ज्येष्ठ कवी, साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी जागविल्या लतादीदींच्या स्मृती
मुंबई (भारत कदम) : भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ९३ वर्षांच्या आयुष्यात संपूर्ण विश्वावर आपल्या स्वरांची उधळण केली. आज देहरुपाने त्या आपल्यामध्ये नसल्या तरी प्रत्येकाच्या ह्रदयसिंहासनावर त्या विराजमान आहेत. प्रत्येकाच्या श्वासाश्वासात त्यांचे स्वरसूर मिसळलेले आहेत. पित्याच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलतांना अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागला. आपले पहिले गाणे त्यांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी गोरेगावच्या प्लॅटफॉर्मवरील बाकड्यावर बसून गायले. हा बाकडा आता कुठे असेल कुणास ठाऊक. पण रेल्वेने या महान स्वरसम्राज्ञीच्या स्मृती किमान गोरेगावच्या प्लॅटफॉर्मवर निश्चितपणे जतन करण्याची गरज आहे, अशी भावना ज्येष्ठ कवी, साहित्यिक व पत्रकार अंबरीश मिश्र यांनी दीदींच्या षण्मासिक स्मृती दिनानिमित्त आयोजित एका शानदार सोहळ्यात बोलून दाखविली. रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या भावनेला प्रचंड दाद दिली.
बोरिवली पश्चिम, चिकूवाडी येथील विट्टी इंटरनॅशनल स्कूलच्या सेमिनार हॉलमध्ये प्रख्यात कवी, विचारवंत आणि लतादीदींचे निकटवर्तीय अंबरीश मिश्र यांनी दीदींच्या षण्मासिक स्मृती दिनानिमित्त दीदींच्या ठराविक दहा गाण्यांचे ‘तेरा साथ हर जनम में’ या शीर्षकाखालील कार्यक्रमात सादरीकरण केले. हे सादरीकरण करतांना त्यांनी अतिशय खुमासदार शैलीत दीदींच्या बालपणापासून अखेरपर्यंतचे जीवन उलगडून दाखविले. यावेळी लतादीदींच्या भगिनी मीना मंगेशकर खडीकर यांचे चिरंजीव योगेश खडीकर आणि सूनबाई सौ. मेखला खडीकर उपस्थित होते.
सिगारेटच्या पाकिटावर धरला ठेका
लतादीदींच्या जीवनपट उलगडून सांगतांना अंबरीश मिश्र म्हणाले की, लता मंगेशकर यांना पहिला ब्रेक देणारे संगीतकार होते मास्टर गुलाम हैदर! ते लता मंगेशकर यांना सर्वप्रथम एस मुखर्जी यांच्या गोरेगाव येथील फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये घेऊन गेले. त्यांनी लता मंगेशकर यांचा आवाज एस. मुखर्जी यांना ऐकवून दाखविला. मात्र त्यांनी सांगितले की, लताचा आवाज खूप पातळ आहे, त्यामुळे तिचा आवाज चालणार नाही. त्यामुळे मास्टर गुलाम हैदर हे लताला घेऊन गोरेगाव स्टेशनवर आले तेथे त्यांनी एका बाकड्यावर बसून एका गाण्याची धून मुखोद्गत करून घेतली. त्यावेळी गुलाम हैदर यांनी ५५५ च्या सिगारेटच्या पाकीटावर बोटांनी वाजवून ठेका धरला. त्यानंतर ते लताला घेऊन मालाडच्या “बॉम्बे टॉकीज” मध्ये गेले. तिथे सर्वप्रथम लताने पहिले गाणे गायले. बॉम्बे टॉकीजच्या ‘मजबूर’ चित्रपटात लता मंगेशकर यांनी मुकेश यांच्याबरोबर गायिलेल्या पहिल्या गाण्याचे बोल होते “अब डरने की नही कोई बात, अंग्रेजी छोरा चला गया!” याच गाण्याचा ठेका ते लता मंगेशकरला गोरेगाव रेल्वे स्टेशनवरील बाकड्यावर सिगारेटच्या पाकिटावर वाजवून ऐकवीत होते. मास्टर गुलाम हैदर यांनी यापूर्वी गायिका नूरजहां हिला देखील ब्रेक दिला होता. मास्टर गुलाम हैदर यांनी चित्रपट संगीतात पंजाबी उडत्या चालीचा ठेका आणला. याच ठेक्यावर संगीत देऊन त्यांनी “खानदान” “खजांची” हे चित्रपट प्रचंड गाजविले. शहीद चित्रपटाला देखील त्यांचे संगीत होते. या शानदार आणि श्रवणीय कार्यक्रमात १)हवा मे उडता जाये मोरा लाल दुपट्टा मलमल का, चित्रपट “बरसात”, गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन! शंकर जयकिशन यांनी गुलाम हैदर यांची कॉपी करत पंजाबी ठेका या गाण्यात दिला आहे.
२) अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, चित्रपट “हम दोनो” संगीतकार जयदेव, गीतकार साहिर लुधियानवी
३) लग जा गले, के फिर ये, हसी रात हो ना हो, चित्रपट “वो कौन थी” संगीतकार मदन मोहन, गीतकार राजा मेहंदी अली खान
४) जुलमी उलफत को लोग सजा देते है कैसे नादा है शोलोंको हवा देते है, चित्रपट ताजमहल, संगीतकार रोशन, गीतकार साहिर लुधियांनवी
५) ओ सजना बरखा बहार आई, चित्रपट “परख” संगीतकार सलील चौधरी, गीतकार शैलेंद्र.
६) आ जाने जा, ये मेरा हुस्न जवाँ, जवाँ तेरे लिए मै आस लगाये साजन आ जाना, चित्रपट “इंतकाम”, गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
७) मी कात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली, चित्रपट “जैत रे जैत” गीतकार ना. धों. महानोर, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.
८) ये जवळी घे प्रिय सखया भगवंता, संगीतकार मीना खडीकर, गायिका लता मंगेशकर, चित्रपट “माणसाला पंख असतात” गीतकार वि. स. खांडेकर
९) कहीं दीप जले, कहीं दिल, जरा आकर देख ले परवाने, चित्रपट “बीस साल बाद”, गीतकार शकील बदायुनी, संगीतकार हेमंतकुमार.
या सर्व गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मीना वैशंपायन यांनी अतिशय समर्पक असे प्रास्ताविक केले, कुणाल माईणकर यांनी स्वागत केले. अंबरीश मिश्र यांचे ज्येष्ठ सहकारी पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्या हस्ते अंबरीश मिश्र तसेच योगेश खडीकर आणि सौ. मेखला खडीकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेणाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.