Thursday, October 16, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमहाराष्ट्रमेधाताई पाटकर यांची 'कित्ते भंडारी'ला सदिच्छा भेट

मेधाताई पाटकर यांची ‘कित्ते भंडारी’ला सदिच्छा भेट

अनेक सामाजिक विषयांवर चर्चा

झोपडपट्टी विभागाचा करणार

स्वयंपुनर्विकास

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मेधाताई पाटकर यांनी कित्ते भंडारी सभागृहाला शुक्रवारी (दि. १९ सप्टेंबर) सदिच्छा भेट दिली. त्यावेळी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेचे कार्यवाह ज्येष्ठ पत्रकार अरविंद सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. संस्थेची दीडशे वर्षांकडे वाटचाल आणि अनेक समस्यांचा सामना करत संस्थेचे चाललेले कार्य याबद्दल मेधाताईंनी प्रशंसा केली.

नर्मदा आंदोलनाच्या नेत्या आणि अनेक चळवळीत अग्रेसर असलेल्या नेत्या अशीच मेधाताईंची ओळख आहे. मात्र आता त्या झोपडपट्टीवासीयांना चांगली घरे मिळावीत यासाठी प्रयत्नशील आहेत. धारावीप्रमाणे मानखुर्द भागातही मोठी झोपडपट्टी आहे. त्यांच्या मतांवर राजकारणी निवडून येतात. मात्र त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यांना नारकयातनांतून बाहेर काढणे हा आपला उद्देश असल्याचे मेधाताईंनी अरविंद सुर्वे यांच्याबरोबर चाललेल्या अनौपचारिक चर्चेच्या वेळी सांगितले. एसआरएअंतर्गत हा पुनर्विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मेधाताई म्हणाल्या. स्वयं पुनर्विकासासाठी नेहमीच आग्रही असलेले आमदार प्रवीण दरेकर यांनीही मेधाताई यांच्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले एव्हढेच नाही, तर त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मेधताई यांनी या चर्चेच्या वेळी दिंडोशी येथील नागरी निवारा वसाहतीचे उदाहरण देत दिवंगत मृणाल गोरे स्वयंपुनर्विकासाच्या जनक असल्याचे म्हटले. मृणाल गोरे यांनी दिंडोशी येथील जमीन विकत घेऊन तेथील रहिवाशांच्या गृहनिर्माण संस्था बनविल्या आणि गरजवंतांना चांगली घरे स्वस्तात उपलब्ध करून दिली. तेथे नुसती घरे बांधून दिली असे नव्हे, तर सर्व सुविधांनी सुसज्ज अशी वसाहत निर्माण केल्याचे मेधाताई म्हणाल्या.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध