मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम
सध्या मुंबईतील कबुतरखान्याचा प्रश्न चांगलाच तापला आहे, कबूतखाने बंद करण्याचे आदेश हाय कोर्टाकडून देण्यात आले आहेत. हाय कोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टाने देखील तो निर्णय कायम ठेवला आहे. उच्च न्यायालयाने कबुतरखान्यासंदर्भात दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आला आहे. त्यामुळे आता हाय कोर्टाच्या आदेशानुसार कबुतखाने बंदच राहणार आहेत.
हाय कोर्टाकडून मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे या मुद्दावर जैन समाज आक्रमक झाला आहे. कबुतरखाने बंद करायला जैन समाजाचा विरोध आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही जैन समाजातील काही व्यक्तींनी दादर कबुतरखान्याजवळ कबुतरांना अन्नधान्य टाकले होते, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच त्यांना कबुतरांना धान्य टाकण्यापासून रोखण्यात आले. याविरोधात जैन समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात 13 तारखेपासून उपोषण सुरू करू असा इशारा जैन समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी यासंदर्भात ‘गरज पडल्यास हातात शस्त्र घेऊ’ असे म्हटले आहे. आम्ही शांततापूर्ण मार्गाने सत्याग्रह आणि उपोषण करू. जैन समाज शांतताप्रिय आहे आणि शस्त्र उचलणे आमचे काम नाही, पण गरज पडली तर धर्माच्या रक्षणासाठी आम्ही शस्त्रही हाती घेऊ शकतो, असे या जैन मुनींनी म्हटले आहे.
आता सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.