Sunday, February 9, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुख्य बातम्याहृदयविकाराचा झटका? इकडे लक्ष द्या!

हृदयविकाराचा झटका? इकडे लक्ष द्या!

प्रथमोपचार म्हणून सीपीआर द्या

महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून प्रशिक्षण घ्या

सोसायट्यांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करा

मुंबई (जयविजय न्यूज) : सध्याच्या स्पर्धेच्या युगात आणि धावपळीच्या आयुष्यात माणसाला अनेक आजारांनी ग्रासले आहे. अतिताणाने हृदयाच्या आजाराचे प्रमाणही वाढले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हृदयविकाराचा झटका आल्याचे ऐकिवात येते. रुग्णालयात दाखल करणे हा त्यावर उपाय असला तरी तोपर्यंत प्राथमिक उपचार आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. सीपीआर देणे हा त्यावर एक प्राथमिक उपचार आहे. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचू शकतात. जागतिक हृदय दिनानिमित्त गुरुवारी (२९ सप्टेंबर) महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे याचे आरोग्य खात्याचा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आपणही आपल्या सोसायटीत हा उपक्रम राबवू शकता. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संपर्क साधा.

आरोग्यपूर्ण आहार, नियमित व्यायाम

आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक युगात आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी आपण सर्वांनीच आपला आहार अधिकाधिक आरोग्यपूर्ण ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर हृदयविकाराची शक्यता घेऊन अधिकाधिक नागरिकांना सीपीआर प्रशिक्षण देणे व त्याबाबत जनजागृती साधणे अत्यंत आवश्यक आहे, असे मार्गदर्शन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व आपत्कालीन व्यवस्थापन खाते यांच्याद्वारे गुरुवारी (२९ सप्टेंबर) जागतिक हृदय दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यशाळेदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. महानगरपालिका मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित या कार्यशाळेदरम्यान अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सीपीआर विषयक जनजागृती कार्यशाळा या सोसायटी, महाविद्यालये आदींच्या स्तरावर आयोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.

या कार्यशाळेला संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, सार्वजनिक आरोग्य खात्याच्या प्रमुख डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे, केईएम रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजय महाजन, भूलशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. (श्रीमती) दीपा काणे, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा, सहयोगी प्राध्यापक डॉ. (श्रीमती) पल्लवी वाघळकर, आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख अधिकारी श्रीमती संगीता लोखंडे आणि मोठ्या संख्येने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या सुरुवातीला संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी कार्यशाळेबाबत प्राथमिक माहिती उपस्थितांना दिली. यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हृदयाच्या सुदृढतेसाठी आवश्यक बाबी

डॉ. संजीव कुमार यांनी आपले हृदय सुदृढ राहण्यासाठी करावयाच्या दैनंदिन बाबींची माहिती उपस्थितांना दिली. यामध्ये प्रामुख्याने आपला दैनंदिन आहार, व्यायाम, बाळाचे हृदय सुदृढ व्हावे यासाठी गर्भारपणातील आहार, सकारात्मक दृष्टिकोन, कौटुंबिक स्तरावर सकारात्मक वातावरण याबाबत मार्गदर्शन केले.
कोलेस्ट्रॉलबाबत घ्यावयाची काळजी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजय महाजन यांनी आपल्या सहज-सोप्या भाषेत उपस्थितांना माहिती दिली. हृदयामध्ये कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असावे यासाठी घ्यावयाची काळजी, तेलकट पदार्थ खाणे टाळणे, रोज किमान ३० मिनिटे चालणे, योग-ध्यानधारणा नियमितपणे करणे, दररोज किमान ६ ते ७ तास झोप घेणे; तसेच जेवणामध्ये मीठ-तेल इत्यादींचे प्रमाण कमी ठेवणे याबाबत सविस्तर माहिती डॉ. अजय महाजन यांनी दिली.
सीपीआरबाबत मार्गदर्शन
कार्यशाळेदरम्यान डॉ. दीपा काणे यांनी संगणकीय सादरीकरणासह सीपीआर विषयक माहिती उपस्थितांना दिली. एखाद्या व्यक्तिस अचानक हृदयविकाराचा त्रास झाल्यास त्याला सीपीआर कसा द्यावा, कितीवेळा द्यावा याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच प्रौढ व्यक्तिस सीपीआर कसा द्यावा, बालकांना सीपीआर कसा द्यावा आणि लहान शिशुंना सीपीआर कसा द्यावा याची देखील माहिती डॉ. काणे यांनी दिली.
सीपीआरबाबत प्रात्यक्षिके
कार्यशाळेच्या अखेरीस डॉ. पल्लवी वाघळकर व आपत्कालीन व्यवस्थापन खात्यातील श्री. राजेंद्र लोखंडे आणि केईएम रुग्णालयाच्या चमुने मानवी शरीराच्या प्रतिकृतींचा वापर करुन सीपीआर देण्याची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर कार्यशाळेला उपस्थित असणा-या प्रशिक्षणार्थींनी देखील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात प्रतिकृतींवर सीपीआर देण्याचा सराव केला. कार्यशाळेच्या अखेरीस डॉ. दक्षा शहा यांनी आभारप्रदर्शन केले.
===

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध