वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांचे हृदयस्पर्शी उद्गार
मुंबई (जयविजय न्यूज) : सध्या माणूस माणसाला पारखा होत असतानाच माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य अनाम प्रेम परिवरतर्फे करण्यात येत आहे. खरोखरच हे कार्य कौतुकास्पद आहे, असे हृदयस्पर्शी उद्गार बोरिवलीतील कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक अनिल आव्हाड यांनी काढले.
अनाम प्रेम परिवारातर्फे दिवाळी पाडव्यानिमित्त मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांबरोबर दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बोरिवलीतील कस्तुरबा पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात हरिश्चंद्र गवाणे बोलत होते.
पोलिसांच्या मनोबलात वाढ
डोळ्यांत तेल घालून सीमेवर जवान तैनात असतात, प्रसंगी प्राणांची बाजी लावतात म्हणून देशातील जनता सुरक्षित असते. त्याचप्रमाणे मुंबईसह राज्यभरात पोलीस दक्ष असतात म्हणून मुंबईकर, राज्यातील जनता सुरक्षित असते. आपण सर्वजण घरात कुटुंबीयांबरोबर दिवाळी साजरी करीत असतो, तेव्हा पोलीस बांधव जनतेच्या रक्षणासाठी पोलीस ठाण्यात असतात. मात्र ते त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर असले तरी आम्ही (जनता) त्यांच्या कुटुंबीयांपैकीच आहोत, ही भावना त्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी दिवाळी पाडव्याला अनाम प्रेम परिवाराचे सदस्य प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याबरोबर फराळ करतात. त्यांच्या कर्तव्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. हाच धागा पकडून आव्हाड म्हणाले की, सीमेवर जवानांना शत्रू कोण आहे याची माहिती असते. पण मुंबईत पोलिसांना त्यांच्या भोवती वावरणाऱ्यात शत्रू कोण याची माहितीही नसते. त्यामुळे त्यांना नेहमीच सतर्क राहावे लागते. त्यासाठी सणवार, कुटुंब या गोष्टी विसराव्या लागतात आणि जनसेवेसाठी कर्तव्यावर हजार असावेच लागते. मात्र अनाम प्रेम परिवार सारख्या संस्था दिवाळीसारख्या महत्त्वपूर्ण अशा मंगलमयपर्वात पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांच्या कर्तव्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. त्यामुळे पोलिसांचे मनोबल वाढते आणि त्यांच्याकडून अधिक चांगले काम होते.
‘अनाम प्रेम’च्या कार्याला सलाम
पोलीस अधिकारी हरिश्चंद्र गवाणे म्हणाले की, घरी बनविलेल्या फराळातच अनाम प्रेम परिवाराची प्रेमभावना ओतप्रोत भरलेली आहे. त्यामुळे त्याची गोडी अवीट आहे. माणसातील आपुलकीची भावना सध्या दुर्मिळ होत चालली आहे. पण अनामप्रेम परिवाराच्या “प्रेम शिंपित जा” ब्रीदाने समाजात प्रेमभावना निश्चितच वाढीस लागेल. अनाम प्रेम परिवाराचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याला सॅल्युट!
लोकरक्षणासाठीच आम्ही भूतलावर
पोलीस अधिकारी ऋषी इनामदार म्हणाले की, ते कॅबिनमध्ये असताना त्यांच्या मनात विचार आला की, लोक त्यांच्या घरात कुटुंबीयांबरोबर दिवाळी साजरी करत असताना आपण पोलीस ठाण्यात आहोत, असा विचार मनात डोकावत असतानाच, लगेच दुसरा विचार मनात आला की, नाही! लोकरक्षणाच्या महान करण्यासाठीच परमेश्वराने मला भूतलावर पाठविले असावे आणि तो माझ्याकडून सद्रक्षणाचे, खलनिग्रहणाचे काम करून घेत असावा. हे काम आम्ही पोलीस चांगल्या पद्धतीने पार पाडत असू, म्हणूनच अनाम प्रेम परिवारातर्फे पोलिसांच्या कर्तव्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. प्रेमभावना ओतप्रोत भरलेल्या दिवाळी फराळामुळे आम्ही आमच्या कुटुंबीयांतच आहोत, अशी भावना निर्माण झाली आहे. अनाम प्रेम परिवारासारख्या अशा अनेक परिवारांमुळेच काम अधिक जोमाने करण्यास पोलिसांना बळ मिळते, असेही ऋषी इनामदार म्हणाले.
अनाम प्रेम परिवाराच्या प्रेमभावनेमुळे पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद विलसले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनात पोलीस कर्मचारीबंधू राहुल चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मुंबईसह राज्यभरातील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी अशाच भावना व्यक्त केल्या.