदान केली. स्मृतिस्मरणिकेचे उपसंपादक श्री. संतोष मांजरेकर हे सुद्धा सोबत होते.
पत्रकारितेची पन्नास वर्षे पूर्ण केली असताना भंडारी समाजासह इतर सर्व समाजासाठी झटणाऱ्या थोर महात्म्याची स्मृति स्मरणिका वाचायला मिळणे हा एक चांगला योग जुळून आला. यानिमित्ताने दानशूर भागोजीशेठ कीर, लोकहितवादी बाबासाहेब बोले यांच्या कार्याविषयी श्री. आडवीरकर यांच्याबरोबर चर्चा करता आली. त्यावेळी दानशूर भागोजीशेठ कीर यांचे नातू श्री. अंकुर कीर यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून काही माहिती घेऊन स्वतःकडे असलेले माहितीभांडार वाढविता आले. भंडारी समाजाच्या संस्था आणि त्यांची ‘काल, आज आणि उद्या’ची स्थिती यावर चर्चा करता आली. हिंदू   धर्मरक्षक दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या स्मृति स्मरणिकेमुळेच हे शक्य झाले.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध