लोकसभा निवडणुकीतील पराभवाची
राष्ट्रपती नियुक्त सदस्यत्वाने भरपाई
मुंबई : भारतातील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि नेहमी सरकारच्या बाजूने उभे राहिलेले ऍड उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता राज्यसभेच्या रुपाने त्यांच्यासाठी खासदारकीचे दार उघडे झाले आहे.
लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये उज्ज्वल निकम यांनी उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
भाजपने तत्कालीन खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी उज्ज्वल निकम यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभेत पराभव झाल्यानंतर आता राज्यसभेच्या रुपाने त्यांच्यासाठी खासदारकीचे दार उघदे झाले आहे.
पंतप्रधानांच्या शुभेच्छा!
राज्यसभेवर नियुक्ती होताच उज्ज्वल निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ही नियुक्ती देशाच्या ऐक्यासाठी आणि संविधानाच्या बळकटीसाठी त्यांचे योगदान असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी मराठीतच उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रपती महोदय तुमच्यावर एक जबाबदारी सोपवू इच्छितात आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टीकोनातून चांगली सांभाळाल याच्या तुम्हाला शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान म्हणाल्याचे निकम यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह, त्याचप्रमाणे भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तमाम भाजप पक्षाने माझ्यावर लोकसभा निवडणुकीवेळी जो विश्वास प्रकट केला होता, तो यावेळी सार्थ करुन दाखवेन, असे उज्ज्वल निकम म्हणाले.
विश्वास सार्थ ठरवणार
राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे कायद्याचा अभ्यास, कायद्याचे विश्लेषण या देशाच्या ऐक्याकरता, देशातील लोकशाही, संविधान हे कशारितीने प्रबळ राहिल, याची काळजी घेण्याकरिता माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे निश्चित प्रयत्न करेन, असे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो. कारण महाराष्ट्रातून माझ्या एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांचे व्यक्तीश: आभारी आहे. ही जबाबदारी जरी मोठी असली तरी आपल्या सर्वांचे, महाराष्ट्रातील जनतेचे, इतर भाषिकांचे सहकार्य मला मिळेल यात शंका नाही, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले.
उज्ज्वल निकम यांचा प्रवास
उज्ज्वल निकम हे मूळचे उत्तर-महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत. राज्यात आणि देशात त्यांची ओळख विशेष सरकारी वकील म्हणून आहे. त्यांनी एल.एल.बीचे (LLB) शिक्षण जळगावातच पूर्ण केले. अंबरनाथमधील बॉम्बस्फोट खटलाही त्यांनी हाताळला होता. १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट खटला त्यांनी चालविला. या खटल्यामुळे
सरकारी वकील म्हणून त्यांच्या कारकिर्दिला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या १०० पेक्षा जास्त सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. या खटल्यामुळेच, उज्ज्वल निकम यांचा जळगाव ते मुंबई असा प्रवास सुरू झाला. हा संपूर्ण खटला त्यांनीच चालविला.
उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणूनही काम केले. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात १२३ आरोपींपैकी १००आरोपी दोषी आढळले, तर १२ दोषींना विशेष टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली.